कर्तव्यातून घडतो माणूस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Chandrakant Patil_1 
 
 
 
विष्णु सवरा म्हणजे अतिशय तल्लख स्मरणशक्ती, तीव्र संघर्षयोद्धा आणि २४ तास वनवासी समाजाच्या प्रगतीचा ध्यास लागून राहिलेलं व्यक्तिमत्त्व. दि. ९ डिसेंबर रोजी त्यांच्या निधनाचं वृत्त मला जेव्हा समजलं, तेव्हा मी प्रवासात होतो. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनाला अतिशय वेदना झाल्या. गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाला जे धक्के सहन करावे लागले आहेत, त्यामुळे अतिशय दु:ख होतं. ज्या नेत्यांनी पक्षाचे एक लहानसे रोप लावून त्याची तन-मन-धनाने जोपासना केली, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत असताना, ते नेते आपल्याला सोडून जात असल्याची जाणीवच अस्वस्थ करणारी आहे.
 
 
पालघरसारख्या वनवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे चिंतामणजी वनगा यांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली होती, ती अद्याप भरून निघाली नाही. आता विष्णुजींच्या रूपाने पुन्हा धक्का बसला. खरंतर चिंतामणजी आणि विष्णुजींनी पालघरसारख्या वनवासी भागात कम्युनिस्टांशी कडवा संघर्ष करून, हिंदुत्वाचे आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाचे विचार इथल्या जनमानसात रुजविले. त्यांच्या जाण्याने पक्षाचे जे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून निघणार नाही. विष्णुजी आणि माझा १९७७ पासूनचा परिचय. सन १९७७ मध्ये जेव्हा मी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो, तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू दरवेळी मला पाहायला मिळाले. १९७७ सालच्या मे महिन्यात अभाविपच्या वतीने पालघर जिल्ह्यात आयोजित ‘श्रमानुभव’ शिबिरात विष्णुजींचा आणि माझा पहिल्यांदा परिचय झाला. अतिशय शांत, सुस्वभावी, मितभाषी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व. पण, हिंदुत्व आणि संघाच्या कामात ते नेहमीच आक्रमक असायचे. त्या काळात वनवासी भागात संघाच्या कामाला कम्युनिस्टांचा विरोध असायचा. हा विरोध मोडून काढण्यासाठी विष्णुजींनी चिंतामणजींच्या मदतीने कडवा संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष मी अतिशय जवळून पाहिला.
आपलं महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर त्यांना स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली. पण, वनवासी भागातील नागरिकांचे प्रश्न, त्यांचे दैन्य, पिळवणूक यामुळे नोकरीत ते जास्त काळ रमले नाहीत. संघाच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा या विषयावर नेहमी संवाद व्हायचा. त्यातूनच त्यांची भेट महाराष्ट्र भाजपला बहुजनांचा चेहरा मिळवून देणाऱ्या वसंतराव भागवतांशी झाली. वसंतरावांनी त्यांना राजकारणात येण्याची सूचना केली. त्यांची सूचना शिरसावंद्य मानून राजकारणात प्रवेश केला. स्वर्गीय गोपीनाथरावांनी त्यांच्यातील वनवासी बांधवांमधली तळमळ पाहून त्यांना विधानसभेत पाठविण्याचे ठरविले. पण, राजकारणात नवखे असल्याने विष्णुजींना सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्य सुरूच ठेवले. १९९० मध्ये वाडा मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर विष्णुजींनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. वनवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कडवा संघर्ष करून, त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं हा कटाक्ष कायम ठेवत, त्यांनी वनवासी बांधवांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यातूनच सन १९९० ते २०१४ सलग सहा वेळा वनवासी भागातून निवडून येण्याचा विक्रम विष्णुजींनी करून दाखविला. माझ्या मते, सलग ३० वर्षांच्या प्रदीर्घ काळात विधिमंडळात वनवासी समाजाचं नेतृत्व करणारे ते एकमेव नेते असतील.
अभाविपचं काम थांबविल्यानंतर मी रा. स्व. संघाचं काम सुरू केलं. त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि नितीनजींच्या आग्रहामुळे मी राजकारणात सक्रिय झालो. त्यांच्या सूचनेनुसारच २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवून, मी आमदार झालो. त्यावेळी अधिवेशन काळात जेव्हा-जेव्हा माझी विष्णुजींशी भेट व्हायची, त्या प्रत्येक भेटीत मला त्यांच्याकडून अनेक नवीन विषय समजायचे. काँग्रेसचे वनवासी भागातील नेते कम्युनिस्टांना हाताशी धरून कशाप्रकारे भोळ्या-भाबड्या वनवासी बांधवांची पिळवणूक करत आहेत, याची अनेक प्रकरणे त्यांच्याकडून ऐकायला मिळायची. त्यांची ही पिळवणूक थांबावी यासाठी ते सभागृहात नेहमीच आक्रमक असायचे. वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी शेकडो कपात सूचना, लक्षवेधी, तारांकित प्रश्न मांडून सरकारचे वनवासी बांधवांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यासोबतच आमदार निधी, डोंगरी विकास निधी, विशेष घटक योजना, नाबार्ड, हुडको, विशेष दुरुस्ती, वैधानिक विकास, कोकण विकास आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा कायापालट केला. त्याशिवाय वनवासी बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी त्यांच्या (वनवासी बांधवांच्या) शिक्षणाची मोहीम सुरू केली. त्यांचे हे सर्व काम पाहताना, त्यांच्यातील एक द्रष्ट्या नेत्याचं दर्शन व्हायचं. अतिशय सामान्य भासणारा हा व्यक्ती किती लांबचा विचार करत आहे, हे पाहून त्यांचा अभिमान वाटायचा.
२०१४ साली देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात त्यांना वनवासींचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी त्याचे अक्षरश: सोने केले. आदिवासी विकास विभागाचे मंत्री झाल्यानंतरही त्यांचा जो साधेपणा होता, तो तसाच कायम राहिला. समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने चौकशी करणं, त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सतत पाठपुरावा करत राहणं, ही त्यांची प्रवृत्ती मंत्री झाल्यानंतरही कायम होती. आपल्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी वनवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यातीलच एक सांगायचा तर वनवासी बांधवांच्या खावटी कर्जमाफीचा निर्णय. राज्यातील वनवासी भागात सावकार व व्यापाऱ्यांकडून वनवासी बांधवांची वारंवार पिळवणूक होते. ही पिळवणूक थांबविण्यासाठी १९७८ पासून शासनाच्या वतीने खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली. यामध्ये वनवासी भागातील पाच संवेदनशील आणि उर्वरित दहा जिल्ह्यांचा वनवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील जिल्ह्यात खावटी कर्जवाटप होते. याअंतर्गत वनवासी बांधवांना ३० टक्के अनुदान आणि ७० टक्के कर्ज स्वरूपात देण्यात येते. याचे वाटप आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने होते. सन २००९ ते २०१४ काळात २४४ कोटी ६० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. या कर्जासह त्यावरील ११६ कोटी ५७ लाख रुपयांचे व्याज थकीत होते. त्याच्या वसुलीसाठी शासनाकडून प्रयत्न होत होते. पण, बदलत्या वातावरणामुळे आणि वनवासी बांधवांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे याची परतफेड करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे वनवासी बांधव त्रस्त होते. परिणामी, कर्जाची रक्कम वाढते व पुढील कर्ज मिळू शकत नाही. त्यांना दिलासा देण्यासाठीचा विषय सवराजींनी देवेंद्रजींसमोर मांडला. देवेंद्रजींनी तत्काळ आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी देण्यात आलेले २४४.६० कोटींचे कर्ज आणि त्यावरील ११६.५७ कोटींचे व्याज असा एकूण ३६१ कोटी १७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या निर्णयाचा नाशिक, जव्हार, नंदुरबार, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी, जुन्नर आदी भागातील तब्बल ११ लाख २५ हजार ९०७ शेतकरी-शेतमजुरांना फायदा झाला.
दोन वर्षांपासून ते आजारी असले, तरी ते बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करतील, अशीच सर्वांची अपेक्षा होती. त्यामुळे विष्णुजींचे जाणे, हा आपल्याला सर्वांना मोठा धक्का आहे. कमी बोलून कामावर जास्त विश्वास ठेवणारा, कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ असणारा, वनवासी भागात कम्युनिस्टांशी कडवा संघर्ष केलेला, असा सच्चा कार्यकर्ता अचानक गेला. त्यांच्या जाण्याने पक्षामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरणार नाही. भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

- चंद्रकांतदादा पाटील
(लेखक भारतीय जनता पक्षाचे
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@