सुशिक्षिततेवर प्रश्नचिन्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2020   
Total Views |

USA_1  H x W: 0


सुशिक्षितांचा देश म्हणून ओळखला जाणारा, सर्व अत्याधुनिक सुविधांनी व विचारांनी युक्त अशी महासत्ता आपल्या मागासलेल्या विचारसरणीचे दर्शन सध्या घडवत आहे. नागरिकांच्या अशा कामांमुळे अमेरिकेत कोरोनावर नियंत्रण प्राप्त करणे सध्या कठीण होत चालल्याचे चित्र आहे.



कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे सुरक्षा आहे. हे आज जगाच्या पाठीवर सर्वत्र सिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने सगळीकडे आवाहनदेखील करण्यात येत आहे. जगातील नागरिक त्या आवाहनास प्रतिसाद देत स्वतःची सुरक्षा करण्यास आणि कोरोनापासून बचाव करण्यास प्राधान्य देत आहेत. विकसनशील देशात याबाबत आधीच सजगता बाळगताना नागरिक दिसतात. मात्र, सुशिक्षितांचा देश म्हणून ओळखला जाणारा, सर्व अत्याधुनिक सुविधांनी व विचारांनी युक्त अशी महासत्ता आपल्या मागासलेल्या विचारसरणीचे दर्शन सध्या घडवत आहे. नागरिकांच्या अशा कामांमुळे अमेरिकेत कोरोनावर नियंत्रण प्राप्त करणे सध्या कठीण होत चालल्याचे चित्र आहे. एका महिन्यात अमेरिकेत नैमेत्तिकरित्या आढळणार्‍या कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांत ७५ हजार, ६०० कोरोना रुग्णांची भर अमेरिकेत पडली आहे.



अमेरिकेच्या दृष्टिकोनातून आणि अमेरिकेच्या समोर मागास किंवा विकसनशील म्हणून गणल्या जाणार्‍या व सर्वाधिक कोरोनापीडित असलेल्या ब्राझील व भारत या देशातील एकूण रुग्णसंख्येपेक्षा हे प्रमाण निश्चितच जास्त आहे. अमेरिकेच्या तुलनेत विचार केल्यास ब्राझीलमध्ये २४ तासांत ३३ हजार, ३५९, तर भारतात ३४ हजार, ८२० रुग्ण कोरोना रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतील कोरोना नियंत्रण स्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तेथील प्रशासनाने आरोग्यस्थितीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, टेक्साससह १८ राज्यांत ‘रेड झोन’ घोषित केला आहे. अमेरिकेत ‘रेड झोन’ जाहीर करण्याचे गणित हे एक लाख रुग्ण संख्येमागे १०० कोरोना रुग्ण असे गृहीत धरले जात आहे. अमेरिकेतील कोरोना स्थिती नियंत्रणात न येण्यामागे नेमके काय कारण आहे. तसेच या स्थितीवर नेमके नियंत्रण कसे प्राप्त करता येईल याबाबत अभ्यास करण्यासाठी व्हाईट हाऊसच्या माध्यमातून मागील आठवड्यात एक अहवाल तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. हा अहवाल अंतर्गत असल्याने तो जाहीर करण्यात आला नव्हता. त्यात अमेरिकन प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे टांगली गेल्याचेही समोर आले होते. या अप्रसिद्ध अहवालानुसार अमेरिकेत जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे पालन व्यवस्थितरित्या करण्यात आले नसल्याचे सामोर आले होते. अमेरिकेतील नागरिकांनी घरात राहणे पसंत न करता रस्त्यावर हिंडणे जास्त पसंत केल्याचे समोर आले आहे.




तसेच मास्कचा वापर न करणे, समूहाने एकत्र येणे अशा कोरोना फैलावणार्‍या बाबी करण्यास जास्त प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे.या राज्यांतील लोकांनी कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे अहवालात नमूद केले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३७ लाख, ७१ हजार, १०१ रुग्ण आढळून आले आहेत, तर १ लाख, ४२ हजार, ८० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील संसर्गरोग तज्ज्ञांनी कोरोनाचा फैलाव रोखणेकामी मास्क वापरणे अनिवार्य करावे, अशी सूचना केली होती. त्यास उत्तर देताना कोरोनापासून संरक्षणासाठी लोकांना मास्क लावण्याचे आदेश दिले जाणार नाही, अशी भूमिका ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. या सर्व घडामोडी पहाता महासत्तेचे प्रशासन आणि तेथील नागरिकांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. विकसनशील देशात अमेरिकेपेक्षा शिक्षणाच्या सुविधा कमी असतानादेखील तेथील नागरिक प्रगल्भ आहेत. मात्र, नागरिकांवर नियंत्रण आणण्यात आणि आरोग्यमूलक निर्णय घेत ते राबविण्यात अमेरिका सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे महासत्ता म्हणजे बडा घर पोकळ वासा आहे काय? आणि ते जागतिक महामारीमुळे सिद्ध झाले आहे काय? अशी शंका निर्माण होत आहे. कोरोनाच्या काळात जागतिक राजकारणात सक्रियता दाखविणे, दोन देशांच्या मुद्द्यात स्वतःहून उडी घेणे व त्यावेळी आपले जागतिक नेतृत्व वारंवार पुढे आणणे यात अमेरिकेने कायम शिघ्रता दाखवली. अशी तत्परता अमेरेकेने स्वतःच्या देशातील स्थिती सुधारण्यात का दाखवली नाही? हा प्रश्न जगास आगामी काळात भेडसावण्याची शक्यता आहे. शिक्षण हे ज्ञानासाठी आवश्यक असलेतरी, विचारांची प्रगल्भता हा संस्कारांचा भाग आहे. हे पुन्हा एकदा यामुळे सिद्ध होते. सामाजिक आरोग्यापुढे वैयक्तिक सुख आणि आनंद हा कायमच दुय्यम आहे. हे महासत्तेपेक्षा विकसनशील राष्ट्रांनी दाखवून दिले आहे. असेच म्हणावे लागेल.


@@AUTHORINFO_V1@@