श्रावण महिना जणू स्त्रीसखा असतो. आपल्या आरोग्यसंस्कृतीनुसार सार्या रूढी-परंपरा स्त्रीचे सर्वांगीण आरोग्य जपण्यासाठीच जणू सांगितल्या आहेत. ईश तत्त्वांपर्यंत अर्थात परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी ती आई. प्रत्येक स्त्रीमध्ये लहानपणापासून आईपणाचा मुकूट लेण्याचे एक ध्येय लपलेले असते. आई होण्यात स्त्रीजन्माची सार्थकताच असते म्हणा ना. ती जपायची कशी ते पाहूया.
रमा आणि श्रीश यांचे लग्न झाले, तेव्हा दोन्ही कुटुंबीयांमध्ये खूप आनंद साजरा झाला. रमा एक करिअरला प्राधान्य देणारी स्त्री होती आणि श्रीश व त्याच्या कुटुंबीयांचा तिला संपूर्ण पाठिंबा होता. आजच्या काळानुरूप लग्नानंतर रमाचे कामकाज उत्तम रितीने चालू होते. दरम्यान विवाहानंतर दोन-तीन वर्षांमध्ये निसर्गनियमानुसार दोनवेळा रमाला गर्भधारणा झाली. (कुटुंबनियोजनाचा अंदाज चुकला.) गोळ्या घेऊन रमाने पाळी आणली खरी, पण शरीराला खूप त्रास झाला. तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेतला नाही.
लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर रमा आणि श्रीश यांनी बाळ होण्याचे ठरवले खरे, पण गर्भाशयाची गादी बाळाला रुजू द्यायला तयारच झाली नाही आणि मग मात्र डॉक्टरकडे पळण्याची वेळ आली. प्रथम गर्भधारणा झाल्यावर ती नाकारणे हे गर्भाशयाच्या दृष्टीने त्रासदायक होऊ शकते. हे शास्त्रीय सत्य आज अनेक संशोधनांनी सिद्ध होऊन पाहात आहे. त्यामुळे योग्य कुटुंब-नियोजनाचे मार्गदर्शन घ्यावे, हेच उत्तम.
आई‘पण’ आणि मातृत्व
आजच्या जमान्यात आई बनणे खरंच एक ‘पण’ (challange) आहे. आधुनिक जीवनशैली जितकी त्रासदायक आहे, तितकेच आधुनिक तंत्रज्ञान मदतीला येते. पण, तरीही आधुनिक उपचारानंसह योग्य जीवनशैली मार्गदर्शन घेणेही जरूर आहे.
1) योग्य निदान
2) योग्य उपचार/मार्गदर्शन
3) संयम
4) सर्वसमावेशक उपाययोजना मातृत्वाने आपली ओटी भरणे तितकेसे अवघड राहिले नाही.
आईचा जन्म
बाळ पोटात राहिल्यापासून बाळंतपणापर्यंत प्रत्येक क्षणी एका आईचा जन्म होत असतो. आई म्हणून खरं तर बाळाऐवजी आईच जन्माला येते. या सार्या घडामोडींदरम्यान स्त्रीच्या शरीर, मन, भावना यांत खूप बदल होत जातात. घरातल्या सगळ्यांनी विशेषतः पुरुष मंडळींनी हे जाणून घेतले पाहिजे.
गर्भारपणेपूर्वी
गर्भारपणेपूर्वीचे तीन महिने अतिशय महत्त्वाचे असतात. स्त्रीबीजवाढीदरम्यान स्त्रीला विशिष्ट आहार मिळाला, तर बिजाचे यथायोग्य व उत्तम पोषण होते.
1) फॉलिक अॅसिड
2) व्हिटामिन डी 3
3) ब जीवनसत्त्व
अशांसारख्या जीवनसत्त्वांबरोबरच स्त्रीची पचनशक्ती उत्तम असणे जरुरीचे असते.अर्थात,
1) योग्य व्यायाम
2) पुरेशी विश्रांती
3) पोषक आहार
4) वेळेवर जेवणाची उपलब्धी
यांसारख्या गोष्टींसाठी पतीने व घरातल्या माणसांनी जागरूक राहायला हवे.
प्रसन्न मन
आई होणे ही केवळ शारीरिक बाब नसते, तर
1) मनाची प्रसन्नता
2) भावनिक सक्षमता
3) आनंदी वृत्ती
4) पती-पत्नीचे स्नेहबंध
सार्या गोष्टींना तेवढेच महत्त्व असते.
सुकामेवा योग्य प्रकारे वापरून पाहा, जो सर्वांगीण स्त्री आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.
(1) जर्दाळू - शरीराला ताकद देण्यात उत्तम (ओला व सुका) - बी फोडून आतला गर खावा. यातील बिटा कॅरोटिन व लायकोपेन दोन्हींमुळे कर्करोग व हृदयविकाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते. (अॅण्टिऑक्सिडंट) - अर्थात मन, शरीराला प्रसन्नता देणारा उत्तम सुकामेवा.
(2) अंजीर - (ओले व सुके) चावून खाल्ल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते.
दोन अंजीर + एक चमचा जेष्ठमध + सैंधव + मिरी शरीर, मनाचे पोषण करते. मरगळ घालवते.
(3) मनुका - (काळ्या, लाल) जीवननीय असल्याने शरीर, मनाला टवटवीतपणा देतात. त्वरित ऊर्जा मिळायला गर्भार स्त्रियांनाही भिजवून देता येतात.
(4) बदाम - मांसपेशींना वाढवणारा बदाम शरीर, मनाचे पोषण करतो, पण जाडेपणा वाढू देत नाही. संयम व सकारात्मकता वाढायला उपयोगी.
(5) अक्रोड - संधिवातात उपयुक्त असा अक्रोड शरीर, मनाला टवटवीतपणा देतो व मनाची मरगळ घालवतो. मानसिक आरोग्य गर्भारपणी जपले गेले, तर पुढे गर्भधारणा व बाळाच्या मानसिक क्षमताही यथायोग्य वाढतात, ते नक्की. गर्भारपणात, बाळ पोटात वाढत असताना, गर्भारपणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्रीचे जेवण-खाण, वागणे-बोलणे जपायला हवे.
1) आजूबाजूला (सिगारेट स्मोकिंग) धूम्रपान नको
2) तणावाचे वातावरण गर्भापर्यंत रसद पोहोचवू देत नाही व गर्भाची वाढ नीट होत नाही. तणावापासून गर्भार स्त्रीला दूर ठेवायला हवे.
3) गर्भारपणी निर्माण होणार्या इच्छांचा (डोहाळे) योग्य आदर करायला हवा.
4) स्त्रीशरीरात बदलांची तीव्र परिस्थिती तयार होत असताना स्त्रीच्या मनाला, भावनांना जपले पाहिजे.
5) स्त्रियांना योगसाधना, श्वास चांगला घेणे, विश्रांती याचे गणित चांगले जमले की गर्भ व गर्भार स्त्री दोघांच्या आरोग्याचे समीकरण जमते.
6) राजगिरा, कोहळा, शिंगाडा, साळीच्या लाह्या, कमल काकडी, मौसमी फळे, दूध, तूप, कळ्या मनुका, पंचामृत सार्या खाद्यपदार्थांचा यथायोग्य उपयोग करावा.
बाळंतपण
आजच्या काळात गर्भपाताचे प्रमाण वाढलेले दिसते. अशा वेळी अर्धवट टप्प्यांवरही संपूर्णपणे बाळंतपणासारखीच काळजी घ्यावी. आईपणाचे सार्थक बाळाला दूध पाजण्यात असते. त्यामुळे उभयतांचा भावबंध आयुष्यभरासाठी दृढ होतो, तो कधीच तुटत नाही.
1) योग्य विश्रांती
2) डिंक, मेथी, अव्हाळीक तूप इ.चा यथायोग्य वापर
3) स्नेह - तेलमसाज
4) प्रमाणात खाणे-पिणे/व्यायाम
बाळंतपणातील निराशा, ताण याचे प्रमाण सध्या वाढत आहे. अशा वेळी घरातल्या व्यक्तींनी व स्त्रीने स्वतःही सजग राहायला हवे. बाळंतपणाचा बाऊ करायला नको, पण त्याला खूप हलक्यातही घेऊ नये.
आई, तुझी प्रतिमा...
आजच्या आईला खूप सोशिक, त्यागमूर्ती, घरात बसून राहणे शक्य नाही. खरे तर (Quantity) दीर्घकाळ मुलांना देणे याऐवजी (Quality) योग्य वेळ देणे आवश्यक असते. टेक्नोलॉजीचा योग्य वापर (गैरवापर टाळणे) मुलांशी सुसंवाद आत्मविश्वास यातून आईपण फुलले पाहिजे. आईपण किती भारी आहे, याची स्त्रीसकट घरातल्या सगळ्यांना जाणीव व्हायला हवी. श्रावणातील जीवतीपूजन बाळाप्रमाणे आईचीही काळजी घेणारे असावे. देवीसारखे आईला पूजले नाही, तर मनुष्यत्वाचे किमान अधिकार आईला मिळालेच पाहिजेत; तर आई आपल्या स्वतःचा आईपणाचा खरा सन्मान उपभोगू शकेल.
आईपणाच्या ओझ्याखाली
दबते कोमल स्त्री बिचारी
अवास्तव अपेक्षा अन्
देवी बनण्याची जबरदस्ती
काळाबरोबर बदलायला हवे
आईलाही माणसाप्रमाणे
मनाप्रमाणे जगता यावे...डॉ. मधुरा कुलकर्णी
(लेखिका एम. डी. आयुर्वेद-स्त्रीरोग प्रसूती आहेत, तसेच त्यांनी डिप्लोमा इन योग अॅण्ड फिलॉसॉफी (मुंबई) पूर्ण केला आहे.)
(आरोग्य भारती कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)