खासगी लॅबमध्ये धक्कादायक प्रकार
शहापूर : कोरोनाचा कहर वाढत असताना कोरोना टेस्ट करणाऱ्या खासगी लॅबधारकाने आरटीपीसीआर चाचणीचे जादा पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार आरती पष्टे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तक्रारदार आरती पष्टे शहापूर येथील परांजपे नगरमध्ये असलेल्या आश्विनी कॉम्प्युटराईज्ड लॅबोरेटरीमध्ये (दि.८
रोजी) आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्याकडून १ हजार ३०० रुपये शुल्क आकारले गेले. मात्र ३१ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणीचे दर ५०० किंवा ८०० रुपये आकारणे आवश्यक असतांना शासन आदेशाचे उल्लंघन करुन जादा शुल्क घेतले, असा आरोप पष्टे यांनी केला.
या अनुषंगाने तालुक्यातील सर्व खाजगी प्रयोगशाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या जादा दरांबाबत चौकशी करुन संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम १८८, आपती व्यवसाय कायदा कलम ५१ (ब) आणि साथरोग प्रतिबंध का १८९७ कलम(३) नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार आरती पष्टे यांनी केली आहे.
१३०० रुपये वसूल
आरोग्य मंत्रालय, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र लिहून या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली. खासगी प्रयोगशाळांनी कोरोना आरटीपीसीआर तपासणीच्या दराबाबत १४ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेले दर अधिक्रमित करून आरटीपीसीआर चाचणीचे सर्व करांसहित सुधारित दर घेण्याचे निश्चित करण्यात केले आहे. राज्यात कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला शासन निर्णयानुसार कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत असे स्पष्ट केले असतांना खाजगी लॅब चालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.