रत्नागिरी - ७ दिवसांच्या प्रयत्नानंतर बिबट्याच्या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2021   
Total Views |

leopard _1  H x



चिपळूणमधील धामणवणे गावातील घटना 


मुंबई (अक्षय मांडवकर) - चिपळूण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर प्राणीमित्रांच्या मदतीने बिबट्याच्या दोन पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणली. गेल्या आठवड्यात ही घटना चिपळूणमधील धामणवणे गावात घडली. पिल्ले सापडल्याच्या सात दिवसांनंतर मादी बिबट्या या पिल्लांना घेऊन पुन्हा जंगलात पसार झाली. अशा पद्धतीने बिबट्याच्या पिल्लांचा मादीसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचा हा रत्नागिरीतील दुसराच प्रयत्न आहे.


चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावामधील विंध्यवासिनी मंदिराच्या मागील बाजूस ११ जानेवारी रोजी बिबट्याचे पिल्लू आढळून आले. येथील ग्रामस्थ खांडेकर यांच्या घराच्या बाजूस असणाऱ्या मालकी जंगलामधील ओढयाच्या कपारीत हे पिल्लू बसून होते. खांडेकर यांनी वन्यजीवप्रेमी ओमकार बापट यांच्याशी संपर्क साधला. बापट यांच्या माहितीवरुन चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील आणि पशुवैद्यक डाॅ. प्रसाद खेडकर वनाधिकाऱ्यांसह गावात दाखल झाले. त्याच दिवशी पिल्लाला सापडलेल्या ठिकाणीच ठेवून परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून त्याची मादी बिबट्या येण्याची वाट पाहण्यात आली. मात्र, १२ जानेवारी रोजी पिल्लू त्याच ठिकाणी सापडल्याने अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. हे पिल्लू नर प्रजातीचे होते. 
 

leopard _1  H x 
 
 
त्यादिवशी पिल्लाला पशुवैद्यकांनी दूध पाजले. आईसोबत पुनर्भेट घडविण्याच्या आशेने पिल्लाला लाकडाच्या खुल्या पेटीत ठेवून सापडलेल्या ठिकाणीच पुन्हा ठेवण्यात आले. सायकांळी सात वाजण्याच्या सुमारास स्थानिकांना याठिकाणापासून १,५०० मीटर अंतरावर ग्रामस्थ रोहन शेंबेकर यांच्या मालकी क्षेत्रातील ओढ्याच्या कपारीमध्ये बिबट्याचे दुसरे पिल्लू दिसले. १३ जानेवारी रोजी सकाळी या पिल्लाला वन विभागाने ताब्यात घेतले. ते मादी प्रजातीचे होते. मात्र, १३ जानेवारी रोजी देखील पहिल्या पिल्लाजवळ लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये मादी बिबट्याची हालचाल दिसली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या दोन्ही पिल्लांना दूध पाजवून पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. १४ जानेवारी रोजी पिल्लांना ठेवलेल्या लाकडी बाॅक्सच्या आसपास मादी बिबट्या पाहणी करुन गेल्याचे कॅमेरा ट्रॅपच्या छायाचित्रात दिसले. मात्र, ती पिल्लांना घेऊन गेली नव्हती. 
 
 
 
 
आशा पल्लवीत 
 
 
मादी बिबट्या पाहणी करुन गेल्याने वन अधिकाऱ्यांना आशेचा किरण दिसला. . पशुवैद्यकांमार्फत दिवसातून तीन वेळा दूध पाजून पुन्हा एकदा पिल्लांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. यावेळीस जुन्नर बिबट्या निवारा केंद्राशी सल्लामसलत करुन लाकड्याच्या बाॅक्सऐवजी क्रेडमध्ये पिल्लांना ठेवण्यात आले. १५ जानेवारी रोजी कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रे तपासली असता मादी बिबट्या त्याठिकाणी येऊन गेल्याचे दिसले. परंतु, यावेळीसही ती पिल्लांना घेऊन गेली नव्हती. १६ जानेवारीला मादी त्याठिकाणी न आल्याचे निदर्शेनास आले. त्यादिवशी विटांची चौकट करुन दोन्ही पिल्लांना त्यामध्ये ठेवण्यात आले. १७ जानेवारीला कॅमेरा ट्रॅप बंद झाल्याने छायाचित्रे मिळाली नाहीत . मात्र, त्याठिकाणी पिल्ले न आढळल्याने अधिकाऱ्यांनी आसपासच्या परिसरात तपासणी केली. मात्र, परिस्थितीवरुन मादी पिल्लांना घेवून गेल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. तसेच अशा प्रकारे बिबट्यांच्या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणल्याचे रत्नागिरीतील हे दुसरेच प्रकरण असल्याचे वन्यजीवप्रेमी ओमकार बापट यांनी सांगितले. या कार्यात वनपाल की.पत्की, वनरक्षक रा.शिंदे, द.सुर्वे, वन्यजीवप्रेमी ओमकार बापट, निलेश बापट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

 
 
@@AUTHORINFO_V1@@