‘अ‍ॅडोप्शन’ ही एक ‘गुड न्यूज’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

book adoption.jpg_1 
‘दत्तक मुलांच्या व पालकांच्या भावना त्यांच्याच शब्दांत’ म्हणत जे जे दत्तकपणाच नातं रूजवत असतात, अशा सगळ्यांना ‘अ‍ॅडोप्शन - एक गुड न्यूज’ हे पुस्तक वर्षा विनोद तावडे यांनी अर्पण केले आहे. ‘अ‍ॅडोप्शन’ संदर्भातल्या सर्वच भावनिक, मानसिक आणि सामाजिक गुंतागुंतीचा अत्यंत सखोल आणि संवेदनशील मागोवा या पुस्तकात त्यांनी घेतला आहे. दत्तक मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे अत्यंत तर्कसुसंगतपणे आणि वास्तवाशी निगडित असे भावविश्व हळूवार उलगडणारे हे पुस्तक... या पुस्तकातले मनाला भिडलेले काही..
नाही उदरी पोसले
नऊ महिने मी तिला
बाळंतपणाच्या यातना
हृदयातून मी सोसल्या

‘अ‍ॅडोप्शन - एक गुड न्यूज’ या पुस्तकात ‘जन्म नाही दिला तिला’ या कवितेत वर्षा पवार तावडे या तरल आणि अत्यंत प्रभावीपणे दत्तक मूल असलेल्या पालकाची भावना व्यक्त करतात. आपण आजपर्यंत हिंदी किंवा कोणत्याही भाषिक भारतीय सिनेमांत काय पाहिलेले असते, तर ‘मैं आपके बच्चे की मॉ बननेवाली हू’ असे लाजत सांगणारी ती आणि मग तीला उचलून घेत गरा गरा फिवत ‘ओहो...ओहो.... ‘मैं बहुत खूश हू, मैं बाप बन गया’ असे म्हणणारा तो... चित्रपटात आपण आई किंवा बाप झालो, हे व्यक्त करण्याचा हा ‘टिपिकल सीन.’ पण, त्याही पलीकडे जाऊन एखादे विवाहित जोडपे किंवा एकल महिला किंवा पुरूषही मुलांना जन्म न घालता दत्तक मूल घेऊन पालक होऊ शकतात, हे तसे फारसे प्रभावीपणे मांडले गेलेले नाही. त्यामुळे दुर्देवाने समाजात आजही दत्तक पालक-बालक याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. या सगळ्या प्रश्नांचा सकल मागोवा घेत अत्यंत समर्पकपणे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘अ‍ॅडोप्शन - एक गुड न्यूज’ या पुस्तकात केला गेला आहे. या पुस्तकाची संकल्पना, संकलन आणि संपादन वर्षा पवार तावडे यांचे आहे. १५२ पृष्ठांच्या या पुस्तकामध्ये एकच मूल दत्तक असलेले, एक मूल ‘बायोलॉजिकल’ आणि एक मूल दत्तक, एकल पालकत्व असलेल्या पालकांचे दत्तक मूल, लहान वयात दत्तक गेलेले, मोठ्या कळत्या वयात दत्तक गेलेले आता शिक्षण सुरू आहे, अशी दत्तक मूल आणि लग्न झालेले त्यांनाही मूलं झाली आहेत, अशा दत्तक व्यक्ती इतक्या विविध प्रकारच्या दत्तकत्वाच्या अनुभवांचे संकलन केले आहे. दत्तकत्वाशी निगडित ३६ मनोगत या पुस्तकामध्ये आहेत. त्यापूर्वी डॉ. मनोज भाटवडेकर यांची प्रस्तावना आणि संपादक संकलनकर्त्या वर्षा पवार -तावडे यांचे मनोगत आहे. तसेच ‘अ‍ॅडोप्शन’ क्षेत्रात काम करणार्‍या वंदना बागवे पाटील किंवा बाल हक्क कार्यकर्ता वासंती देशपांडे, वात्सल्य ट्रस्ट अलिबाग शाखा प्रमुख शोभा जोशी यांचेही ‘अ‍ॅडोप्शन’ क्षेत्रात काम करतानाचे अनुभव अत्यंत महत्वाचे आणि मार्गदर्शक आहेत. या पुस्तकाबद्दल ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी म्हणतात की, ”माणसामध्ये असलेल्या आस्था, संगोपन, वात्सल्य, स्वीकार यांसारख्या उन्नत भावनांना खतपाणी देण्यासाठी म्हणून या ‘अ‍ॅडोप्शन’ प्रक्रियेचा जन्म झाला असावा आणि म्हणून हे पुस्तक वाचताना पदोपदी, शब्दोशब्दी आपल्याला जाणवेल की, ‘अ‍ॅडोप्शन’ ही ‘गुड न्यूज’ का आहे. कारण,ती ‘माणुसकीसाठीची गुड न्यूज’ आहे.” या पुस्तकातून दत्तक मुलांच्या व्यक्त होणार्‍या प्रगल्भ दृष्टिकोनामुळे या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचेही ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांनी अभिनंदन केले आहे.





असो. मुलांना दत्तक घेतलेले पालक आणि त्या पालकांकडे दत्तक गेलेली मूलं यांचे केवळ अनुभवकथन करणारे हे पुस्तक अजिबात नाही, तर त्यापलीकडे जाऊन समाजात पालक नसलेल्या मुलांना हक्काचे पालक मिळावेत आणि ज्यांना मूल हवे आहे, अशा पालकांना आपले असे मूल मिळावे, यातले जे काही निर्भिड सत्य आणि अंत:करणातील ममत्व आहे, त्याबद्दल स्पष्ट भाष्य करणारे हे पुस्तक आहे. मुलांना दत्तक घेतल्यावर पालकांना आणि मूल दत्तक गेल्यावर मुलांना काय समस्या आल्या? त्यातून पालकांनी आणि प्रसंगी बालकांनीही यशस्वीपणे मार्ग कसा काढला, हे मांडणारे एक अनोखे भावदर्शन म्हणजे हे पुस्तक. ‘तुला आम्ही दत्तक घेतले आहे’ हे त्या दत्तक मुलाला सांगणे हा प्रत्येक पालकासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण. पण, हा क्षण कसा गोड करायचा, हे या पुस्तकात सहज सांगितले आहे. मुलांना लहानपणीच योग्य ती उदाहरणे देऊन दत्तक म्हणजे काय? तसेच त्यांच्या दत्तकात्वाविषयी सहजपणे सांगावे. एक दत्तक मूल आणि त्यांच्या पालकांचे तसे त्यांच्या इतर सर्वच नातेवाईकांचे, शेजार्‍यांचे संबंध सहज आणि नैसर्गिक असावेत, दत्तक घेणे हे लपवू नये आणि मिरवूही नये, असे पालकांचे वागणे असावे. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दत्तक प्रक्रिया सांगावी, त्यातले माणूसपण आणि महत्त्व पटवून द्यावे, जेणेकरून आपली मित्र किंवा मैत्रीण ही दत्तक घेतलेली आहे, हे कळल्यावर इतर मूलं चिडवणार नाहीत, अशा सूचना आपल्या कथारूपी मनोगतातून मुलांंनी आणि पालकांनीही दिल्या आहेत. यात आलोक भगत यांनी आपले मत व्यक्त केले आहे की, ’‘दत्तक बालक आणि पालक यामध्ये वयातलं अंतर जास्त नको.” या सगळ्यांची मनोगतं म्हणजे मन ओतून केलेले निवेदन आहे. आपले अनुभव इतरांना मार्ग दाखवतील, या प्रेरणेने मांडलेले सोप्या शब्दांतली तरल शब्दकृती आहेत.






या पुस्तकातील सगळ्यांचे अनुभव, तर थेट काळजाला भिडतात. जसे ”तू माझ्या पोटातून आली नसलीस ना तरीही तुला बघण्याआधीच माझ्या मनात माझ्या हृदयात तुझा जन्म झाला होता,” असे अन्वी तावडे आपल्या मनोगतामध्ये आईने म्हणजे वर्षा तावडे यांनी सांगितले, असे सांगते, तर रागिणी चंदात्रे यो आपल्या लेकीला अमृताला सांगतात की, ”तुला माहिती आहे ना की, पोटातून बाळ येताना ते बाळ मुलगा असते किंवा मुलगी असते. पण, आम्हाला तर मुलगीच हवी होती. म्हणून आम्ही तुला दामले आजोबांच्या लहान मुलांच्या घरातून आपल्याकडे आणलं.” श्रावणी पेठे आणि तिची आई स्मिता पेठे यांनी कावळीणीचे घरटे पाहणे, त्यात कोकीळेचे पिल्लू वाढणे, छोट्या श्रावणीला ते जाणवणे आणि त्या क्षणी स्मिता यांनी सांगणे की, ”ते दत्तक पिल्लू आहे. तुलाही मी दत्तक घेतले आहे. जन्म देणार्‍या आयांच्या गर्भाशयात मूल वाढतं; मी तुला माझ्या हृदयात वाढवलय्” तर पुढे ’नवीन नात्यांच्यी गुंफण’ मनोगतामध्ये बिरवा भणगे ही इयत्ता दहावीतली विद्यार्थिनी आपला अनुभव सांगताना म्हणते, “एकदा चर्चा करताना आर्ईने (अपर्णा भणगे) मला सांगितलं की, ”तुझा जन्म आमच्या पोटी न होता, आमच्या अंत:करणात, हृदयात झाला आहे आणि म्हणून तू आमची आहेस.” बालक पालकांच इतकं हृदयस्थ नातं मांडणारं हे पुस्तक!





या पुस्तकात वर्षा पवार-तावडे यांचेही मनोगत एकदोनदा येते. त्यामध्ये प्रसारमाध्यमांतून दत्तकत्वासंदर्भात पसरवल्या गेलेल्या चुकीच्या कल्पनांचा त्यांनी चांगलाच समाचारही घेतला आहे. ‘भावंडांतलं दत्तक मूल’ या लेखात त्यांनी पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर दुसरे मूल दत्तक घेणार्‍यांची कारणे आणि पहिलं मूल दत्तक घेणार्‍यांची कारणं सांगितली आहेत. या लेखात त्या लिहितात की ”पालकत्व जबाबदारीने निभावण्याची तयारी असलेल्या पालकांना मुलांचे संगोपन ही आनंदयात्रा असल्याचा अनुभव नक्कीच लुटता येतो. मूल जन्मजात असो की दत्तक, या आनंदयात्रेत फरक पडत नाही.” तर पुढे आपल्या मनोगतामध्ये आर्या काटीका ही बारावीची विद्यार्थिनी म्हणते, ”कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी दत्तक घेणं ही एक गुंतागुंतीची आणि भावनिक प्रक्रिया असू शकते. परंतु, सत्य हेच आहे की, तुम्ही एक कुटुंब आहात आणि हेच महत्त्वाचे आहे. दत्तक घेणं ही बाळाशी असलेली आयुष्यभराची एक ‘कमिटमेंट’ आहे आणि ती बाळाला जन्म देण्यापेक्षा वेगळी नाही.”





दत्तक गेलेल्या मुलांचे पुढे काय होत असेल, असाही प्रश्न दत्तक प्रक्रियेपासून दूर असलेल्या सर्वसामान्यांना पडतो. तर या पुस्तकातली यादी पाहिली की, सत्य जाणवते ते हे की, आज या मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने स्वत:चे अस्तित्व उभे केले आहे. कुटुंबाचे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी ते तत्पर आहेत. वर्षा पवार-तावडे यांचे अभिनंदन आणि धन्यवादही की, त्यांनी दत्तक आणि त्यांसंदर्भातल्या सगळ्याच बाबी समाजसमोर इतक्या उत्कट आणि निर्भिडपणे मांडल्या. एकंदर काय तर, पोटातून जन्म घेणारं बाळ हे जसं कुटुंबासाठी, समाजासाठी ‘गुड न्यूज’ आहे, तितकीच आणि तशीच ‘अ‍ॅडोप्शन’ ही एक ‘गुड न्यूज’ आहे.



 
पुस्तकाचे नाव : अ‍ॅडोप्शन - एक गुड न्यूज
संकल्पना, संकलन, संपादन :
वर्षा पवार-तावडे
प्रकाशक : वात्सल्य ट्रस्ट, मुंबई
प्रथम आवृत्ती : नोव्हेंबर, २०२१
पृष्ठसंख्या : १५२
मूल्य : रू. १२५



 
@@AUTHORINFO_V1@@