अप्रिय प्रिय ते, प्रिय अप्रिय ते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020
Total Views |
manovata_1  H x


गरज असते तेव्हा आपण लोकांसाठी अप्रिय झालो तर काय बिघडणार आहे? आपल्या विचित्रपणाला आतापर्यंत इतर किती लोकांनी सहन केले नाही का? आपल्या आईवडिलांनी व शिक्षकांनी आपल्यासाठी किती वेळा वाईटपणा घेतला. पण, शेवटी त्यात हित आपलेच झाले. तसेच कधी कुणासाठी तरी आपण अप्रिय होऊ शकतो आणि त्यांचे भलेही करू शकतो.

आपल्या सगळ्यांच्या एकतरी अशी व्यक्ती नक्की परिचयाची असते की, जी लोकांना मस्का लावणारी वा त्यांना तोषवणारी असते. त्यासाठी ती अगदी कुठल्याही टोकाला जायला तयार असते. कुठल्याही थराला जाऊन लोकांना खूश कसे ठेवायचे, हे या व्यक्तीला नेमके माहीत असते. स्वत:ला उपाशी ठेवून ती दुसर्‍याला जेऊ घालेल वा स्वत: पावसात भिजत अनोळखी माणसांना छत्री देईल. आता तुम्ही म्हणाल, हा तर परोपरकार झाला! पण, परोपकारात आणि या वागण्यात खूप फरक आहे. परोपकारात दुसर्‍यांना खूश ठेवण्यासाठी व्यक्ती काही करत नाही. किंबहुना, परोपकारी व्यक्तीला कुणाकडूनही कसलीच अपेक्षा नसते. अटीशिवाय दुसर्‍याच्या मदतीला धावायचे, हा त्या लोकांच्या ‘फिलॉसॉफी’चा एक अपरिहार्य भागच असतो. पण, आपल्याला दुसर्‍यांनी ‘चांगले’ म्हटले पाहिजे वा दुसर्‍यांना आपण आवडलेच पाहिजे, या अट्टाहासापायी दुसर्‍यांना रमविणारी व्यक्ती ही परोपकारी नसून ती लांगूलचालन करणारी असते. कदाचित आपण तसे असू वा नसूही, पण अशा व्यक्तींबरोबर आपली तुलना आपण करू शकतो. ‘आपण कुणाला ना कुणाला आवडले पाहिजे,’ या मानसिकतेने भारावलेल्या व्यक्ती आपल्या जीवनातील इतर महत्त्वाच्या घटकांकडे लक्षच देत नाही. सतत काहीतरी चतुराई करायची वा सतत आपण काहीतरी चांगलंच करीत आहोत, याची जोरवणी करत राहायची. त्यासाठी टोकाची ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करायची, हे सगळं खरंतर दमविणारं आहे, विघातक आहे. कारण, फार कमी लोकांना तुम्ही कसे आहात आणि काय आहात, हे कळतं आणि तुम्ही जसे आहात तसे जर तुम्ही लोकांना आवडलात, तर खरी मजा आहे. खरे पाहिले तर काही लोकांना तुम्ही आवडला नाहीत किंवा त्यांचं तुमच्याशी पटलं नाही, तर ती खर्‍या अर्थाने चांगली गोष्ट आहे. अर्थात, असे म्हणणे योग्य नाही की, तुम्ही आगाऊ, आक्रमक व आपले तेच खरे करणारी मंडळी असायला पाहिजे. पण, आपल्याला लोकांचा अपमान वा मानहानी करण्याची गरज नाही.


पण, लोकांची मते आपल्याबद्दल जेव्हा नकारात्मक असतात वा विधायक नसतात, तेव्हा आपण नक्की काय करायला पाहिजे, कसे वागायला पाहिजे, याचा गोषवारा उपयोगाचा ठरतो. आपण काही लोकांना आवडत नसतो, तेव्हा आपण स्वत:शी खरे असतो, याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येते. स्वत:हून लोकांसाठी बदलण्याची नामुष्की खरेतर कोणावरच येऊ नये. कारण, आपण खरोखर कोण आहोत, हे लोकांना कसे कळणार? आणि जर आपल्यातली खरीखुरी व्यक्ती लोकांना समजली नाही, तर खरंच आपलं अस्तित्व फोल ठरतं. निष्फळ होतं. तसे पाहिले तर लोक खरंच चांगले असतातही, तरीही दुसरा कसा आहे, यांची परीक्षा घ्यायला आपल्याला वेळोवेळी आवडते, जेव्हा तुम्हाला तुम्ही दुसर्‍याला न आवडण्याबद्दल कसलीच खंत बाळगत नाही, तेव्हा तुम्हाला ‘मेरी मर्जी’नुसार वागण्याची मुभा आपसूकच मिळते. जेव्हा तुम्हाला खरंच गरज असते तेव्हा तुम्ही लोकांना सहज नकार देऊ शकता. ही खरेतर खूप मोठी ‘पॉवर’ तुमच्या हातात असते.


‘आपण जे नाही ते आहोत’ हे दाखविण्याचा दांभिकपणा हवा कशाला आपल्याला? दुसर्‍याच्या अपेक्षेनुसार जेव्हा आपण वागत नाही तेव्हा मनातून खरेतर खूप हलकं वाटतं. माणूस म्हणून आपलं स्वातंत्र्य आपण आनंदाने अनुभवतो. कारण, आपण कोणाच्या मुठीत बंद नसतो. आपल्याला काय वाटतं, आपण काय विचार करतो आहोत, आपल्या मनात काय चाललं आहे, या गोष्टींकडे आपण मनापासून लक्ष देतो. दुसर्‍याला आपल्याबद्दल किती नकारात्मक वाटतं, किती असुया वाटते, या गोष्टीत आपली ऊर्जा आणि वेळ आपण वाया घालवत नाही. खर्‍या अर्थाने आपण स्वतःचेजीवलग होतो, तेच आपल्याच भल्याचे आहे.


एक चांगली गोष्ट आपण दुसर्‍यासाठी केली पाहिजे आणि ती म्हणजे, ते काय म्हणतात हे ऐकून घेतले पाहिजे. खरेतर या चांगुलपणाची आपणही अपेक्षा करतो. किंबहुना, त्यासाठी आपण पूर्ण लायकही आहोत. पण, तो चांगुलपणा आपल्याला मिळेलच असे नाही. आपण बोलताना वा व्यक्त करताना लोक आपल्याबद्दल फुकटात मतं व्यक्त करतातच. याला आपली काही हरकत नाही. गरज असते तेव्हा आपण लोकांसाठी अप्रिय झालो तर काय बिघडणार आहे? आपल्या विचित्रपणाला आतापर्यंत इतर किती लोकांनी सहन केले नाही का? आपल्या आईवडिलांनी व शिक्षकांनी आपल्यासाठी किती वेळा वाईटपणा घेतला. पण, शेवटी त्यात हित आपलेच झाले. तसेच कधी कुणासाठी तरी आपण अप्रिय होऊ शकतो आणि त्यांचे भलेही करू शकतो.
- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@