होमियोपॅथीच्या उपयोगाचा व व्याप्तीचा जर विचार केला असता, असे लक्षात येते की, अशी कुठलीही शरीरसंस्था, अवयव आणि आजार नाही की, ज्यावर होमियोपॅथीचे उपचार होत नाहीत. त्यामुळेच होमियोपॅथीची औषधे व उपचार हे जगाला एक खात्रीशीर गुणकारी पर्याय आहे.
होमियोपॅथीचे तत्त्वज्ञान जर आपण पाहिले, तर असे लक्षात येते की, होमियोपॅथी नुसत्या शरीराला व पेशींना उपचार देत नाही, तर त्या शरीरात राहणार्या माणसाला, त्याच्या मन, बुद्धी व चैतन्यशक्तीला उपचार देत असते. म्हणजेच काय, तर होमियोपॅथी नुसत्या आजारालाच बरे करते असे नाही, तर आजारी माणसालाही बरे करते.
'Homeopathy treats Man in disease, Not Just disease in man'. या तत्वानुसार जेव्हा होमियोपॅथिक ‘केस टेकिंग’ केले जाते, त्यावेळी त्या रुग्णाचा सर्व दृष्टिकोनांतून अभ्यास केला जातो व त्याच्या शारीरिक व मानसिकतेचा अभ्यास खोलवर जाऊन केला जातो. शारीरिक व्याधींबरोबरच, मानसिक व्याधी, समज-गैरसमज, भावना, भावनात्मक अडथळे, संवेदना इत्यादींचा अभ्यास करताना रुग्णांचा संपूर्ण जीवनपटच आपण अभ्यासत असतो आणि या अभ्यासातूनच मग रुग्णाला नक्की काय आजार आहे, याचे निदान केले जाते.
आजारी पडण्याचे मूळ कारण काय आहे, याचा शोध घेतला जातो. यालाच ‘कॉन्स्टिट्यूशन थेरपी’ असे म्हणतात व ही पूर्णपणे ‘वैयक्तिकीकरणा’वरच (Individualization) वर अवलंबून असते. या प्रकारच्या एकमेकाद्वितीय अभ्यासामुळेच जेव्हा होमियोपॅथीच्या व्याप्तीचा विषय निघतो, त्यावेळी इतर आजारांच्या बरोबरच एक मोठ्या आजारांचा समूह लक्षात येतो व तो म्हणजे मानसिक आजार.
मानसिक आजारांचा अभ्यास व मानसिकतेचा अभ्यास (Psychiatry & Psychology) हे दोन्ही विषय मानवी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण, मन ही शरीराची दारे उघडणारी किल्ली आहे. ‘माईंड ईज अ की टू मॅन’ व या मानसिकतेतूनच मूळ आजाराची निर्मिती होत असते, हे आता सिद्ध झाले आहे.
आजाराचा ‘फंडामेंटल कॉज’ मूळ मनात असू शकतो, हे सिद्ध झाले आहे आणि म्हणूनच मानसिक आजारात होमियोपॅथीचे महत्त्व अधोरेखित होते आहे. कारण, माणसाचे मन, शरीर व चैतन्यशक्ती यांचा एकत्रितपणे अभ्यास करणारी ‘होमियोपॅथी’ ही जगातील एकमेव औषधप्रणाली आहे.
मानसिक रोगांमध्ये कित्येक वेळा रुग्णाला कुठलाही शारीरिक पातळीवरचा त्रास नसतो. (प्युअरली सायकोलॉजीकल) कधी कधी रुग्णाला असलेल्या प्रचंड ताणतणावाचा पर्यायाने शरीरावर विपरित परिणाम होत असतो. (Psychosomatic diseases) तर काही आजारांमध्ये असे दिसून येते की, शारीरिक आजार जर चुकीच्या औषधांनी दाबले गेले, तर पुढे जाऊन ते मानसिक आजारांमध्ये परावर्तित होतात. या सर्वांवरील होमियोपॅथीची पकड आता आपण पुढे पाहणार आहोत.
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
- डॉ. मंदार पाटकर
९८६९०६२२७६