
सत्य फार काळ लपून राहत नाही. एक ना एक दिवस ते बाहेर येतेच, असे म्हटले जाते. पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये सध्या असेच काहीसे घडत असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज असणार्या मोहम्मद आसिफने आपल्याच संघाच्या विद्यमान प्रशिक्षक आणि माजी गोलंदाज असणार्या वकार युनूसवर आरोप केल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हवेत चेंडू ‘स्विंग’ करण्यासाठी वकार युनूस हा चेंडूसोबत छेडछाड करायचा आणि अनेकांची फसवणूक करायचा, असे आरोप मोहम्मद आसिफने लावल्याने पाकिस्तानचा क्रिकेट संघ हा पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्यात अडकला आहे. क्रिकेट वर्तुळात आपली मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नात असतानाच माजी गोलंदाजाच्या या आरोपामुळे पाकिस्तानच्या अडचणींत वाढ झाली आहे. वकार युनूससह आजी-माजी गोलंदाजांच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी पाकिस्तानची काहीशी स्थिती झाली आहे. वकार युनूस हा पाकिस्तानच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक मानला जातो. ‘रिव्हर्स स्विंग’साठी तो एकेकाळी प्रख्यात होता. नव्वदच्या दशकात ‘रिव्हर्स स्विंग’च्या जोरावर त्याने आपली एक वेगळी ओळख जगासमोर निर्माण केली होती. मात्र, मोहम्मद आसिफने केलेल्या आरोपांमुळे युनूसच्या कामगिरीवर आता प्रश्न उठविण्यात येऊ लागले आहेत. युनूस हा चेंडूशी छेडछाड करायचा, त्यामुळेच ‘रिव्हर्स स्विंग’चे कौशल्य त्याला सर्वात आधी अवगत झाले होते, असेही आरोप आता होऊ लागले आहेत. ज्या संघाचा प्रशिक्षकच वादाच्या भोवर्यात अडकला आहे, मग अशा संघातील खेळाडूंचे काय होणार, असेही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मोहम्मद आसिफने नेमके याच वेळी वकार युनूसवर हे आरोप का केले, याचाही विचार होणे गरजेचे आहे. कारण, ‘पाकिस्तान क्रिकेट संघा’च्या प्रक्षिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार असून, त्याजागी लवकरच कोण्या व्यक्तीची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. युनूस यांच्यानंतर त्या जागी माजी कर्णधार आणि माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम अथवा माजी तेज गोलंदाज शोएब अख्तरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच आसिफ याने नेमकी हीच वेळ साधत हे आरोप केल्याचे काही क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.
द्वेषापोटी का होईना...
प्रशिक्षकपदाच्या निवडीचा काळ जवळ आल्यानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये द्वंद्व सुुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, माजी खेळाडूंमध्ये हे द्वंद्व सुरू होण्याची ही काही पहिली वेळ नाही. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये केवळ शीतयुद्धच नव्हे, तर अनेकदा हाणामारीही घडल्याच्या इतिहासाची नोंद आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज असणार्या शोएब अख्तरने एकेकाळी मोहम्मद आसिफच्या डोक्यावर चक्क बॅटने तडाखा हाणल्याची घटना घडली होती. एका सामन्यामध्ये आपल्या जागी मोहम्मद आसिफची निवड झाल्याच्या कारणातून अख्तरने आसिफवर चक्क ड्रेसिंग रूममध्येच बॅटने हल्ला केला होता. या प्रकारानंतर दोघेही अनेक वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावले गेले. या दोघांनाही आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करणे कठीण झाले. प्रशिक्षकपदाच्या निवडीची वेळ जवळ येऊ लागताच आता या दोन्ही माजी खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा चुरस वाढली आहे. एकेकाळचे हे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणवले जाणवणारे हे दोन्ही खेळाडू आता एकमेकांची स्तुतीही करत असतानाचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच अख्तरने आसिफच्या गोलंदाजीची तोंडभरून स्तुती केली होती. आसिफने नवख्या गोलंदाजांना प्रशिक्षण दिल्यास त्याचा नक्की संघाला फायदा होईल, असे अख्तरने म्हटले होते, तर आसिफने नुकत्याच एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वकार युनूसवर खळबळजनक आरोप करताना अनपेक्षितपणे अख्तरवरही स्तुतीसुमने उधळली होती. त्यामुळे वकार युनूस यांना हटविणे, हेच या दोघांचे मुख्य ध्येय असल्याचे दिसून येत असल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्ड’ सध्या युनूस यांना हटविण्याच्या मानसिकतेत नसल्याने अखेर मोहम्मद आसिफने प्रशिक्षकांचे भांडे फोडण्याचे ध्येय निश्चित केल्याची चर्चा आहे. युनूस यांची प्रतिमा मलीन झाली तरच पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड त्यांना पदावरून हटविण्याबाबत विचार करेल, असा मतप्रवाह पाकिस्तानच्या काही आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये आहे. त्यामुळेच आसिफने द्वेषापोटी का होईना, युनूस यांच्या बाबतीत खरे म्हटल्याचे पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहे. युनूस यांच्यावरील या आरोपांची चौकशी होणे फार गरजेचे असल्याच्या मुद्द्याकडेही अनेक क्रिकेट समीक्षकांनी लक्ष वेधले आहे. या चौकशीतूनच नेमके काय ते कळू शकेल, असे समीक्षकांचे म्हणणे आहे.
- रामचंद्र नाईक