पुणे : कोरोना काळात रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही ९ मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले.धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकरांना डावलत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी असंवेदनशीलता दाखविली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली, जी निगेटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र तिथेही त्रास सुरू होता. त्यांची कोपरगावमधे अॅंटीजेन टेस्ट करण्यात आली, जी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर रविवारी ३० जुलैला रात्री त्यांना एम्ब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आले आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने जंबो हॉस्पिटलमधे भरती केले.
जंबो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. मंगळवारी त्यांची ऑक्सिजन पातळी ७८ पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती. अशी अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते . मंगळवारी रात्री एक अॅम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहोचली, पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचे सांगण्यात आले. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचे सांगितले. थोड्याच वेळात कार्डिॲक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली.पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. व वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.
फेसबूक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कितीही आरोग्य यंत्रणा सक्षम असली असा दावा केला असला तरीही अशा प्रकरणांमुळे एका पत्रकाराला व्हेंटीलेटर, रुग्णवाहिका आणि वेळेत उपचारासाठी बेड मिळणे पुण्यासारख्या शहरात कठीण होत असल्याने हे दावे किती फोल आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पांडुरंग रायकर यांच्या कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. दरम्यान, रायकर यांच्या मृत्यूचा अहवाल मागवला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. श्रीमंत लोक अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार करत असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत, असा दावाही आरोग्य मंत्र्यांनी केला आहे.