‘कोविड-१९’ नंतरचे जग

    23-Feb-2021
Total Views | 319

Covid _1  H x W



२०२० हे वर्ष मानवी इतिहासात ‘कोविड-१९’चे वर्ष म्हणून ओळखले जाईल. प्रचंड वेगाने झालेला महामारीचा जगभर प्रसार, ‘लॉकडाऊन’, मृत्यूचे थैमान, सामाजिक आणि वैद्यकीय अस्पृश्यता, रोजगार गमावणे, उपासमार, ‘वर्क फ्रॉम होम’ अशा अनेक गोष्टी आपण पहिल्यांदाच अनुभवत होतो. हे सारे दुष्टचक्र संपण्याच्या आधी आपणच संपून जाऊ, अशी भीती प्रत्येकाला वाटत होती. ‘कोविड’नंतरचे जग कसे असेल? याबद्दल बरीच चर्चा होते. ‘कोविड’नंतरच्या जगाचा घेतलेला आढावा...
 
 
२०२१ वर्ष आशेचा किरण घेऊन उजाडले. फेबुवारी २०२१च्या मध्यापर्यंत भारतात ‘कोविड-१९’ची साथ बर्‍यापैकी नियंत्रणात आली होती. मास्क घालणे, हात वारंवार धुणे, ‘सोशल डिस्टन्सिंग’ हे अजून बराच काळ पाळावे लागणार आहे. लसीकरण कार्यक्रमांमध्ये संपूर्ण राष्ट्राचा सहभाग महत्त्वाचा आहे. खासकरून दाट वस्तीच्या झोपडपट्ट्या, ग्रामीण भाग, दुर्गम वनवासी भाग, वरिष्ठ नागरिक यांचेदेखील लसीकरण व्यवस्थित झाले पाहिजे. यातील एकही घटक जर असुरक्षित राहिला तर संपूर्ण देश असुरक्षित आहे.
 
 
ही महामारी एवढ्या झपाट्याने कशी पसरली? भविष्यात असे संकट पुन्हा येऊ नये म्हणून काय उपाययोजना केली पाहिजे? या सर्वांची उत्तरे आपणास शोधावी लागतील. आपल्यापैकी अनेकांनी दुष्काळ, महापूर, युद्ध परिस्थिती, भूकंप यांचा अनुभव पूर्वी घेतला असेल, पण गेल्या वर्षीचा अनुभव हा भयानक होता. पुढील अनेक पिढ्यांना असा अनुभव येऊ नये, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर आत्मपरीक्षणाची व शक्य असेल तेथे सुधारणा करण्याची गरज आहे. लहानपणी व शालेय जीवनात रेशनच्या लाईनमध्ये उभे राहणे, दळण दळायला जाणे, दूध घेऊन येणे, बाजारहाट करणे, आईला घरकामात मदत करणे आणि दिवसभर भरपूर चालणे आणि खेळणे ही माझी दिनचर्या होती.
 
 
आर्थिक चणचण असल्यामुळे बाहेरचे खाणे अगदी क्वचित होत होते. या सर्वांचा परिणाम म्हणून अंगकाठी उंच आणि बारीक होती. पुढे मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला आणि आईने माझी सगळी घरगुती कामे कौतुकाने बंद केली. ‘माझा लेक डॉक्टर होणार’ ही कल्पनाच तिला सुखावत होती. मेडिकल कॉलेजला स्पर्धेत टिकण्यासाठी तासन्तास अभ्यास करणे यामुळे हळूहळू वजन आणि आळस वाढू लागला. रोज काही वेळ स्वत:साठी देऊन त्यात योग, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार, इतर व्यायाम, खेळ यासाठी द्यावा, असे मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. मला फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यातच स्वारस्य होते. सभोवतालचे सुंदर जग बघण्यात मला स्वारस्य नव्हते. ती चूक आज उमगते, पण आता फार उशीर झाला आहे.
 
 
‘फॅमिली डॉक्टर’ म्हणून प्रॅक्टिस सुरू केल्यावर रुग्णांचे आजार, त्यांच्या सामाजिक समस्या, माझ्या कौटुंबिक जबाबदार्‍या, रोजच्या जीवनातील कटकटी यात चार दशके कुठे उडून गेली, हे कळलेच नाही. एका घाण्याच्या बैलाप्रमाणे मी गोलगोल फिरत होतो. मी असा का फिरतो व कुणासाठी फिरतो, याचा गंभीरपणे कधी विचारच केला नाही. सुखाच्या शोधात मी वणवण भटकत होतो, पण सुख हे बाहेरच्या जगात नाही तर आपल्या शरीरात व मनात आहे, हे कळायला वयाची ६० वर्षे घालवावी लागली. सुख हे आपल्या मन:शांतीत आहे व त्यासाठी ध्यानधारणेने मन:शांती नियमित मिळवणे जरुरी आहे, हे पटायला लागले. ६० वर्षांपर्यंतच्या आयुष्यात व्यायाम, योग, विपश्यना, नॅच्युरोपॅथी, आयुर्वेद, होमियोपॅथीचा अभ्यास, चिंतन, मनन, वाचन व लिखाण यात सुख शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण एका ठिकाणी मन रमले नाही. या प्रयत्नांमध्ये सातत्याचा अभाव होता. कदाचित तो माझा स्वभावदोष होता.
 
 
या सर्वांचा परिणाम म्हणून कळत-नकळत मी स्थूल प्रकृतीचा आणि सुस्त झालो होतो. साठी ओलांडल्यानंतर ब्रह्मविद्येच्या सान्निध्यात आलो आणि शरीरात व जीवनात जणू नवचैतन्य निर्माण झाले. शारीरिक व्याधी कमी होऊ लागल्या. औषधांचे डोस कमी होऊ लागले. शरीरात स्फूर्ती येऊ लागली. मन शांत होऊ लागले. गेली चार वर्षे सातत्याने ब्रह्मविद्येचा अभ्यास करत आहे. उर्वरित जीवन याच मार्गाने जाण्याची इच्छा आहे. बघूया. प्रारब्धात काय लिहिले आहे. जग एवढे सुंदर आहे, यातील निसर्ग ऋतू, पाने, फुले, पक्षी, जलचर प्राणी, माणसे हे सर्व चांगलेपणाने भरलेले आहेत. फक्त ते बघण्याची, त्यात आनंद मिळविण्याची आपली मानसिकता पाहिजे. हे माझे आत्मपरीक्षण होते. ‘कोविड-१९’ची महामारी जगभर एवढ्या झपाट्याने का पसरली, याची कारणे शोधली तर ती प्रामुख्याने पुढील प्रमाणे आहेत. १) मनुष्य प्रजातीचे विखुरलेपण : मानव जात म्हणून आपण एक कधीच नव्हतो. वर्णभेद, धर्मभेद, जातीभेद अणि राष्ट्रभेद या सर्वांनी आम्हाला ग्रासले होते. शेजारचे देश एकमेकांकडे शत्रू म्हणून पाहत होते. आपापल्या संरक्षण खर्चात वारेमाप वाढ करत होती. विश्वबंधुत्व ही कल्पना फक्त कागदावरच होती. आपण एकसंघ नाही, या गोष्टीचाच ‘कोविड-१९’ने अचूक फायदा घेतला व वर्षभर संपूर्ण जगात हाहाकार माजविला.
 
 
२) आरोग्य सेवेतील असमतोल : सरकारी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिका दवाखाना येथे नागरिकांसाठी अत्यल्पदरात वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. परंतु, तेथे पुरेसे डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचार्‍यांचा तुडवडा, औषधांचा तुडवटा, रुग्णांना दिली जाणारी तुसडेपणाची वागणूक यामुळे आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवेत सुधारणेला पुष्कळ वाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी दवाखाने हे प्राथमिक उपचारासाठी, रोगनिदान चाचण्यासाठी, फिजिओथेरपी व डेंटल ट्रीटमेंटने परिपूर्ण असावे. ज्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती करण्याची जरुर नाही, अशा रुग्णांचे निदान आणि उपचार अशा केंद्रांवर प्रभावीपणे व्हावेत म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी रुग्णालये, मेडिकल कॉलेज यावरील कामांचा ताण कमी होईल.
 
 
या ठिकणी एक ‘फॅमिली डॉक्टर’ची ‘ओपीडी’ असावी की, जेणेकरून किरकोळ लक्षणांचा आणि आजारांचा उपाय विनाविलंब होत राहील. सरकारी रुग्णालयांत समाजसेवकांचा व राजकीय पक्षांचा हस्तक्षेप कमी राहील, यावरदेखील उपाययोजना करावी लागेल. डॉक्टर-रुग्ण हे संबंध का बिघडले व ते पुन्हा कसे प्रस्थापित होतील, याकडे लक्ष दिले जावे. सरकारी डॉक्टर आणि खासगी ‘प्रॅक्टिस’ करणारे डॉक्टर यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव ही भारतीय आरोग्यसेवेची मोठी शोकांतिका आहे. दोन्ही बाजूने अहंकार आडवा येतो. ‘कोविड-१९’च्या महामारीत हे प्रकर्षाने जाणवले. सरकारी आव्हानांस खासगी डॉक्टरांचा प्रतिसाद मिळाला नाही. कारण, आतापर्यंत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने खासगी डॉक्टरांना कधी विश्वासात घेतले गेले नाही. त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्यात येत नाही. प्रायव्हेट व सरकारी डॉक्टरांमधील समन्वय अग्रक्रमाने साधक जावा.
 
 
प्राथमिक आरोग्य केंद्र : ‘फॅमिली डॉक्टर’ हा शहरी आरोग्यसेवेचा कणा आहे. दुर्दैवाने त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सध्या ‘फॅमिली डॉक्टर’ म्हणून ‘एमबीबीएस डॉक्टर’, ‘आयुर्वेदिक डॉक्टर’, ‘होमियोपॅथीक डॉक्टर’ आणि ‘बिनडिग्री’चे ‘बोगस डॉक्टर’ कार्यरत आहेत. दवाखाना टाकण्यासाठी परवाना का लागत नाही, हे मला गेली ४० वर्षे पडलेले कोडे आहे. ’आयुर्वेदिक डॉक्टर’ आणि ‘होमियोपॅथीक डॉक्टर’नी ‘अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस’ करावी की करू नये, याबाबतचा निर्णय केंद्रीय आरोग्य खात्याने त्वरित घ्यावा. कारण, हा निर्णय गेली अनेक दशके प्रलंबित आहे. यामुळे ‘फॅमिली डॉक्टरां’चे दवाखाने हे दलालीचे अड्डे झाले आहेत. ‘कट प्रॅक्टिस’चे सर्वत्र पेव फुटले आहे. याला ‘कन्स्लटंट’ की ‘फॅमिली डॉक्टर’ जबाबदार आहेत, हा वादाचा मुद्दा आहे. पण आता या विषयावर तोडगा निघावा. ‘बोगस डॉक्टर’ (बिनडिग्रीचे किंवा ‘बोगस सर्टिफिकेट’चे) डॉक्टर ही आरोग्य सेवेला लागलेली किड आहे.
 
 
ती समूळ नाहीशी झाली पाहिजे. ‘महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल(कौन्सिल)’नेदेखील आपल्या नोंदणीकृत डॉक्टरांच्या सर्टिफिकेटची पडताळणी करण्यास सुरुवात करावी. मधल्या काळात अनेक बोगस डॉक्टरांची नोंदणी झाली. आज ते समाजात उजळ माथ्याने मिरवतात. स्थानिक महानगरालिका ऑफिसमध्ये आणि पोलीस ठाण्यामध्येदेखील ‘फॅमिली डॉक्टरां’ची नोंदणी असावी. खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या निवासी डॉक्टर आणि नर्सेसचाही बोगसपणा तपासण्याची यंत्रणा असावी. डॉक्टर-रुग्ण संबंध बिघडण्यास या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. ‘कोविड-१९’ नंतर या सर्व समस्या अग्रक्रमाने सोडवाव्या लागतील. मेडिकल कॉलेज आणि सरकारी इस्पितळात अनेक रिक्त पदे आहेत ती पदे तातडीने भरावी लागतील.
 
 
३) अन्न पुरवठ्यातील असमतोल : हृदय, मेंदू, मूत्रपिंड, गुदद्वार असे अनेक अवयव आपल्या शरीरात आहे. प्रत्येकाचे कार्य महत्त्वाचे आहे. एकाचे जरी कार्य बिघडले तरी संपूर्ण शरीराला त्याचा त्रास होतो. ‘लॉकडाऊन’मध्ये हे बघायला मिळाले. धुणीभांडी करणारे, किरकोळ काम करणारे यांचे रोजगार सुटले. आपल्यापैकी किती जणांनी यांची चूल बंद आहे की चालू आहे, याची चौकशी केली ?. जनकल्याण समितीसारख्या अनेक सेवाभावी संस्था त्यांना मदत करण्यास पुढे आल्या परंतु, ही मदत पुरेशी नव्हती. श्रीमंताच्या लग्न समारंभात व पार्ट्यांमध्ये जेवढे अन्न फुकट जाते, तेवढ्यात एका संपूर्ण गरीब वस्तीचे जेवण होऊ शकेल. अन्नाच्या वाटपातील असमतोलामुळे आजही अनेक भूकबळीने जातात. हे सर्व कमी झाले पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण व्हावी.
 
 
४) सामाजिक असमतोल : आपला देश सुमारे ७०० वर्षे पारतंत्र्यात होता. याला मुख्य कारण आम्ही जातीत व पंथांमध्ये विखुरले गेलो होतो. अस्पृश्यांना, वनवासींना आम्ही आमच्यापासून लांब ठेवत होतो. त्यांच्या विकासाची आम्हाला काळजी नव्हती. आपल्या समाज व्यवस्थेतील हा दोष परकीयांनी हेरला आणि आम्हास गुलाम बनविले. स्वातंत्र मिळाल्यानंतरदेखील अनुसूचित जाती व जमाती यांचा विकास ज्या गतीने होणे अपेक्षित होते तो झाला नाही. याला कारणीभूत आमची भ्रष्ट सरकार यंत्रणा. सामाजिक आरक्षण हे बोगस कागदपत्रांच्या आधारे धनदांडग्यांनी ओरबाडले. त्याला कारण आमची भ्रष्ट सरकारी यंत्रणा. सामाजिक समरसता जर खर्‍या अर्थाने प्रस्थापित करायची असेल तर सरकारी दरबारी असलेल्या भ्रष्ट कारभारावर कडी नजर ठेवावी लागेल. ‘कोविड-१९’ महामारीनंतर अनेक गोष्टींमध्ये बदल अपेक्षित आहेत. या महामारीतून माणसातील माणुसकी जागी व्हावी, ही प्रार्थना. सर्वाचे मंगल होवो.
 
 
 

- डॉ. मिलिंद शेजवळ
 
९८९२९३२८०३
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121