वडिलांकडून सामाजिक कार्याचा वारसा घेणार्या अॅड. जयदीप हजारे यांनी कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी चळवळ उभारली आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...
जयदीप यांचे वडील दिलीप हे कल्याणचे. त्यामुळे जयदीप यांचे संपूर्ण बालपण कल्याणमध्ये गेले. जयदीप यांचे शालेय शिक्षण ‘के. सी. गांधी’ शाळेत झाले. पुढील शिक्षण त्यांनी ‘बिर्ला महाविद्यालया’तून पूर्ण केले. त्यानंतर वकिलीची पदवी प्राप्त केली. जयदीप यांचे वडील आणि काका सुधीर यांचा सरकारी रस्ते बांधकामाचा व्यवसाय होता. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात त्यांनी रस्ते विकासाची कामे केली. जयदीप यांचे भाऊ वडिलांच्या व्यवसायात गेले. जयदीप यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांच्या एक तरी मुलाने वकील किंवा डॉक्टर असे क्षेत्र निवडावे.
त्यामुळे जयदीप यांना त्यांनी व्यवसायापासून लांब ठेवले. जयदीप यांच्या वडिलांचे २००० मध्ये निधन झाले. मात्र, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ठाम निश्चय जयदीप यांनी मनाशी पक्का केला होता. २००७ साली जयदीप यांनी एलएलबीचे {शक्षण पूर्ण केले आणि आज ते वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. वडिलांचे स्वप्न जयदीप आज जगत आहेत. “एलएलबी पूर्ण करून वकील झालो तेव्हा वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, पण दुदैवाने हे पाहायला ते नाहीत याची खंत वाटते,” असे जयदीप सांगतात.
कोणीही अडचणीत असेल तर जयदीप यांचे वडील मदतीला धावून जात. कोणाला आर्थिक मदत लागली तरी ते करीत असत. वडिलांचा हा वारसा जयदीप आणि त्यांच्या भावांनीही जपला आहे. जयदीप यांचे वडील कल्याणमधील गणेशोत्सव मेळा संघाचे पाच वेळा अध्यक्ष झाले होते. शिवजयंती उत्सवाचेही ते अध्यक्ष होते. जयदीप यांनी उभी केलेली प्लाझ्मा चळवळ हीदेखील त्यांच्या वडिलांकडून आलेल्या संस्काराचेच एक उदाहरण आहे.
जयदीप सध्या कल्याण दिवाणी वकील संघटनेचे सहखजिनदार आहे. १९५३ साली जयदीप यांच्या वडील आणि काका यांनी वयाच्या आठव्या-दहाव्या वर्षी घरच्या अंगणात गणेशोत्सव सुरू केला होता. या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे एका कुटुंबाने सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे. अनेक नागरिक तिथे दर्शनाला येतात. चलचित्र हे त्यांचे आणखी एक वेगळेपण आहे. या गणेशोत्सवाला ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी आहे. दूधनाक्यावरून त्यांची विसर्जन मिरवणूक निघते. हा गणेशोत्सव जयदीप आणि त्यांची भाऊ थाटामाटात साजरा करीत आहे. कासार आळीत हा गणेशोत्सव आजही साजरा होतो.
जयदीप एकत्र कुटुंबात राहतात. त्यांच्या भावंडांच्या व्यवसायात अनेक चढ-उतार आले. पण या कुटुंबाने एकमेकांचा धरून ठेवलेला हात कधीच सोडला नाही. जयदीप मुख्यत: ठाणे जिल्ह्यात वकिलीचा व्यवसाय करीत आहेत. दिवाणी स्वरूपाची अनेक प्रकरणे ते प्रामुख्याने घेत असतात. जयदीप यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना महामारीत कोरोनाची लागण झाली होती. या संकटावरही त्यांनी एकजुटीने मात केली. त्यातून त्यांचे कुटुंब सहीसलामत बाहेर आले. काही दिवसांनी त्यांच्या मित्राला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी प्लाझ्माची गरज होती.
जयदीप आणि त्यांचे चाळीसहून अधिक मित्र प्लाझ्मादाता {मळविण्याचा प्रयत्न करीत होते. उशिराने त्यांना प्लाझ्मादाता मिळाला, पण आपल्याला प्लाझ्मा मिळविताना एवढा त्रास झाला तर सामान्य माणसाला किती त्रास होत असेल, याचा विचार करून त्यांनी पुढे प्लाझ्मादान मोहीम हाती घेतली. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी प्लाझ्मादाता व प्लाझ्माची गरज असल्याची माहिती मिळविण्यास सुरूवात केली. जयदीप यांचा संपर्क क्रमांकही आता बर्याच ठिकाणी पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचतात.
सध्या कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णांना प्लाझ्माची गरज भासत आहे. जयदीप यांना प्लाझ्माची गरज असलेल्या नागरिकांचे दिवसाला १०० फोन तरी येत असतात. जयदीप त्यांच्या परीने प्लाझ्मा मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. ही चळवळ सुरू केली त्यावेळी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांनी हार न मानता त्याविषयी जनजागृती केली. त्यांनी प्लाझ्मादान केल्यावर त्यांचे फोटो ‘व्हायरल’ केले. त्यातून नागरिकांनीही प्लाझ्मादानाला सुरूवात केली. आता त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक चाचणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर गोंधळून जातात. त्यांना प्लाझ्मा मिळविताना आणखी वणवण करावी लागते. या परिस्थितीत जयदीप यांच्या उपक्रमाचा कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आधार वाटू लागला आहे.
कोरोनातून पूर्ण बरी झालेली व्यक्ती प्लाझ्मादान करू शकते. प्लाझ्मा एक वर्षपर्यंत टिकू शकतो. पण सद्यपरिस्थितीत तो एक दिवसही टिकून राहत नाही. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अॅण्टिबॉडीज असतील तर १५ ते २० दिवसांनी ती प्लाझ्मा पुन्हा देऊ शकते. एखादी व्यक्ती प्लाझ्मादान करीत असेल तर त्यांच्या रक्तातून फक्त प्लाझ्मा घेतला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीला अशक्तपणाही येत नाही. नागरिकांचा गैरसमज आहे प्लाझ्मा दिल्यावर अशक्तपणा येतो. एकदा एका डॉक्टरांच्या वडिलांना आणि अॅब्युलन्स चालकाच्या आईला प्लाझ्माची गरज होती. पण त्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. डॉक्टर आणि त्या चालकांनी आपला जीव इतरांसाठी धोक्यात घातला. मात्र, त्यांच्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते, ही गोष्ट मनाला चटका लावून गेल्याचे जयदीप सांगतात.
जयदीप यांनी स्वत: तीन वेळा प्लाझ्मादान केले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांचे बंधू राहुल दिलीप हजारे आणि काकाचा मुलगा केतन सुधीर हजारे यांनीदेखील प्लाझ्मादान केले आहे. आता कोरोना रुग्ण वाढत आहे, त्यामुळे कोणताही आजार नसलेल्यांनी स्वत:हून पुढे येऊन प्लाझ्मादान करावे. सर्वांनी एकत्र आल्यास या जागतिक महामारीच्या संकटावर आपण मात करू शकतो, असे ते सांगतात.