आनंदवार्ता ! लाॅकडाऊनमध्ये कोकण किनारपट्टीवरुन कासवांची ११ हजार पिल्ले समुद्रात रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2020   
Total Views |
sea turtle _1   
 
 
 

वन विभाग आणि स्थानिक कासवमित्रांचे यश

 
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - लाॅकडाऊनच्या कठीण परिस्थितीतही कोकण किनारपट्टीवरुन कासवांची ११ हजार ५१३ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. गेल्या दोन दशकापासून कोकणातील काही किनाऱ्यांवर वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने समुद्री कासवांची संवर्धन मोहिम राबविली जात आहे. यंदा सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २३३ घरटी आढळली आहेत. त्यामधून लाॅकडाऊनच्या गेल्या दीड महिन्यात ११ हजाराहून अधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली असून अजूनही काही घरट्यांमधून पिल्ले बाहेर पडलेली नाहीत. त्यामुळे पिल्लांच्या संख्येत निश्चितच वाढ होणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा किनाऱ्यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. २००३ साली चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र' या संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने सागरी कासवांच्या संवर्धन मोहिमेला सुरूवात केली. आता संवधर्नाचे हे काम वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने पाहिले जाते. याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मारळ, दिवेआगर आणि हरिहरेश्वर चार किनाऱ्यांवर कासवाची एकूण १५ घरटी आढळून आली असून त्यामध्ये १ हजार ५४५ अंडी सापडल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी (महा MTB) बोलताना दिली. लाॅकडाऊनच्या गेल्या महिन्याभरात या अंड्यांमधून बाहेर पडलेली ४८५ पिल्ले आम्ही समुद्रात सोडल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
 
 
 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग,देवगड, सापळेबाग, सागरतीर्थ, उभा दांडा, मोचेमाड, दाभोळी, आरवली, वेळागर, वायंगणी या दहा किनाऱ्यांवर कासवाची ५९ घरटी आढळून आल्याची माहिती उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी 'महा MTB' ला दिली. त्यामध्ये आढळलेल्या एकूण ६ हजार ४०९ अंड्यांमधून आजतागायत ४ हजार ७६७ पिल्ले समुद्रात सोडल्याचे त्यांनी सांगितले. अजून काही अंडी परिपक्व होणे शिल्लक असल्याने पिल्लांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. रत्नागिरी जिल्ह्यात कासवांची घरटी होणाऱ्या किनाऱ्यांची संख्या इतर दोन जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. यंदा येथील १३ किनाऱ्यांवर कासवाची १५९ घरटी सापडली आहेत. त्यामध्ये आढळलेल्या १६ हजार ७१० अंड्यांमधून लाॅकडाऊनच्या गेल्या महिन्याभरात ६ हजार २६१ पिल्ले बाहेर पडली आहेत. त्यांना समुद्रात सोडण्याचे काम वेळोवेळी स्थानिक कासवमित्र करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची माहिती आम्हाला वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन निलख, प्रियंका लगड आणि वैभव बोराटे यांनी दिली.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@