दिव्य जीवन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |


dasbodh_1  H x


आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सर्वप्रथम देहबुद्धीचा व अहंकाराचा निरास करावा लागतो, म्हणजे देहबुद्धीला व अहंकाराला दूर करावे लागते. हे दोन्ही सोडल्याशिवाय आत्मज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करता येत नाही.



संतांनी भारतीय तत्त्वज्ञानातील आत्मज्ञान सामान्यांसाठी सोपे करून सांगितले. हे संतवाङ्मय मराठी भाषिकांना नवीन नाही. त्यापैकी ज्ञानेश्वरादी संत आणि त्यांनी लिहिलेले ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’, ‘तुकारामांची अभंगगाथा’ व ‘दासबोध’ यांच्या ग्रंथाचा अल्पसा परिचय आपण मागील लेखात करून घेतला. तथापि, या ग्रंथातील ज्ञान आत्मसात करावे व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करावा, असे फारच थोड्या लोकांना वाटते. त्या ज्ञानाने आपण सुखी व्हावे आणि समाजाला सुखी करावे, असा विचार करणारी माणसे थोडी असतात. सर्वसाधारणपणे भौतिक सुखे मिळवण्याकडे माणसांचा ओढा असतो. त्यात गैर काही नाही. पण, पारमार्थिक ज्ञानातून मिळणार्‍या सत्य, सचोटी, प्रामाणिकपणा, निःस्वार्थता, परोपकार इत्यादी दैवी गुणांकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचे व्यक्तिगत व सामाजिक जीवनावर होणारे परिणाम यावर चर्चा करण्याचे हे स्थान नाही. पण, ही वस्तुस्थिती आहे. समाजात आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असणारे फार थोडे असतात. उरलेले सर्व आत्मज्ञान विरहीत राहणे पसंत करतात. अशा आत्मज्ञानविरहीत माणसांना शास्त्रकारांनी ‘बद्ध’ असे म्हटले आहे. बद्धपणाची जाणीव झाल्यावर माणूस आत्मज्ञानाच्या आशेने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी त्याला मुमुक्षू, साधक आणि सिद्ध अशा अवस्थांतून जावे लागते. दासबोधात समर्थांनी या अवस्थांचे सविस्तर वर्णन केले आहे. आपण आयुष्यभर भौतिकज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपला व आपल्या कुटुंबाचा योगक्षेम, चरितार्थ व्यवस्थित चालावा, यासाठी भौतिकज्ञानाची माणसाला गरज असते. आयुष्यभर ज्या भौतिक ज्ञानासाठी आपण धडपड करतो, ते लौकिकज्ञान आणि संसार दुःखातून सोडवून समाधान प्राप्त करून देणारे ज्ञान यात फरक असणार हे नक्की. या अ-लौकिक ज्ञानाला शास्त्रात ‘आत्मज्ञान’ असे म्हटले आहे. या आत्मज्ञानाने माणसाला ईश्वरदर्शन घडते आणि अखंड समाधानाची स्थिती प्राप्त होते. भक्तीचे व अद्वैत तत्त्वज्ञानाचे अंतिम ध्येय या अखंड समाधानाच्या स्थितीत आहे. याला कोणी ‘मुक्ती’ असेही म्हणतात. या अवस्थेला पोहोचल्यावर पुन्हा माघारी येण्याची इच्छा होत नाही. जीवालयाचे परमात्म्याशी तादात्म्य होणार्‍या या स्थितीला ‘सायुज्जमुक्ती’ म्हटले आहे. आध्यात्मविषयक अभ्यासात ‘ज्ञान’ हा शब्द जेथे वापरला जातो, तेथे ‘ज्ञान’ म्हणजे ‘आत्मज्ञान’ असा त्याचा अर्थ होतो. दासबोधात समर्थांनी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान’ हे स्पष्ट केले आहे. समर्थ म्हणतात-


ऐक ज्ञानाचे लक्षण । ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ।
पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ॥ (५.६.१)


हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सर्वप्रथम देहबुद्धीचा व अहंकाराचा निरास करावा लागतो, म्हणजे देहबुद्धीला व अहंकाराला दूर करावे लागते. हे दोन्ही सोडल्याशिवाय आत्मज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करता येत नाही. देहबुद्धी व देहाभिमान हळूहळू कमी होणे, हे आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गातील प्रगतीचे लक्षण आहे असे समजावे. परंतु, ज्यांना आत्मज्ञानाची साधी ओळख नाही किंवा ज्यांना आत्मज्ञान मिळवण्याची आवश्यकता वाटत नाही, अशा अत्यंत अज्ञानी माणसाला समर्थांनी ‘बद्ध’ या प्रवर्गात बसवले आहे. तशा अर्थाने फक्त प्रपंचाला प्राधान्य देणारे आपण ‘अज्ञानी बद्ध’ या गटातच राहतो, वाढतो व अंतिम श्वास घेतो. आत्मज्ञानासाठी स्वामींनी कुठेही प्रपंच सोडायला सांगितलेले नाही. उलट ‘प्रपंच करावा नेटका’ असे सांगून स्वामींनी सामान्य माणसाला प्रपंचात राहण्याची मोकळीक दिली आहे. त्याच ओवीत स्वामी पुढे हेही सांगतात की, ‘मग घ्यावे परमार्थ विवेक.या परमार्थ विवेकाच्या बाबतीत आळस किंवा चालढकल करू नका, असेही स्वामींनी पुढे म्हटले आहे. एकंदरीत पाहता, आपण ‘बद्ध’ गटातील लोक विवेक जाणत नसल्याने प्रपंचात गुरफटलेले असतो. वस्तुतः प्रपंचात राहूनही आत्मज्ञान मिळवण्यासाठी फारसे काही करावे लागत नाही. त्यासाठी विचारपूर्वक परमार्थाचा शोध घेतला तर साधते, असे स्वामींचे मत आहे. दासबोधात त्यांनी म्हटले आहे की-


काही सांडावे लागत नाही । काही मांडावे लागत नाही ।
येक विचार शोधून पाही । म्हणिजे कळे ॥ (२०.७.२)


स्वामींचा हा परमार्थ विचार शोधण्याचा सल्ला लोकांच्या हिताचा आहे. पारमार्थिक विवेक विचारात न घेता प्रपंच करीत राहायचे तर प्रापंचिकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. केवळ प्रपंचाचा विचार करणारा माणूस ‘मी, माझे कुटुंब, माझ्या सुखसोयीयापलीकडे विचार करत नाही. देहबुद्धी व अहंकार हे कायमचे आश्रयाला आल्याने माणूस स्वार्थी, अप्पलपोटा बनतो. ‘सर्व काही मला प्रथम मिळावे,’ अशी हाव त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते. हा स्वार्थी विचार प्रत्येकजण करत असल्याने त्यात स्पर्धा निर्माण होणे, हे ओघाने आलेच. स्वार्थमूलक स्पर्धेतून द्वेष मत्सर, सुडाची भावना, क्रोध, संताप हे निर्माण होतात. या अशा दुर्गुणांनी माणसाचे मन व्यापून जाते. त्यामुळे निःस्वार्थ बुद्धीचा, सद्गुणांचा माणसाला विसर पडतो. सचोटीने, सत्याने समजूतदारपणे वागण्यात किती आनंद, समाधान असते हेही त्याच्या लक्षात येत नाही. दुर्गुण त्याचे आयुष्य व्यापून टाकतात. असे झाल्यावर तेथे ‘सुखसंतोषाची वार्ता’ शिल्लक राहत नाही. जगात सगळीकडे बाजारात सुखसाधनांची रेलचेल आहे. ते आपल्याला मिळावेत, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. त्याची हाव दिवसेंदिवस वाढत जाते. त्या हावरटपणामुळे सतत धडपड, स्पर्धा, काळजी करण्यात काळ व्यर्थ जातो. माणूस स्वास्थ्य हरवून बसतो. या स्पर्धात्मक युगात नेहमीच यश आपल्या वाट्याला येईल असे नाही. अपयश पचवण्याची ताकद नसलेल्यांना अपयश आले, तर ते त्यांना सहन होत नाही. त्यातून विमनस्कता, नैराश्य येते. त्यातून बाहेर येण्यास खूप त्रास होतो. जे अतीव नैराश्यातून बाहेर येऊ शकत नाहीत, ते क्वचित प्रसंगी आत्महत्येचा पर्याय निवडून जीवन संपवतात.


एकंदरीने पाहता मानवी जीवन हे अपूर्ण आहे. त्यात अनेक त्रुटी राहतात. परंतु, या मानवी देहात दिव्य असे ईश्वरीय जीवन असते. मानवी मनाच्या शक्तीने ते दिव्य जीवन शोधण्याचा प्रयत्न करावा. दासबोध सांगतो की, त्या दिव्य जीवनाची अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकाने आटोकाट प्रयत्न करावा. प्रपंचाच्या मर्यादेत राहून परमार्थ साधना करणे माणसाला सहज शक्य आहे. देहाभिमान, अहंकार यातून बाहेर पडल्यावर परमार्थ साधना कठीण नाही. मी देह या कल्पनेला आपण चिकटून बसलेले असतो. तो एक भ्रम आहे, हे पटल्यावर देहबुद्धी कमी करता येते. या भ्रमातून सुटण्यासाठी एकांतात बसून आपल्या स्वरुपात लीन व्हावे, असा उपाय समर्थ सुचवतात.


शिष्या येकांती बैसावे । स्वरुपीं विश्रांतीस जावे ।
तेणे गुणे दृढावे । परमार्थ हा ॥ (५.६.५८)


अशा रीतीने स्वतः आत्मज्ञानाने समाधानी होऊन जगताला समाधान मिळवून देण्यासाठी जो कष्ट करतो, त्याचे जीवन हे खरे दिव्य जीवन होय. असे दिव्य जीवन अनुभवल्यावर ते आपल्यापुरते न ठेवता, त्या पुरुषाने लोकात मिसळावे. लोकांना त्या दिव्य जीवनाचा मार्ग दाखवावा व त्यांना त्यासाठी तयार करावे, असा समर्थांचा आग्रह आहे. समर्थांविषयी लिहिताना प्रा. के. वि. बेलसरे म्हणतात, “समर्थ स्वतः अतिमानव असून त्यांच्या ठिकाणी प्रकर्षाने वावरणारी सामान्य माणसाच्या उत्कर्षाची तळमळ पाहिली की, मन प्रेमादराने भरून येते व त्यांना वंदन करते. समर्थांनी दिव्यजीवन अनुभवून अनेकांना त्यासाठी तयार केले.
 

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@