
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्यानंतर ‘आयपीएल’ भारतात खेळविण्याऐवजी गेल्या वर्षीप्रमाणे परदेशात खेळविण्यात यावी, असा एक मतप्रवाह सध्या पाहायला मिळतो. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जर ‘आयपीएल’ स्पर्धा गेल्या वर्षी परदेशी खेळविण्यात आली होती, तर यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागल्यानंतर ही स्पर्धा स्वदेशी खेळविण्याचा आयोजकांचा अट्टाहास का, असादेखील सवाल विचारण्यात येत आहे. परदेशात ही स्पर्धा आयोजित केल्यानंतरही ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ला (बीसीसीआय) गेल्या वर्षी भरघोस महसूल मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षीदेखील गेल्या वर्षीसारखे नियोजन करण्यास काय हरकत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. परंतु, क्रिकेटतज्ज्ञांनी यावर मांडलेले मतही तितकेच महत्त्वाचे म्हणावे लागेल. गेल्या वर्षी भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यासारखी परिस्थिती नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढीस लागल्याने अनेक परदेशातील खेळाडूंनीही भारतात येऊन खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारताच्या तुलनेत संयुक्त अरब अमिरातीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने या ठिकाणी अनेकांनी खेळण्यास उत्सुकता दर्शविली. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यास ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ने पसंती दिली. मात्र, यंदाची परिस्थिती ही वेगळी आहे. केवळ ‘आयपीएल’च नव्हे, तर २०२० साली होऊ न शकलेल्या आंतरराष्ट्रीय ‘टी-२० विश्वचषक’ स्पर्धेचे आयोजनही भारताच्या वतीने करण्यात येणार असल्याने यंदाच्या वर्षी कोणत्याही खेळाडूने भारतात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस दाखवले नाही. ‘आयपीएल’नंतर वर्षाखेरीस पुन्हा एकदा भारतात आंतरराष्ट्रीय ‘टी-२० विश्वचषक’ स्पर्धा खेळायची असल्याने ‘आयपीएल’ स्पर्धेमध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव घेण्याचा मानस परदेशी खेळाडूंचा आहे. म्हणूनच परदेशी खेळाडूही भारतात येण्यास उत्सुक दिसतात. म्हणूनच ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ने यंदाच्या वर्षी ‘आयपीएल’ स्पर्धा भारतातच खेळविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
हीच ती वेळ...?
क्रिकेट हा एक मनोरंजनाचा खेळ. जगात फुटबॉलनंतर सर्वाधिक पसंतीचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. भारतात मात्र या खेळाला प्रचंड प्रसिद्धी असून, क्रिकेट हा जणू भारतीयांच्या रक्तातील खेळ म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे या खेळावरही काही प्रमाणात निर्बंध आले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परदेशी धर्तीवर का होईना, मात्र भारताने क्रिकेट खेळण्याचे धाडस दाखवले. क्रिकेटविश्वातील जगप्रसिद्ध ‘आयपीएल’ ही नियोजित स्पर्धा आपल्या धर्तीवर खेळविणे शक्य झाले नाही तरी परदेशी धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करत भारताने क्रिकेट खेळाच्या अर्थचक्रास पुन्हा नव्याने गती दिली. भारताने आर्थिकदृष्ट्या स्वतःला तर सावरलेच. मात्र, जगभरातील खेळाडूंना या स्पर्धेसाठी संधी देत भारताने अनेकांना दिलासा दिला. सप्टेंबर २०२०नंतर अवघ्या या सात महिन्यांच्या कालावधीनंतर ‘आयपीएल’ स्पर्धेच्या १४व्या हंगामास येत्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. यंदा भारतातच ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. परंतु, या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव देशात पुन्हा एकदा कमालीचा वाढू लागल्यानंतर ही स्पर्धा भारतात खेळविण्याबाबत काही जणांकडून याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी कठोर निर्बंध घालण्यात येत आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक बाबींवर निर्बंध घालण्यात येत आहेत. मात्र, परदेशातून शेकडो खेळाडूंसह खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेला मिळालेल्या परवानगीबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागलेला असतानाच ‘आयपीएल’ खेळविण्याची हीच योग्य वेळ कशी असू शकते, असाही सवाल विचारण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या प्रश्नांना क्रिकेटतज्ज्ञांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘आयपीएल’ स्पर्धा ही केवळ खेळाडूंच्या उपस्थितीत होणार असून, यावेळी कुठेही प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्पर्धेमुळे कोरोनाचा प्रसार वाढेल, असे म्हणणे चुकीचे ठरते, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच परदेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूही या स्पर्धेपूर्वी ‘क्वारंटाईन’ होऊनच यात सहभागी होत आहेत. कोरोनाबाबत सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतरच ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे ‘आयपीएल’साठी ‘हीच ती योग्य वेळ’ असे क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- रामचंद्र नाईक