श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना. या महिन्यात सणांची रेलचेल असते. आपल्या भारतीय सणांचं मला विशेष कौतुक वाटतं. कौतुक यासाठी की, आपल्या सणांमागचं शास्त्र वाखाणण्याजोगं आहे. निसर्गाशी, ऋतुमानाशी सांगड घालणारं हे शास्त्र समजून घेतलं, तर सणांच्या आनंदासोबतच आरोग्यदायी फायदेही लुटता येतील.आपल्याकडे पूर्वापार एक म्हण आहे, ‘आषाढ तळावा, श्रावण भाजावा व भाद्रपद उकडावा.’ आषाढात पावसाचं जोरदार आगमन झालेलं असतं, पानफुलं बहरतात, सृष्टीला नवचैतन्य येतं. निसर्गातील हे बदल अर्थातच आपल्या शरीरावरही परिणाम करत असतात. वर्षा ऋतूत शरीरात वाताचं प्रमाण वाढतं. म्हणूनच या काळात घरोघरी तळण करण्याची पद्धत आहे. भजी, कापण्या, पापड, सांडगे, गुलगुले अशा गोष्टी तळून खाण्याची रीत आहे. तेलाच्या स्निग्धतेने शरीरातील वात कमी होण्यास मदत होते.
पुढे येतो श्रावण महिना. ‘श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’ बालकवींच्या या ओळींप्रमाणे श्रावण महिना मनाला आनंद देणारा असतो. श्रावणी सोमवार, नवविवाहित सवाष्णींचं मंगळागौरपूजन, शुक्रवारी जिवतीची पूजा अशी अनेक धार्मिक कार्ये या काळात असतात. उपवास, धार्मिक कार्ये या काळात असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, या काळात अग्नी मंद झालेला असतो, म्हणूनच अत्यंत हलकं, पचायला सोपं अन्न या काळात ग्रहण करावं.
आयुर्वेदात ‘लघु आहार’ म्हणजेच ‘लंघन’ नावाची संकल्पना आहे. श्रावणात जास्तीत जास्त उपवास असतात. कारण, लंघन होऊन अन्नपचन सुलभ व्हावं, हा यामागचा हेतू. शिवाय, पाऊस ऐन भरात असतो. ‘हिवाळा भोगी, उन्हाळा त्यागी व पावसाळा रोगी’ असं आपल्याकडे म्हटलं जातं. पावसाळा हा अनेकांच्या आवडीचा ऋतू असला, तरी या गढूळ, दूषित पाण्यामुळे या काळात पोटाचे आजार बळावतात. वातावरणातील थंडावा, ऊन अशा बदलांमुळे सर्दी-खोकला, साथीचे रोग या काळात वाढतात. जीवाणू-विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो, म्हणूनच कच्चे अन्नपदार्थ या काळात खाऊ नयेत. ते पचायला जड असतातच, पण त्यातून विषाणू पोटात जाण्याची भीती असते. म्हणूनच या काळात उकडून, भाजून स्वयंपाक करण्यावर भर दिला जातो, असं वैद्य योगेश वैशंपायन यांनी सांगितलं.
उपवास हा श्रावणातील महत्त्वाचा भाग! अनेकजणी या काळात सोळा सोमवारचे व्रतही करतात. एकभुक्त राहतात. ‘उपवास’ या शब्दाचा खरा अर्थ बघितला तर, ‘उप’ म्हणजे जवळ, ‘वास’ म्हणजे वसणे. देवाच्या सहवासात राहणे, जास्तीत जास्त आध्यात्मिक जवळीक साधणे असा आहे. म्हणजे हल्ली उपवास करायचा, तर ‘डिजिटल डिटॉस’ हवा. नामस्मरणात मन गुंतल्याने शारीरिक व्याधी कमी होतात. उपवासाला कमीत कमी खाणे, पोटाला आराम देणे अपेक्षित आहे, याउलट साबुदाणा, बटाटा, उपवास थाळी, असे पदार्थ खाऊन आपण पोटाला अधिकच त्रास देतो. दूध, फळे, राजगिर्याचे लाडू, राजगिर्याचे पीठ, शिंगाडा, सुरण, गंगाफळ, वरई, अळकुड्या, केळीचे पीठ या पदार्थांचा समावेश आहारात जास्तीत जास्त करावा. यांचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत, शिवाय, उपवासाच्या निमित्ताने फारसे न खाल्ले जाणारे हे पदार्थ आहारात येतात.
श्रावणाच्या आहारात आवर्जून असावी, अशी एक गोष्ट म्हणजे रानभाज्या. या भाज्या औषधी गुणधर्मामुळे पावसाळ्यात पुष्कळ रोगांवर इलाज म्हणून काम करतात. वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खर्या अर्थाने सेंद्रीय अन्न होय. कोणतेही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच! पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. खेडोपाड्यातील माणसांसाठी पावसाळ्याचे दिवस अतिशय कसोटीचे असतात. अशा परिसरात अगदी मुबलक व फुकट मिळणार्या रानभाज्या शिजवून येथील लोकांचा उदरनिर्वाह आजही चालतो. केनी, कुर्डू, टाकळा, आघाडा, भारंगी, कर्टुले, घोळू, अळू, शेवग्याचा पाला अशा अनेक रानभाज्या या काळात उगवतात. यातील बहुतांश भाज्या उत्तम विषघ्न आहेत, त्वचाविकारांवर उत्तम काम करतात. आघाड्याची पाने गणपतीलाही वाहिली जातात, आघाड्याचा क्षार हा मुतखडा, जखमांवर एक उत्तम औषध आहे. मंगळागौरीच्या पूजेत जी पत्री वाहिली जाते, त्याचेही अनेक औषधी गुणधर्म आहेत, असेही वैद्य वैशंपायन यांनी सांगितले.
केनीच्या पानांची उत्तम भजी होतात. बेसन, चमचाभर तांदळाचे पीठ, मीठ, तिखट, मोहन, ओवा असे जिन्नस एकत्र करून पाने धुवून या पिठात बुडवून तेलात तळून खातात. या पानांची भाजीदेखील गुणकारी आहे. चातुर्मासाच्या पुस्तकात संपत शनिवारच्या एका कहाणीत या भाजीचा उल्लेख आहे. श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी ज्वारीच्या लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दोन्ही गोष्टी सात्विक आहेत. लाह्या पचायला हलया असतात. यादिवशी वाफवलेले पुरणाचे दिंड करतात. मंगळागौरीच्या दिवशी पूजनानंतर षड्रसपूर्ण आहाराचा नैवेद्य दाखवतात. मुलींनी काहीही न बोलता नैवेद्य ग्रहण करायचा असतो, वरवर बघता ही गमतीशीर प्रथा वाटली, तरी त्यामागे विज्ञान आहे. शांतपणे, न बोलता जेवल्याने मन जेवणात एकाग्र होते व त्याने पचनास मदत होते. नारळीपौर्णिमेला नारळी भात, ओल्या नारळाची खीर, करंज्या असे पदार्थ करतात. नारळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. कृष्णजन्माष्टमीला आवर्जून दहीकाला केला जातो, दही हे स्वभावाने उष्ण असल्याने या ऋतूत दह्याचं सेवन करायला हरकत नाही. साळीच्या लाह्या, काकडी, पोहे, गोड दही, डाळिंब, ओले खोबरे वरून चवीसाठी तूप-जिर्याची फोडणी किंवा मिरचीच्या लोणच्याचा खार एकत्र करून हा काला केला जातो. गोड-आंबट रूचकर चवीचा हा काला नक्की खावा.
काही सोप्या पाककृती१. साळीच्या लाह्या पाण्यात भिजवून अर्ध्या तासाने हे पाणी प्यावं, याला ‘लाजातर्पण’ असे म्हणतात. हे पाणी बलदायी, पचायला हलके असते. पित्त कमी करणारे असते.
२. मूठभर साळीच्या लाह्या ग्लासभर पाण्यात उकळून, पाणी निम्मे झाल्यावर प्यावे. हा ‘लाजमंड’देखील तत्काळ ताकद देणारा आहे.
३. हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजवून किंवा किंचित भाजून सोळापट पाण्यात शिजवावेत व हे पाणी प्यावे. आवडत असल्यास याला तूप-जिर्याची फोडणी द्यावी. आयुर्वेदात याला ‘मुद्गयुष’ असे नाव आहे. म्हणजे मुगाचे सूपच! हे सूप ताकद देणारे, तापात रुचकर असे आहे. रात्रीच्या हलया जेवणास हा उत्तम पर्याय आहे.
४. साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या पोह्यांसारख्या भिजवून, आवडीच्या भाज्या घालून फोडणीस द्याव्यात. सकाळच्या नाश्त्यास हा अत्यंत पौष्टिक प्रकार आहे.
५. आलं-लिंबू यांचा रस एकत्र करावा, त्यात चवीनुसार सैंधव व हिंग घालावे. पोट जड झाले असता, गॅसेस कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी हे पाचक उत्तम औषध आहे.
ऋतूनुसार आजार वाढले, तरी त्या आजारांवर उपायही निसर्गच देत असतो. आपल्या संस्कृतीत सण व आरोग्याची सांगड इतकी योग्य घातली आहे, की आहार हेच औषध ठरते.
देविका जोशी-गोखले