
जगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणार्या ‘ऑस्कर’, ‘नोबेल’ आदी पुरस्कारांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. प्रत्येक वर्षी पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर ‘आम्ही देश म्हणून कुठे?’ अशा प्रकारची विश्लेषणे तज्ज्ञांकडून ठरलेलीच. या अशा पुरस्कारांमधून एखाद्या देशाची किंवा त्या देशातील राज्यांची, भाषेची व समूहांची चिकित्सा सुरू होते. भारतासारख्या देशामध्ये विविध राज्यांची भाषा, संस्कृती वेगळी असल्याने त्या राज्याच्या विशिष्ट यशाकडे सर्वांचेच लक्ष असते. परंतु, जेव्हा देश म्हणून जागतिक स्तरावर देशाच्या यशाविषयी मूल्यमापनाची वेळ येते, तेव्हा मात्र भारताच्या वाट्याला आलेल्या पुरस्कारांची संख्या अल्प जाणवते. नुकतेच 2021च्या ‘ऑस्कर’च्या नामांकन यादीतून भारतामध्ये लोकप्रियता मिळालेला ‘जल्लीकट्टू’ हा चित्रपट ‘ऑस्कर’च्या सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीमध्ये स्थान मिळवू शकला नाही, तर ‘ऑस्कर’च्या लाईव्ह अॅक्शन लघुपटाच्या श्रेणीमध्ये करिष्मा देव-दुबे दिग्दर्शित ‘बिट्टू’ हा लघुपट भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. ‘लाईव्ह अॅक्शन’ लघुपटाच्या श्रेणीसाठी १७४ लघुपट दाखल झाले व त्यामधून दहा लघुपटांची निवड करण्यात आली असून, ‘बिट्टू’ हा लघुपट भारताकडून यावर्षी ‘ऑस्कर’च्या शर्यतीत आहे. भारताकडून यापूर्वी बर्याच चित्रपटांना ‘ऑस्कर’साठी पाठविण्यात आले. परंतु, वर्षाला साधारण ३०० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होणार्या आपल्या देशामध्ये एखाद्याच चित्रपटाला नामांकन मिळावे, ही खरी शोकांतिका. जागतिक पातळीवरील चित्रपटांचे आशय अणि विषयामध्ये नावीण्य असते, असे सांगितले जाते. मग भारतीय चित्रपटकारांना असे आशयघन चित्रपट का बनविता येत नाहीत? सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्दर्शकाने ज्याप्रमाणे विषय मांडले, त्याप्रमाणे सध्या चित्रपट तयार होताना दिसत नाहीत. भारतीय चित्रपटसृष्टीवर प्रेमकथांचा प्रभाव असलेले चित्रपट निर्माण होताना दिसतात. कारण, त्यांचा व्यावसायिक अंगाने विचार केल्यास ‘बॉक्स ऑफिस’वर कमाई करणे, हेच मुख्य ध्येय दिसते. भारतीय चित्रपटांना जर जागतिक स्तरावर ओळख निर्माण करायची असेल, तर आपल्या विषयांना जागतिक पटलावर मांडणे गरजेचे आहे.
मराठीला आस उद्याची...
चित्रपट माध्यम हे विसाव्या शतकातील सर्वात तरुण माध्यम. अशा या माध्यमातून जगभरातील अनेक विषयांवर त्या-त्या देशांमध्ये विविध भाषांतून भाष्य केले जाते. ‘जागतिक सिनेमा’ म्हणून इराणी, रशियन, फ्रेंच, अमेरिकन या सिनेमांकडे पाहिले जाते आणि त्यांच्या सिनेमांना जगभरातून इतर भाषकांचा प्रेक्षकवर्गदेखील मिळतो. ‘जागतिक चित्रपट’ अशी बिरुदावली घेऊन हे चित्रपट जगभरात पाहिले जातात. परंतु, मराठी चित्रपट किंवा भारतीय चित्रपटांना ‘जागतिक’ अशी बिरुदावली का लावली जात नाही? कारण, मराठी चित्रपटातून हाताळले जाणारे विषय जगाच्या भावविश्वाशी मिळते-जुळते नसावेत किंवा मराठी चित्रपटकारांना आपला विषय जगाच्या पटलावर पाहिला जाईल, अशी निर्मिती करता न येणे, हे यामागील एक प्रमुख कारण असावे. परंतु, मराठी चित्रपटांमध्ये ‘श्वास’, ‘कोर्ट’ या चित्रपटानंतर फार कमी चित्रपटांना नामांकन मिळू शकले. म्हणूनच जगाने स्वीकारलेल्या पुरस्कारांमध्ये ‘आपण मागे का आहोत?’ हा चिंतनाचा विषय आहे. मुळात मराठी भाषकांसाठी निर्माण झालेला मराठीचा प्रेक्षकवर्ग हा मर्यादित असून, मराठी चित्रपटांवर होणारा खर्च हा अत्यल्प आहे. मानवी भावभावनांचे विषय मांडताना मराठी चित्रपट कुठेतरी त्याच त्याच विषयांमध्ये अडकला आहे की, मराठी चित्रपटसृष्टीसाठी मिळणारे अत्यल्प वेतन आणि याची व्यावसायिक गणिते कुठेतरी आम्हाला जागतिक पातळीवर ओळख मिळविण्यासाठी अडथळा ठरतायेत, हा खरा प्रश्न आहे. दरवर्षी घोषित होणार्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘आर्ट् फिल्म्स’मध्ये मराठीचा डंका होता. परंतु, अशा फिल्म व्यावसायिकरीत्या यशस्वी होताना दिसत नाहीत. जर कलेला जागतिक स्तरावर ओळख आणि तिचा परीघ वाढवायचा असेल, तर व्यावसायिक गणितांचा विचार करून इथल्या चित्रपटसृष्टीला अंगभूत बदल करावे लागतील. कारण, आज मराठी भाषक प्रेक्षकवर्ग विविध भाषांतील चित्रपटांना पसंती देताना दिसतो. परंतु, मराठी म्हणून आम्ही चित्रपटांना फक्त मनोरंजनाचे माध्यम म्हणून बघतो. कोणत्याही समाजाची अभिव्यक्ती तिच्या जडणघडणीमधून तयार होत असते. मराठी चित्रपटांचे विषय जरी स्थानिक असले, तरी संदर्भीय भाषा ही जागतिक होणे गरजेचे आहे, तसे झाले तर मराठी चित्रपटांना ‘ऑस्कर’मध्ये नामांकन मिळताना दिसेल.