बॉलीवूडकरांचा अनिर्बंध कारभार

    16-Dec-2021   
Total Views | 104

bollywood_1  H
 
नियम हे केवळ म्हणण्यासाठी, कागदोपत्री सर्वांसाठी समान असतात. पण, प्रत्यक्षात या नियमांच्या अंमलबजावणीतही प्रचंड तफावत आढळतेच. पैसा, प्रतिष्ठा आणि पदाला एक न्याय आणि यापैकी कुठल्याही पंक्तीत न बसणाऱ्यांवर मात्र अन्याय! मुंबईतही सर्वसामान्यांना एक न्याय आणि बॉलीवूडकरांना दुसरा न्याय, असे प्रकार यापूर्वीही वारंवार निदर्शनास आले आहेत. म्हणजे एकीकडे कोरोनाच्या जाचक निर्बंधांपोटी मुंबईकरांनी अतोनात प्रवासकळा सोसल्या. पण, बॉलीवूडकरांना मूळचा कोरोना व्हायरस असो किंवा ‘डेल्टा’, ‘ओमिक्रॉन’ असे त्याचे ‘व्हेरिएंट’ असो, याची तसूभरही फिकीर नाही. जणू कोरोना, त्याचा प्रादुर्भाव आणि मग त्यासाठी प्रशासनाचे सर्व नियम हे ‘आम आदमी’साठीच! बॉलीवूडकर, मुंबईकर नाहीतच! ते या शहराचे लखलखते तारे... अगदी ‘खास आदमी!’ म्हणूनच एकीकडे मुंबई महानगरपालिका ‘ओमिक्रॉन’चा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचा रतीब घालत असताना, बॉलीवूडकर मात्र पार्ट्यांच्या नशिल्या ‘नाईट्स’मध्ये आकंठ बुडालेले दिसतात. अशीच एक सेलिब्रिटींची पार्टी नुकतीच उजेडात आली अन् तिथे काही सिनेतारकांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात येताच, पालिका आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना आपण बॉलीवूडकरांनाही वेगळा निर्बंधांचा संदेश द्यायला हवा, याची खडबडून जाग आली. बॉलीवूड आणि मुंबईचे अतूट नाते, मुंबईचे अर्थचक्र हे सगळे कबूलच. पण, फक्त ही ‘इंडस्ट्री’ लाखोंना रोजगार देते म्हणून, त्या लाखोंपैकी केवळ काही तारेतारकांना नियम, निर्बंधांतून सूट मिळावी, का कुणीकडचा न्याय? रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडासाठी अक्षरश: तुटून पडणाऱ्या पालिकेला अशा पब्ज, पार्ट्यांच्या जागाच ठाऊक नाहीत की, पार्ट्यांध बॉलीवूडकरांवर कारवाईचा बडगा उगारुच नका, असे ठाकरे सरकारमधील कोणा युवामंत्र्याचे आदेश आहेत? त्यामुळे बॉलीवूडकरांनाच जर निर्बंधांपासून ते ड्रग्जपर्यंत कशाचेच वावडे नसेल, तर अशांवर नियमानुसार कडक कारवाई ही व्हायलाच हवी. निर्बंध हे मध्यमवर्गीयांसाठी आणि उच्चभ्रूंना मात्र स्वैराचाराची मुभा, हा दुटप्पीपणा जनतेच्याही लक्षात राहणाराच आहे. तेव्हा, महापौरबाईंनी पार्ट्यांवरुन आता उगाच आटापिटा करुन कारवाईचे ढोल न बडवता, अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिका काय करणार, ते जाहीर करावे!
 

तरी बॉलीवूडचा पुळका का?

 
एकीकडे मुंबईत शिवसेनेच्या महापौर ‘त्या’ पार्टीनंतर बॉलीवूडच्या नावाने शिमगा करताना दिसल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील त्यांचाच घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र याच बॉलीवूडकरांचा फारच पुळका आला. म्हणूनच बॉलीवूडला आणि मुंबईला कसे ‘एनसीबी’सारख्या केंद्रीय यंत्रणांकडून नाहक बदनाम वगैरे केले जात आहे, असे सांगत बॉलीवूडच्या वकील म्हणून सुप्रियाताई संसदेत तावातावाने बोलत होत्या. “बॉलीवूडमधील सगळेच कलाकार नशेच्या आहारी गेले आहेत आणि ते बिघडलेले आहेत, असे एक चित्र तयार केले गेले आहे. ही गंभीर बाब असून बॉलीवूडला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे,” असा आरोप यावेळी बोलताना सुप्रियाताईंनी केला. सुप्रियाताईंना प्रश्न पडला की, देशभरात ड्रग्जची प्रकरणं समोर येत असताना केवळ महाराष्ट्रालाच का लक्ष्य केले जाते? खरंतर हा प्रश्न विचारण्यापूर्वी सुप्रियाताईंनी वानगीदाखल केवळ पंजाब या एका राज्यातील ‘एनसीबी’च्या कारवाईचा आढावा घेतला असता, तर त्यांंना मुळात हा प्रश्न पडलाच नसता. पण, फक्त आर्यन खान आणि मुंबईतीलच इतर सेलिब्रिटी ड्रग्जच्या जाळ्यात वारंवार अडकत असतील, तर महाराष्ट्राकडे तुमच्याच सरकारचे लक्ष नसल्यामुळे उलट महाराष्ट्र दिवसेंदिवस बदनाम होतोय, हे सुप्रियाताईंनी ध्यानात घ्यावे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि बॉलीवूडचे घनिष्ठ संबंध काही लपून राहिलेले नाहीतच. त्यामुळे बॉलीवूडचा सुप्रियाताईंना इतकाच पुळका असेल, तर या क्षेत्रातील इतर कामगारांचाही त्यांनी जरा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कोरोनाच्या निर्बंधांमुळे चित्रीकरण बंद असतानाही खोऱ्याने कमाविणाऱ्या तारेतारकांच्या पोटात खड्डा पडला नाही. जे हाल झाले ते या बॉलीवूडमधील कष्टकऱ्यांचे. त्यांच्यासाठी महाविकास आघाडी सरकार म्हणून काय केले, ते सुप्रियाताईंनी सांगावे. त्यामुळे बॉलीवूड म्हणजेच महाराष्ट्र-मुंबई, बॉलीवूड म्हणजे फक्त कलाकार मंडळी अशी फुटकळ समीकरणे न मांडता, या ‘इंडस्ट्री’ला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘एनसीबी’चे सुप्रियाताईंनी खरंतर आभारच मानायला हवे. पण, जिथे सुप्रियाताईंच्याच पक्षातील वाचाळ प्रवक्त्याला ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्याची जाहीर बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात माफी मागावी लागते, म्हणूनच खुपते तिथे दुखते!
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121