मुंबई : मुंबईत फोर्ट परिसरात भानुशाली इमारतीचा भाग कोसळला. इमारतीच्या ढीगाऱ्याखाली १८ रहिवासी अडकले होते. त्यामधून १२ जणांना बाहेर काढण्यात शुक्रवारी पहाटे यश आले. मात्र, यापैकी ६ जनाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीपीओ समोरील भानूशाली इमारत गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोसळली होती.
मुंबईतील अतिधोकादायक इमारतीच्या यादीत भानुशाली इमारतीचा समावेश होता. या इमारतीच्या मालकाला पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून पालिकेने परवानगी दिली होती. मात्र मालकाने दुर्लक्ष केल्याने इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीत एकूण १८ रहिवासी होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही रहिवाश्यांना बाहेर काढण्यात यश आले असले तरी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून अद्याप शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.