संगीत मार्तंड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020   
Total Views |

pt. jasraj_1  H


भारतीय शास्त्रीय संगीताचे आधारवड पं. जसराज यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा आढावा घेणारा हा लेख...


कोरोना संक्रमणाच्या या काळात शास्त्रीय संगीताचा एक आधारस्तंभ सोमवारी निखळून पडला. भारतीय शास्त्रीय संगीताचा आधारवड असलेला हा माणूस गमावल्याने संगीत जगतातल्या अजून एका पर्वाचा अंत झाला. हा माणूस म्हणजे ‘संगीत मार्तंड’ पंडित जसराज. संगीत क्षेत्रातील आपल्या आठ दशकांहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘मेवाती’ घरण्याची गायकी सातासमुद्रापार पोहोचवली. शास्त्रीय, उप-शास्त्रीय, भक्तिसंगीत, चित्रपट, अल्बम अशा अनेक प्रकारांमध्ये मुशाफिरी करण्याबरोबरच ‘हवेली’ संगीताची नवकल्पित शैली त्यांनी प्रसिद्ध केली. देशासह परदेशातील विद्यार्थ्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे धडे दिले. अनेक मानसन्मान मिळवले. त्यांच्या देहावसानाने संगीत विश्वाची अकल्पित हानी झाली आहे.



पं. जसराज यांचा जन्म २८ जानेवारी, १९३०साली हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील पिली मंदोरी या गावात झाला. त्यांचे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब होते. त्यांचे वडील पंडित मोतीराम हे स्वत: कुशल गायक आणि संगीतकार होते. वयाच्या तिसर्‍या वर्षी पं. जसराज आपल्या वडिलांचे शिष्यत्व स्वीकारले. मात्र, १९३१साली मीर उस्मान अली खान यांच्या दरबारात राज्य संगीतकार म्हणून नेमणूक होण्याच्या दिवशीच पं. मोतीरामांचे निधन झाले. त्यावेळी पं. जसराज अवघ्या चार वर्षांचे होते.त्यानंतरच जसराजांनी आपले थोरले बंधू गायक पं. मणीराम यांच्याकडे संगीत शिक्षणास सुरुवात केले. तारुण्यापर्यंत ते हैद्राबादमध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर ‘मेवाती’ घराण्याच्या गायकी शिकण्याच्या ओढीने त्यांनी गुजरातमधील सानंद गाठले. शास्त्रीय संगीताला समर्पित करुन सानंदचे ठाकूर साहिब महाराज जयवंतसिंग वाघेला यांच्याकडून त्यांनी संगीत प्रशिक्षणास सुरुवात केली. १९४६मध्ये जसराजजी कोलकात्त्याला गेले आणि तेथे त्यांनी रेडिओसाठी शास्त्रीय संगीत गाण्यास सुरुवात केली.



गायिका बेगम अख्तर यांच्याकडून प्रेरणा घेऊन जसराज यांनी शास्त्रीय संगीत गाण्यास सुरुवात केली. कोलकत्त्यामध्ये रेडिओवर शास्त्रीय संगीत गात असतानाच वयाच्या २२व्या वर्षी म्हणजेच १९५२साली त्यांनी आपली पहिली शास्त्रीय मैफील सादर केली. नेपाळचे राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांच्या काठमांडू येथील दरबारात त्यांनी आपले सादरीकरण केले. ‘मेवाती’ घराण्याच्या गायिकीची कला अंगभूत करण्याबरोबरच त्यांनी ‘आगरा’ घराण्याचे स्वामी वल्लभदास दामुलजी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गतही प्रशिक्षण घेतले. ‘मेवाती’ हे घराणे आपल्या ‘ख्याल’ गायकीसाठी ओळखले जाते. असे असताना, जयराजींनी त्यामध्ये थोडी लवचिकता आणली. ‘ख्याल’ बरोबरीनेच ‘ठुमरी’चेही सादरीकरण केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आपल्या गाण्यात इतर घराण्यांतील संगीत शैलीचा समावेश केल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. मात्र, त्यांनी या टीकेची पर्वा केली नाही. विविध घटकांच्या माध्यमांतून त्यांनी आपल्या गायकीला धार आणली. जसराजांनी जुगलबंदी संकल्पनेवर आधारित संगीत प्रकार रुढ केला. ज्याला ‘जसरंगी’ या नावानेही ओळखले जाते. यामध्ये पुरुष आणि महिला गायिका एकाचवेळी सादरीकरणामध्ये वेगवेगळे राग गातात. जसराजजी ‘अबीरी तोडी’ आणि ‘पतदीपकी’ यांच्यासह अनेक दुर्मीळ राग सादर करण्यासाठीही परिचित होते.



पंडित जसराजांनी संगीतापेक्षा स्वत:ला मोठा असल्याचा दावा कधीच केला नाही. अनेकदा त्यांच्या मैफिलींमध्ये संगीताची शक्ती दाखविणारे किस्सेही घडले आहेत. एकदा राग ‘धुलिया मल्हार’ गाताना त्यांच्या उत्कट प्रतिभेमुळे दुष्काळग्रस्त भागात अवकाळी पाऊसही पडला होता. १९८७ साली वाराणसीमधील संकटमोचन हनुमान मंदिरात मैफील सादर करत असताना प्रेक्षकांमध्ये हरीण येऊन बसले होेते. १९९० साली त्यांना खालसा कॉलेज अमृतसर येथे सादर करण्यास आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा त्या ठिकाणी असे घोषित करण्यात आले की, “कोई भारत से आया है पंडित जसराज.” त्यावेळी जसराजींनी ४५मिनिटांचे सादरीकरण केले. त्यानंतर शीख स्वत: म्हणाले, “ये सड्डे भारत के पंडित जसराज है.” त्याच्या ‘ओम’ आणि ‘अल्लाह’ या संगीताच्या फ्युजनने पाकिस्तानमधील प्रेक्षकांना त्यांच्या पायाशी येण्यास भाग पाडले होते. शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करण्याव्यतिरिक्त, जसराज यांनी मंदिरांमध्ये उप-शास्त्रीय संंगीताचे सादरीकरण केले. ‘हवेली’ संगीत सारखी उप-शास्त्रीय संगीत शैली त्यांनी मंदिरांमध्ये सादरीकरण करुन लोकप्रिय केली. त्यांनी १९६६साली प्रसिद्ध झालेल्या ’लडकी सह्याद्री की’ या चित्रपटासाठी संगीतकार वसंत देसाई यांच्याकरिता राग ‘अहिर भैरव’मध्ये तयार केलेल्या ‘वंदना करो’ हे गाणे त्यांनी गायले. ‘बीरबल माय ब्रदर’ या चित्रपटाच्या ध्वनिफितीसाठी गायक पंडित भीमसेन जोशी यांच्यासह एक युगुल गीत सादर केले. विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२०’ (२००८) नावाच्या भय चित्रपटासाठीही त्यांनी ‘वड़ा तुमसे है वडा’ ही गीत गायले.


संगीत सादरीकरणाबरोबरच जसराज यांनी उत्तम शिष्यही घडवले. अटलांटा, टोरोंटो, न्यूयॉर्क, न्यू जर्सी, पिट्सबर्ग, मुंबई याठिकाणी त्यांनी शास्त्रीय संगीत शिक्षणासाठी अ‍ॅकॅडमी सुरू केल्या. वयाच्या ९०व्या वर्षीही ते स्काईपद्वारे आपल्या काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत होते. सप्तर्षी चक्रवर्ती, संजीव अभ्यंकर, व्हायोलिन वादक कला रामनाथ, संदीप रानडे, शहनाई वादक लोकेश आनंद, तृप्ती मुखर्जी, सुमन घोष, अनुराधा पौडवाल, साधना सरगम ही त्यांच्या प्रमुख्य शिष्यांची नावे आहेत. आपल्या ८०हून अधिक वर्षांच्या संगीत कारकिर्दीत त्यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘संगीत नाटक अकादमी फेलोशिप’, ‘पु.ल.देशपांडे जीवनगौरव पुरस्कार’, ‘स्वाथी संगीत पुरस्कार’, ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत जीवन पुरस्कार’, ‘गंगुबाई हंगल जीवनगौरव पुरस्कार’, ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आणि ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कारा’ने गौरवित करण्यात आले. १७ऑगस्ट रोजी झालेल्या त्यांच्या देहावसानाने संगीत क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. अशा या थोर कलावंताला श्रद्धांजली!

@@AUTHORINFO_V1@@