अराजकवादी ‘अँटिफा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2020   
Total Views |
antifa_1  H x W
 
 




अराजकवादी ‘अँटिफा’ला ‘दहशतवादी’ ठरवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल.



अमेरिकेतील मिनियापोलीस शहरातील जॉर्ज फ्लॉएड या ४६ वर्षीय कृष्णवर्णीयाची त्याच्या मानेवर गुडघा दाबून एका पोलीस अधिकार्‍यासोबत भर रस्त्यात झटापट झाली आणि त्यात जीवाची भीक मागणार्‍या फ्लॉएडचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेनंतर अमेरिकेत ठिकठिकाणी उग्र आंदोलनांनी वातावरण तंग आहे. दोलकांच्या जाळपोळ, लुटमारीमुळे आधीच कोरोनाने कळ मारलेल्या दुकानदारांना प्रचंड नुकसान सोसावे लागले.


शिवाय, अमेरिकेत कोरोनाचा कहर संपलेला नसतानाही आंदोलकांच्या या झुंडींमुळे कोरोनाची मोठी लाट उसळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणणार्‍यांना स्वत:च्या ‘लाईफ’ची तर अजिबात चिंता नाहीच, पण देशात कोरोना महामारीने सर्वाधिक बळी गेल्याने ही आंदोलने प्राणघातक ठरु शकतात, याचेही समाजभान नाही.


‘विकसित देश’ आणि ‘महासत्ता’ म्हणून जगावर हक्क गाजवणार्‍या देशाची आज ही गत. काश्मीर असो वा भारतात धार्मिक दंगली उसळल्यावर आपल्याला मानवाधिकाराचे डोस पाजणार्‍या अमेरिकेतील या दंगली आणि हिंसाचाराचा निषेध करावा तितका कमीच. पण, कोरोना आटोक्यात आणण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या ट्रम्प सरकारचा राग आणि त्यात कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येचे निमित्त, यामुळे अमेरिका पेटून उठली. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी एका ट्विटमध्ये ‘अँटिफा’ला दहशतवादी संघटना ठरविले जाईल, अशी घोषणा केली. पण, कधीही फारसा चर्चेत नसलेला ‘अँटिफा’ हा मुळात प्रकार काय आहे, ते समजून घेणे आवश्यक आहे.


अमेरिकेत डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन मोठ्या पक्षांमध्ये राजकीय द्वंद्व, घमासान सुरुच असते. त्याव्यतिरिक्त इतरही छोटे पक्ष असले तरी ते कोणाच्या खिजगणतीतही नाहीत. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सपैकी कोणताही पक्ष डाव्या विचारसरणीकडे झुकलेला नाही. कारण, मुळातच अमेरिका एक भांडवलशाही देश. वरील दोन पक्षांची विविध विषयांत मतमतांतरे असली तरी त्यांचे विचार हे कमी-अधिक ‘उजवे’ म्हणूनच गणले जातात. याचा अर्थ अमेरिकेत डावे नाहीतच, असा नाही, तर डाव्यांची पोकळी भरुन काढण्याचे काम करणारे एक कुठलाही विशिष्ट आकार-उकार, स्वरुप नसलेले संघटन, चळवळ म्हणजेच ‘अँटिफा.’ शब्दश: अर्थ बघितला तर ‘अँटी फॅसिस्ट’ चळवळ म्हणजेच ‘अँटिफा.’ अमेरिकेतील भांडवलशाही, श्वेतवर्णीयांप्रति झुकलेली व्यवस्था, महिलांचे अधिकार, कृष्णवर्णीय-अल्पसंख्याक-उपेक्षितांचा आवाज, समलैंगिकांचे समर्थक, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांची ‘अँटिफा’ ही चळवळ.


पण, ‘अँटिफा’ची विशिष्ट रचना नाही की कुठे मुख्यालयही नाही. कोणी प्रमुख नेता नाही की पदाधिकारीही नाहीत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून ही चळवळ अमेरिकेत अधिकाधिक सक्रिय झाली. वरील अजेंडा घेऊन काही समविचारी मंडळी आंदोलनासाठी एकत्र जमतात आणि आपल्या मागण्या सरकारसमोर शांततापूर्ण किंवा हिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून मांडतात. सध्या अमेरिकेत सुरु असलेल्या जाळपोळ आणि लुटमारीमध्ये याच अराजकवादी ‘अँटिफा’ चळवळीचा सहभाग असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आणि चक्क या चळवळीलाच ‘दहशतवादी’ म्हणून शिक्कामोर्तब करणार असल्याची घोषणाही केली. पण, धक्कादायक बाब म्हणजे, जो अमेरिका आंतरराष्ट्रीय दहशतावादाविरोधाचा स्वत:ला सर्वेसर्वा, मसिहा समजतो, त्यांच्याच देशात मात्र ‘डोमेस्टिक टेररिझम’चा स्वतंत्र कुठलाही कायदा नाही.


जर एखादी व्यक्ती कुठल्याही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित नसेल, तर त्याला अमेरिकेत कायद्यान्वये ‘दहशतवादी’ ठरवणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे ‘एफबीआय’नेही यादृष्टीने सरकारला स्वतंत्र कायदा तयार करण्याची मागणी फार पूर्वीच केली आहे. त्यामुळे अराजकवादी ‘अँटिफा’ला ‘दहशतवादी’ ठरवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल. आधीच कोरोनाचे भीषण संकट आणि त्यात ‘अँटिफा’सारख्या अराजकवादी आंदोलनामुळे ट्रम्प प्रशासनाला निश्चितच मोठा हादरा बसला आहे. त्यात अमेरिकेत यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे. म्हणून ट्रम्प यांच्यासमोर देशांतर्गत परिस्थिती आटोक्यात आणण्याबरोबरच समोर उभ्या ठाकलेल्या चीनचेही दुहेरी आव्हान आ वासून उभे आहे. त्यामुळे अमेरिकेला ‘ग्रेट’ करण्यापूर्वी ट्रम्प यांना देशाला सर्वार्थाने ‘सेट’ करावे लागेल, हे नक्की!



@@AUTHORINFO_V1@@