पक्षी स्थलांतराचा अभ्यास आता 'जीपीएस', 'जीएसएम' टॅगव्दारे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2020   
Total Views |
tiger_1  H x W:
 
 

‘बीएनएचएस’ १० पक्ष्यांना लावणार ‘जीपीएस’,‘जीएसएम’ यंत्र

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - दूरदेशातून आलेल्या पक्ष्यांच्या स्थलांतराचा मागोवा घेणारा अभ्यास आता 'जीपीएस' आणि 'जीएसएम' टॅगद्वारे केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव 'टेलिमेट्रिक' पद्धतीने पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यास परवानगी देत नव्हते. आता सरकारकडून यासाठी परवानगी मिळाल्याने 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'कडून (BNHS) १० पक्ष्यांना ’जीपीएस’ आणि 'जीएसएम' टॅग लावण्यात येणार आहेत.
 
 
 

tiger_1  H x W: 
 
 
'सेंट्रल एशियन फ्लायवे' या पक्षी स्थलांतराच्या महत्त्वाच्या आकाशमार्गामध्ये भारताचा समावेश होतो. या आकाशमार्गावरून उत्तर आशियातील बहुतांश पक्षी हिवाळ्यात भारतात स्थलांतर करतात. 'बीएनएचएस'(BNHS)कडून या स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास गेल्या सहा ते सात दशकांपासून सुरू आहे. हा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीद्वारे केला जातो. 'रिंग' आणि 'कलर फ्लॅग' ही त्यामधील सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पद्धत आहे. यामध्ये पक्ष्याच्या पायाला सांकेतिक क्रमांक असलेली ‘रिंग’ आणि विशिष्ट रंगाचा ‘फ्लॅग’ लावण्यात येतो. मात्र, या माध्यमातून पक्ष्यांच्या प्रवासाची नेमकी माहिती मिळण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे या पद्धतीचा वापर करण्याबरोबरच ’बीएनएचएस’ आता पक्ष्यांना ’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ टॅगही लावण्याच्या तयारीत आहे.
 
 

tiger_1  H x W: 
 
गेल्या काही वर्षांपासून ’टेलिमेट्रिक’ पद्धतीने पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकार परवानगी देत नव्हते. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या परवानग्या नाकारल्या जात होत्या. मात्र, आता यासंदर्भातील परवानगी दिली जात असल्याने ’बीएनएचएस’ पक्षी स्थलांतराचा अभ्यास ’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ यंत्रणेद्वारे करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी दिली. परदेशातून मागवलेली ’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ उपकरणे भारतात दाखल झाली असून महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक टप्प्यामध्ये १० पक्ष्यांना ही उपकरणे लावणार असून त्यामध्ये ६ फ्लेमिंगो (छोटा आणि मोठा), २ मोठा करवानक आणि २ कुदळ्या पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती ’बीएनएचएस’चे (BNHS) सहायक संचालक (प्राकृतिक इतिहास विभाग) राहुल खोत यांनी दिली. यासंदर्भात महाराष्ट्र वनविभागाकडून परवानगी मिळाली असून ही उपकरणे विक्रेत्यांकडून आमच्या ताब्यात घेण्यासाठी ’केंद्रीय पर्यावरण मंत्रालया’ची परवानगी येत्या काही दिवसांमध्ये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ यंत्रणा म्हणजे काय?
 
पक्षी स्थलांतर अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पक्ष्यांवर लावले जाणारे उपकरण त्यांच्या वजनाच्या २ टक्के असणे अपेक्षित आहे. ’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ यंत्राचे वजन हे अनुक्रमे ३.५ ग्रॅम आणि १० ग्रॅम असते. त्यामुळे हे उपकरण लावण्यासाठी आम्ही फ्लेमिंगोसारख्या मोठ्या पक्ष्यांची निवड केल्याची माहिती खोत यांनी दिली. या दोन्ही उपकरणांमुळे वायरलेस पद्धतीने पक्ष्यांच्या स्थलांतरादरम्यानची माहिती संशोधकांना मिळणार आहे. ’जीपीएस’ उपकरणामुळे पक्ष्याचा स्थलांतरादरम्यानचा वेग, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक स्थानाची माहिती मिळणार आहे, तर अत्याधुनिक ’जीएसएम’ उपकरणामुळे वर नमूद केलेल्या तीन गोष्टींबरोबरच स्थलांतरादरम्यानचा कोनीय वेग, वार्याचा दबाव, स्थलीय चुंबकत्व, प्रकाशाची तीव्रता आणि तापमानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
 
 

tiger_1  H x W: 
@@AUTHORINFO_V1@@