धारणीय वेग म्हणजे असे वेग, जे वारंवार उत्पन्न झाले आणि त्यांना वेळीच लगाम घातला नाही, तर पुढे जाऊन ते मानसिक विकृतींना जन्म देऊ शकतात. मागील लेखात धारणीय वेग कोणकोणते, त्यांची प्राथमिक माहिती आपण करुन घेतली. आजच्या लेखातून एकेका धारणीय वेगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. त्यापैकी पहिला धारणीय (मानसिक) वेग म्हणजे लोभ. तेव्हा, लोभाचे दुष्परिणाम आणि या लोभापासून लांब राहण्यासाठीच्या उपाययोजना यांचा ऊहापोह करणारा हा लेख...
प्राणिमात्राला आपल्या अवतीभोवतीचे ज्ञान त्याच्या मनाद्वारे प्राप्त होते. उदा. वर्गात शिक्षक शिकवत असताना, जर एखाद्या मुलाचे लक्ष नसले, तर त्या शिक्षकाने कितीही चांगल्या पद्धतीने शिकविले, तरी तो विषय या विद्यार्थ्याला समजणारच नाही, कारण त्याचे लक्ष नाही. लक्ष म्हणजे मनाचे लेपलशपीींरींळेप (एकाग्रता), मनाची त्या विषयामधील समरसता. या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या मुलाकडे सर्व समजून घेण्याची सगळी साधने उपलब्ध आहेत. तो शाळेत आहे, वर्गात बसलेला आहे, शिक्षक शिकवत आहेत, इतर विद्यार्थी समजून घेत आहेत. या मुलाचे डोळे-कान इ. ज्ञानेन्द्रिये व हात कर्मेन्द्रियेदेखील उत्तम स्थितीत कार्यरत आहेत. पण, यामधील मधला दुवा म्हणजे मन त्यात समरस झालेले नाही. ज्ञानेन्द्रियांनी जे ज्ञान अवगत केले आहे, ते मेंदूपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यात मनाचा सक्रिय सहभाग जो अत्यंत गरजेचा आहे, तोच नसल्यामुळे ज्ञानग्रहण होत नाही.
मन खूप चंचल आहे, ते फुलपाखरासारखे आहे. एका फुलावरून दुसर्या फुलावर कधी उडून जाईल, हे कळणारसुद्धा नाही. मनामध्ये सतत विचार, चिंतन सुरू असते. पण, एखाद्या विचारामध्ये मन किती वेळ रमेल, हे कोणीच सांगू शकत नाही. काही वेळेस क्षणार्धामध्ये मन एका विषयातून दुसर्या विषयात उडी मारते, तर काही वेळेस एकच विचार, एकच ध्येय गाठून त्यासाठी अविरत कष्ट व मेहनत घेत असते. भगवद्गीतेत ज्ञानेन्द्रियांना (ीशपीशी) घोड्याची उपमा दिली आहे. पाच ज्ञानेन्द्रियांमधून सतत कुठली ना कुठली माहिती/संदेश मनापर्यंत पोहोचत असतात, पण मन ज्या विषयात रमलेलं आहे, त्याबद्दलची माहिती अधिक चांगल्यापरीने होते. इतर संवेदनांकडे दुर्लक्ष होते. या ज्ञानेन्द्रियांना मनाचे लगाम लागतात. कारण, जी माहिती ज्ञानेन्द्रियांमधून मिळते, त्यावर बुद्धीचे कार्य होऊन ती ग्रहण केली जाते व स्मृतीमध्ये साठविली जाते. महितीचा केवळ भडीमार झाला, त्याचे मनामार्फत ग्रहण व बुद्धीमार्फत आकलन जर झाले नाही, तर कुठलेच ज्ञान होत नाही. फक्त विषयांचा कलकलाट होतो व ती व्यक्ती माहितीच्या भडीमारामुळे अस्वस्थ होते.
धारणीय वेग हे मनाच्या भावनात्मक परिस्थितीशी निगडित आहेत. मनामध्ये भावना (Emotions) उत्पन्न होतात. या खूप चटकन उत्पन्न होतात (Spontaneous). बरेचदा (बहुतांशी) वेळेस या अनैच्छिक असतात. म्हणजे एखाद्या ज्ञानेन्द्रियाने विशिष्ट ज्ञान झाले, तर मनामध्ये त्याबद्दल सकारात्मक/नकारात्मक भाव चटकन उत्पन्न होतो. (घाण वासा जवळून जाताना तो वास/ते ज्ञान नकोसे होणे आणि चिंच बघताक्षणी तोंडाला पाणी सुटून ती खावीशी वाटणे, म्हणजेच नकारात्मक व सकारात्मक भावना उत्पन्न होणे होय) या प्रतिक्रियांची पूर्वतयारी केलेली नसते/ ते डझजछढअछएजणड आणि बरेचदा तयार होते. हे वेग/आवेग/देखील नैसर्गिक आहेत, प्राकृत आहेत. वारंवार जर हे वेग उत्पन्न झाले, त्यांना थांबविले गेले नाही, तर पुढे जाऊन मानसिक विकृतींना जन्म दिला जातो. या वेगांबद्दल आपण सविस्तर माहिती करून घेऊया. मागील लेखात धारणीय वेग कोणकोणते, त्यांचा उल्लेख केला. आजच्या लेखातून एकेका धारणीय वेगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पहिला धारणीय (मानसिक) वेग म्हणजे लोभ. लोभाचा साधा-सोपा अर्थ म्हणजे हाव. हाव ही बहुतांशी वेळेस भौतिक संपत्तीबद्दल आहे. पैसा, भूमी, अलंकार, कपडे, घर, गाड्या इ. ज्या गोष्टी पैशांनी विकत घेता येतात, अशा सगळ्या गोष्टी भौतिक संपत्तीमध्ये येतात. ही संपत्ती मिळविण्याची तीव्र, स्वार्थी, अति प्रकट इच्छा म्हणजे लोभ होय. एखादी गोष्ट आवडली आणि ती मिळविण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न हा लोभ नाही, पण नैतिकता सोडून, कुठल्याही पद्धतीने ती मिळविणे, बळकाविणे, म्हणजे लोभ होय. दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे आपण बघूया. शाळेत एखाद्या मुलाचे पेन, पाऊच आवडतो. तो आपल्यालाही मिळावा, म्हणून आईवडिलांकडे हट्ट करतो. आईवडीलदेखील तसाच पेन, पाऊच घेऊन देतात. मुलगा खूश होतो. पण, हाव इथेच थांबत नाही. कुणाचेतरी कपडे, कुणाचे तरी दप्तर, महाविद्यालयात गेल्यावर इतरांचा मोबाईल, पॉकेटमनी इ. प्रत्येक गोष्ट जी इतरांकडे आहे, ती आपल्याकडेही असावी. एक झाली की त्यापेक्षा अधिक. सायकल मिळाली की स्कूटर, स्कूटर झाली गाडी आणि असेच पुढे पुढे. काही वेळेस या मागण्या पालकांकडून पूर्णदेखील केल्या जातात. काही वेळेस स्वतःहून पूर्ण कराव्या लागतात. ऐहिक सुखाच्या मागे पळता पळता समाधान कधीच मिळत नाही. मिळकतीपेक्षा खर्च अधिक होतो. मग वाममार्गाने ते मिळविण्याचा अट्टाहास केला जातो. हे सगळं दुष्टचक्र आहे. ऐहिक सुखामागे धावताना माणूस-माणसापासून दूर जातो, नाती तुटतात, व्यक्ती एकाकी पडू लागते. कारण, फक्त स्वतःचा विचार केला जातो. लोभा मागे धावता धावता नैतिकता राहात नाही, टिकत नाही. नैतिकतेला बाधा येते. मनुष्य स्वभाव खूप अप्पलपोटा आणि आत्मकेंद्रित होतो. याने सदसद्विवेकबुद्धीदेखील कामी येत नाही.
ऐहिक सुख हे तात्पुरते आनंद देणारे असते, क्षणिक असते. एखादी गोष्ट स्वकष्टाने मिळविल्याचा आनंद वेगळा आणि केवळ ती गोळा करत जाऊन त्याची साठवणूक करणे वेगळे. माणसाने प्रगतिपथावर राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा. पण, प्रगती किंवा यश हे केवळ भौतिक यशाच्या वजनकाट्यावर तोलू नये, तोलता येत नाही. याबरोबर बौद्घिक प्रगती, वैचारिक प्रगल्भता, सामाजिक भान आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल या गोष्टींचाही विचार करावा. यातही प्रगती व्हावी. लोभ केवळ गोष्टी आपल्याकडे असाव्यात, याला म्हणत नाहीत; पण गरजेपेक्षा किंवा वाजवी इच्छेपेक्षा अधिक गोळा करणे, याला लोभ म्हणतात. ‘कोविड’ काळात काही ठिकाणी औषधांचा तुटवडा आणि काही ठिकाणी अधिक प्रमाणात साठवण, हे त्या लोभाचेच एका उदाहरण आहे. काही औषधे ‘एक्सपायरी डेट’ संपून गेल्यामुळे नंतर वापरताही आली नाहीत. पण, पैशाच्या लोभापायी इतरांच्या जीवाशी खेळही खेळला गेला. असा हा लोभ केवळ वैयक्तिक जीवनात असतो, असे नाही. सामाजिक-व्यावसायिक जीवनातही हा लोभ असतो. इतरांचे काम आपल्या नावाने खपविणे व त्यावर मिळालेली बढती स्वीकारणे. चिटफंड्स, क्रेडीट कार्डच्या माध्यमातून फसवणूक, चौर्य इ. सगळ्याचे मूळ लोभ हेच आहे. व्यक्तीपेक्षा वस्तू महत्त्वाची जेव्हा होऊ लागते, तेव्हा तिथे लोभ/हाव डोकावू लागते. हे एक दुष्टचक्र आहे. धारणीय वेगांमध्ये याच गोष्टीची भीती असते. छोटी ठिणगी जर शमविता आली नाही, तर त्याचे मोठ्या आगीत चटकन रुपांतर होऊन मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो; स्वतःचा आणि समाजाचा.
यामुळे विचार/भावना उत्पन्न झाल्याझाल्या त्यावर थांबवावे. यासाठी आयुर्वेदात सद्वृत्तपालन आणि आचार रसायन असे दोन उपाय सांगितले आहेत. (याबद्दल सविस्तर पुढील लेखांमधून जाणून घेऊया.) लोभात अडकायचे नसेल, तर सर्वप्रथम ऐहिक गोष्टी या क्षणिक आनंद देणार्या आहेत, हे पदोपदी मनाला सांगावे. भावनांचे मूळ काय आहे, हे समजून त्यानुसार त्यावर उपाय शोधून काढावा. ‘थोडा हैं, थोडे की जरुरत हैं|’ असा भाव आत्मसात करावा. समाधान/उेपींशपीांशपीं अनुभवावी. जे आहे, ते चांगले आहे आणि अजून चांगले होईल, असा भाव मनी धरावा. आपण ठरविलेले ध्येय प्राप्त झाले की, इतरांना मदत करण्यास सरसावे. इतरांना प्रगतिपथावर आणण्यास हातभार लावावा. प्रत्येक क्षणी सर्वोत्तम होण्याचा अट्टाहास सोडावा. सर्वोत्तम होण्याच्या शर्यतीतूनच लोभ आणि ईर्ष्या निर्माण होते. तेव्हा शर्यत ही निरोगी असावी. (क्रमशः)