आतापर्यंत ५० लाख चाचण्या करण्यात आल्या; आयसीएमआरची माहिती
दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी देशात अजून समूह संसर्ग झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून अर्थात आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे बोलले जात होते. यावर देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.
डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, छोट्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे तर शहरी भागात हे प्रमाण फक्त एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही. देशभरात लॉकडाऊन करत आपण जी पावले उचलली त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव रोखण्यात यश मिळाल्याचे ते म्हणाले.
भारतात दररोज १.५१ लाख चाचण्या केल्या जात असून, दररोज २ लाख चाचण्या करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आतापर्यंत देशात ५० लाख चाचण्या केल्या गेल्या आहेत. देशात कोरोना चाचण्यांसाठी राज्य सरकारांनी सरकारी आणि खासगी दोन्ही प्रयोगशाळेचा वापर करावा, असेही त्यांनी आवाहन देखील त्यांनी केले.