जगाने दखल घेतलेला दिग्दर्शक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |

akshay indikar_1 &nb


‘स्थलपुराण’, ‘त्रिज्या’, ‘उदाहरणार्थ नेमाडे’ सारख्या चित्रपटांनी मराठी चित्रपटांना जागतिक पातळीवर नेणार्‍या दिग्दर्शक, लेखक अक्षय इंडीकर याच्याविषयी...


लहानपणी प्रत्येकजण कोणते ना कोणते स्वप्न नक्की बघतो. प्रत्येकाची लहानपणीची ही स्वप्नदेखील तशी वेगळीवेगळी असतात. पण, काही माणसं आपल्या डोळ्यातील ती स्वप्नं पुढे घेऊन जातात, ती साकारतात आणि आयुष्यात यशस्वीही होतात. पण, काही माणसं अशीही असतात की, जी स्वप्नांच्याही पुढे पाऊल टाकत ती अक्षरश: जगतात.असाच एक लहानपणी जादूगार होण्याचे स्वप्न रंगवणारा मुलगा पुढे जाऊन सिनेमा लिहितो काय, दिग्दर्शक होतो काय आणि जागतिक पातळीवर आपल्या नावाचा ठसाही उमटवतो.अकलूज, सोलापूरसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेला आणि नुकताच ‘आशियातील सिनेमाचा ऑस्कर’ म्हणून संबोधल्या जाणार्‍या ‘यंग सिनेमा अ‍ॅवॉर्ड’ने गौरविण्यात आलेला, लोककलावंत कुटुंबाचा वारसा लाभलेला, मराठमोळा दिग्दर्शक म्हणजे अक्षय इंडीकर.‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरीबद्दल अक्षयला सन्मानित करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अ‍ॅकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.


अक्षयचा जन्म १६ मे, १९९१ रोजी सोलापूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अक्षय मूळचा कर्नाटकचा. लोककलेची पार्श्वभूमी असलेले त्याचे कुटुंब. त्याचे वडील पेशाने शिक्षक. ते नोकरीनिमित्त अकलूज, सोलापूर येथे स्थायिक झाले. त्याचे बालपण अकलूजसारख्या ग्रामीण भागात गेले. त्याने त्याचे माध्यमिक शिक्षण अकलूजमध्ये पूर्ण केले. लोककलावंतांच्या कुटुंबातून पुढे आलेला अक्षय दहावीमध्ये अत्यंत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. पुढे शिक्षणासाठी त्याने पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण, कलेचा पिंड असल्याने तो विज्ञान शाखेत रमला नाही. नाटक, एकांकिकांची त्याला आवड निर्माण झाली. पण, त्यामध्येही त्याचे मन फारसे रमले नाही. चित्रपटांची लहानपणापासून आवड असलेला अक्षय चित्रपटांमध्ये जास्त रमला. गावाकडून आलेला अक्षय शहरामध्ये लवकर समरस झाला नाही. शहराची भाषा, राहणीमान आणि शहरातील एकूणच राहण्याची, व्यक्त होण्याची पद्धत त्याला कुठेतरी विचार करण्यास प्रेरणा देऊन गेली. अक्षय अकरावीत अनुत्तीर्ण झाल्यानंतर बारावीसाठी पुन्हा अकलूजमधील महाविद्यालयात बारावी पूर्ण केली. अक्षयने अकलूजमध्ये असताना विपूल वाचन केले. मराठी साहित्यिकांचे साहित्य त्याने वाचले. वाचनाची आवड त्याला पुढे चित्रपट लिहिण्यासाठी उपयोगी पडली.अक्षयच्या चित्रपटांचे विषयही त्याने घेतलेल्या अनुभवांचे प्रतिबिंबच म्हणावे असे आहेत. त्याने लिहिलेला ‘त्रिज्या’ हा चित्रपटही त्याने अनुभवलेल्या भावविश्वावरती भाष्य करणारा आहे. ‘त्रिज्या’ या चित्रपटाला चीनमधील 22व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘न्यू एशियन टॅलेंट’साठी नामांकन मिळाले. सोबतच, ‘बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘क्रिस्टल बेअर’साठी नामांकन मिळाले. ‘विहीर’, ‘किल्ला’, ‘सैराट’ या सिनेमांच्या रांगेत बर्लिन आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकण्याचा मान त्याला मिळाला. ज्या चित्रपट दिग्दर्शकांचे चित्रपट पाहून त्याने त्याच्या प्रवासाला सुरुवात केली, अशा दिग्गजांच्या पक्तींमध्ये आज अक्षयने आपले स्थान निर्माण केले आहे.



अक्षयने, सर्वप्रथम ‘डोह’ नावाचा लघुपट बनविला. तो लघुपट सर्वांच्या पसंतीस उतरल्यानंतर त्याने ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावरती माहिती-कथनात्मक चित्रपट ‘उदाहरणार्थ नेमाडे’चे दिग्दर्शन केले. मराठीमध्ये असा प्रयोग त्याने करीत, स्वतःची आगळीवेगळी छाप पाडली. ‘स्थलपुराण’मधून एका छोट्या मुलाची कथा त्याने मांडली. अक्षयने महाविद्यालयात असताना केलेले वाचन त्याला त्याच्या प्रवासात महत्त्वाचे ठरते, असे तो आवर्जून सांगतो. त्याने ‘एफटीआयआय’मधून चित्रपट माध्यमाचे शास्त्रीय शिक्षणही घेतले आहे. चित्रपट बनविणे, हा अक्षयचा ध्यास असल्याने तो चित्रपटनिर्मिती करण्याकडे प्राधान्याने लक्ष देतो.मराठी चित्रपटांना जागतिक व्यासपीठांवर घेऊन जाणार्‍या दिग्दर्शकांपैकी अक्षय इंडिकर हा तरुण दिग्दर्शक आजघडीला चित्रपट क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करू इच्छिणार्‍या कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. लहानपणी सोलापूरमध्ये पाहिलेले तामिळ, हिंदी, कन्नड चित्रपट ते वैश्विक सिनेमा, असा त्याचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी असून तो सध्या चित्रपटांचे शास्त्रीय शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे.कला प्रकारातील सर्वात तरुण असलेले माध्यम म्हणून चित्रपट क्षेत्राकडे बघितले जाते. या माध्यमांचा समाजाच्या जडणघडणीवरती प्रत्यक्ष परिणाम होत असल्याने चित्रपट क्षेत्राचे व्याकरण समजून घेणे आजघडीला महत्त्वाचे असून, या माध्यमातून आपण आपले असे सर्वस्व जगाला देऊ शकतो, असा विश्वास तो बोलून दाखवितो.जागतिक पातळीवर मराठी चित्रपटांचा डंका निर्माण करण्यामध्ये अक्षय इंडिकरसारख्या तरुण दिग्दर्शक, लेखकाचा मोलाचा वाटा आहे, अशा या दिग्दर्शक, लेखकास त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!


- स्वप्निल करळे
@@AUTHORINFO_V1@@