रायगडमधून 'क्लिक बीटल'च्या नव्या प्रजातीचा शोध

    29-Nov-2021   
Total Views | 319
click beetle_1  



मुंबई (अक्षय मांडवकर) - रायगड जिल्ह्यातून
ढाल किड्याच्या (बीटल) नव्या प्रजातीचा शोध लावण्यात वन्यजीव संशोधकांना यश मिळाले आहे. 'क्लिक बीटल' (click beetle) वर्गातील या प्रजातीचे नामकरण 'क्रिप्टलॉस एलव्हीओलेटस' असे करण्यात आले आहे. 'क्लिक बीटल' (click beetle) दुलर्क्षित कीटकावरील हे संशोधन समोर आल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


भारतात कीटकशास्त्रामध्ये अजूनही फारसे संशोधनाचे काम झालेले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये कीटकशास्त्रात रस असणारी एक फळी निर्माण झालेली आहे. परिणामी कीटकांच्या काही प्रजातींचा उलगडा होण्यास मदत झाली आहे. नुकताच रायगड जिल्ह्यामधून 'क्लिक बीटल'च्या (click beetle) नव्या प्रजातीचा उलगडा करण्यात आला आहे. सोमय्या महाविद्यालयाचे जीवशास्त्र व कीटकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डाॅ. अमोल पटवर्धन आणि हर्षद पारेकर यांनी या प्रजातीचा उलगडा केला आहे. शुक्रवारी प्रकाशित झालेल्या 'जर्नल आॅफ थ्रेट्रेंड टॅक्सा' या संशोधन पत्रिकेत हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला. २०१६ साली पावसाळी हंगामात या बीटल (click beetle) प्रजातीच्या मादीचा एक नमुना डाॅ. अमोल पटवर्धन यांना मुरूड तालुक्यात सापडला होता. तेव्हापासून या प्रजातीवर संशोधनाचे काम सुरू होते.

मुळातच भारतात कीटकशास्त्रात फारसा अभ्यास झालेला नसल्याने या प्रजातींची माहिती विखुरलेल्या अवस्थेत असल्याचे डाॅ. अमोल पटवर्धन यांनी सांगितले. त्यामुळे या संशोधनामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामध्ये वेळ गेला. या नव्या प्रजातीचा नमुना गोळा केल्यानंतर त्याच प्रकारचा एक नमुना 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'मध्ये संग्रहित होता. मात्र, १९०६ सालच्या या नमुन्याची ओळख पटलेली नव्हती. अशावेळी वन संशोधन संस्था, देहरादून आणि परदेशातील संग्रहलयातील नमुन्यांची माहिती घेऊन आकारशास्त्राचे आधारे या नव्या प्रजातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती संशोधन हर्षद पारेकर यांनी दिली. नव्याने उलगडण्यात आलेली 'क्रिप्टलॉस एलव्हीओलेटस' ही प्रजात 'क्रिप्टलॉस' असून या प्रजातीच्या मादीचे नमुने आजवर आम्हाला मिळाल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. तसेच या कुळावर फार कमी अभ्यास झाल्याने त्यांचा अधिवास, खाद्य आणि वर्तणूक याविषयीची कमी माहिती उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केली. नव्याने सापडलेली ही प्रजात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक या राज्यांमध्ये सापडत असल्याचे ते म्हणाले.




'क्लिक बीटल' म्हणजे ?
नव्याने शोधण्यात आलेली 'क्रिप्टलॉस एलव्हीओलेटस' ही प्रजात 'क्लिक बीटल' (click beetle) वर्गात मोडते. बऱ्याचदा ढाल किडे (click beetle) जमिनीवर पालथे पडल्यानंतर त्यांना पुन्हा सरळ होता येत नाही. अशा वेळी त्यांची शिकार होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, 'क्लिक बीटल' (click beetle) वर्गातील ढाल किड्यांच्या गळ्याजवळ स्प्रिंगसारखा एक अवयव असतो. हे किडे जमिनीवर पालथे पडल्यावर हा अवयव आवळला जाऊन वेगाने स्प्रिंगसारखा उडतो. या झटक्यामुळे हे कीडे मूळ अवस्थेत येतात. म्हणून त्यांना 'क्लिक बीटल' (click beetle) म्हटले जाते.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121