लक्ष्यभेदी ‘यशस्विनी’

    02-Apr-2021
Total Views | 59

mansa_1  H x W:



ब्राझीलमधील ‘रिओ डी जेनेरिओ’ येथे पार पडलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णभेदी कामगिरी करणार्‍या यशस्विनीच्या यशाची कहाणी...


कोरोनाच्या महामारीनंतर राष्ट्रीयसह आंतरराष्ट्रीय पातळीवर हळूहळू क्रीडा क्षेत्र पुन्हा रुळांवर येऊ लागले. त्यानंतर कुठेतरी भारतीय क्रीडा क्षेत्रानेही अनेक स्पर्धांमध्ये आपली पकड जमवण्यास सुरुवात केली. अनेक भारतीय खेळाडूंनी स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आपला झेंडा सातासमुद्रापार फडकवला. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात शहरांपासून गावखेड्यात अनेक अशी व्यक्तिमत्त्वे आहेत, ज्यांचा देशाचे नाव उंचावण्यात मोलाचा वाटा आहे. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे हरियाणाच्या पंचकुला शहरातील नेमबाज यशस्विनीसिंह देसवाल. बलाढ्य प्रतिस्पर्ध्यावर मात करत तिने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर ‘एअर पिस्तुल’ प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. या कामगिरीनंतर आता नेमबाजी क्षेत्रात तिला ‘उगवता तारा’ म्हणून पाहिले जाते. जाणून घेऊया तिच्या या यशस्वी प्रवासाबद्दल...



यशस्विनीसिंह देसवालचा जन्म नवी दिल्लीमध्ये दि. ३० मार्च, १९९७ रोजी झाला. तिचे वडील इंडो-तिबेटन सीमा पोलीस (आयटीबीपी) मध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच, तिची आई सरोज देसवाल या आयकर विभागात मुख्य आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. शालेय जीवनात यशस्विनी अभ्यासात तर हुशार होतीच, शिवाय खेळांमध्येही ती भाग घेत असे. चंदिगढच्या ‘डी. ए. व्ही. महाविद्यालया’त अर्थशास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या यशस्विनीला नेमबाजीमध्ये रुची निर्माण होण्याचे कारण म्हणजे तिचे वडील. तिचे वडील तिला लहानपणी ‘कॉमनवेल्थ गेम्स’, 2010च्या एका स्पर्धेत घेऊन गेले होते. गुडगाव येथे होत असलेल्या पिस्तुल नेमबाजी स्पर्धा बघायला गेलेल्या यशस्विनीला या खेळाबद्दल कुतूहल वाटू लागले. या स्पर्धेत देश-विदेशातून आलेल्या नेमबाजांची खेळी पाहून यशस्विनीलाही या खेळामध्ये भाग घेण्याची प्रेरणा निर्माण झाली. ’या खेळामध्ये आपणही देशाचे नेतृत्त्व करू शकतो’ असा दृढनिश्चय करून या खेळाचे प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली. २०१२ मध्ये यशस्विनीने पिस्तुल नेमबाजीसाठी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. निश्चय मनाशी बाळगून तिने या खेळांसंदर्भातील मूलभूत प्रशिक्षण घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी तिने नेमबाजीमध्ये करिअर करण्याचे ठरवले. यशस्विनीला तिचा खेळ आणि अभ्यासामध्ये संतुलन राखणे, हे एक मोठे आव्हान होते. तिला आपला सराव, अभ्यास आणि परीक्षांसाठी वेगळा वेळ काढावा लागत होता. अनेकदा विविध स्पर्धांमध्ये आपली पुस्तकेही स्वतःबरोबर बाळगावी लागत. केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर तिच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही हे खूपच आव्हानात्मक होते. कारण, त्यांनाही देश-विदेशातील विविध स्पर्धांमध्ये तिच्याबरोबर जावे लागत होते. मात्र, तिने घरच्यांच्या साथीने या दोन्हीमधील समन्वय साधला.


पुढे यशस्विनीने आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि माजी पोलीस अधिकारी तेजिंदर सिंग ढिल्लन यांच्या नेतृत्वात नेमबाजीचा सराव सुरू केला. नेमबाजीच्या या प्रवासात तिच्या कुटुंबीयांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत तिच्यासाठी ‘शूटिंग रेंज’ तयार केली. दोन वर्षांचे अथक परिश्रम आणि मेहनतीचे फळ तिला २०१४मध्ये मिळाले. यशस्विनीने सुरुवातीलाच मोठी भरारी यावर्षी आयोजित केलेल्या ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत विविध प्रभागांमध्ये तीन सुवर्णपदके पटकावली. तिच्या या कामगिरीमुळे याचवर्षी चीनमधील नानजिंग येथे होणार्‍या ‘समर युथ ऑलिम्पिक’साठी पात्र ठरली. दहा मीटर ‘एअर पिस्तुल’ स्पर्धेमध्ये तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, एक आंतरराष्ट्रीय अनुभव घेऊन ती पुन्हा मायदेशात परतली. स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ न देता, तिने पुढच्या स्पर्धांसाठी पहिल्यापेक्षा अधिक मेहनत घेत सराव सुरू ठेवला. राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत, स्वतःवर काम करत दोन वर्षांनी पुन्हा एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याची संधी तिने मिळवली. २०१६मध्ये जर्मनीतील सुहल येथे झालेल्या ‘आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक स्पर्धे’त‘पिस्तुल एकेरी’ प्रकारात आणि सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले.



याचवर्षी अझरबैजानमधील कबाला येथे झालेल्या स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. पुढे दक्षिण आशियाई गेम्स, २०१६ मध्ये तिने सांघिक प्रकारात सुवर्णपदक, तर याव्यतिरिक्त कांस्यपदक पटकावले. २०१७ मध्ये तिने जर्मनीमध्ये झालेल्या ‘आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्येही सुवर्णपदक पटकावले. एवढेच नव्हे, तर २३५.९ गुण मिळवत तिने जागतिक स्तरावर ‘ज्युनिअर’ प्रकारात विश्वविक्रम केला. त्यानंतर, २०१८ मध्ये तिने ‘एअर पिस्तुल’ मिश्र प्रकारात अभिषेक वर्मांसमवेत कुमार सुरेंद्रसिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. २०१९ मध्ये ब्राझील येथे झालेल्या ‘आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धे’त सुवर्णपदक पटकावून पुढच्या ऑलिम्पिकसाठी दरवाजे खुले केले. हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण असल्याचे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. कोरोना काळातही पुढील ऑलिम्पिकसाठी तिने जोरदार तयारी सुरू ठेवली असून चांगली कामगिरी करत भारताचा झेंडा फडकावण्याचे तिचे लक्ष्य आहे. तिच्या पुढच्या कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121