शंकराला आवडणारी म्हणून नामकरण केले शांभवी; सिंधुदुर्गातून टाचणीच्या नव्या प्रजातीचा शोध

    16-Aug-2025
Total Views |
new species of damselfly




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि दोडमार्ग तालुक्यामधून टाचणीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of damselfly). आंबोलीतील हिरण्यकेशी येथील शंकराच्या मंदिरात संशोधकांना ही प्रजात सर्वप्रथम दिसली (new species of damselfly). त्यामुळे शंकराला आवडणारी शांभवी म्हणून या प्रजातीचे नामकरण 'प्रोटोस्टिक्टा शांभवी' असे करण्यात आले आहे. (new species of damselfly)
 
 
टाचणी ही चतुर प्रजातींमधील एक प्रकार असली तरी, तिचा समावेश स्वतंत्र गटात होतो. यामधील 'प्रोटोस्टिक्टा' कुळातील टाचणीच्या दोन नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. आयुकारा विवेक चंद्रन, डाॅ. दत्तप्रसाद सावंत, रेजी चंद्रन, डाॅ. पंकज कोपर्डे, हेमंत ओगले, अभिषेक अशोक राणे आणि डाॅ. कृष्णमेघ कुंटे यांनी केरळ आणि आंबोली दोडामार्गातून नव्या प्रजातीचा उलगडा केला आहे. यासंबंधीचे संशोधन वृत्त शुक्रवार दि. १५ आॅगस्ट रोजी 'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे. यामधील केरळमधून शोधलेल्या प्रजातीचे नाव प्रोटोस्टिक्टा सॅन्गुनिथोरॅक्स (किरमिजी छायासुंदरी), तर आंबोली-दोडामार्गमधून शोधलेल्या प्रजातीने नामकरण प्रोटोस्टिक्टा शांभवी (कोकण छायासुंदरी), असे करण्यात आले आहे.
 
 
प्रोटोस्टिक्टा शांभवी म्हणजेच कोकण छायासुंदरी ही प्रजात सर्वप्रथम डाॅ. दत्तप्रसाद सावंत आणि हेमंत ओगले यांना जून २०२१ मध्ये आंबोलीतील हिरण्यकेशी मंदिराच्या परिसरात दिसली होती. त्यावेळी त्यांना ही प्रजात 'प्रोटोस्टिक्टा सॅंगुइनोस्टिग्मा' म्हणजेच लाल ठिपक्यांची छायासुंदरी वाटली होती. मात्र, सूक्ष्म छायाचित्र काढल्यानंतर ही प्रजात वेगळी असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर ही प्रजात त्यांना आंबोलीजवळच असलेल्या नेने गावात देखील आढळली. म्हणून त्याठिकाणाहून या प्रजातीचे नमुने गोळा करुन त्यांनी बंगळूरू येथील 'नॅशनल सेन्टर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स'च्या (एनसीबीएस) प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली. दरम्यान आॅगस्ट, २०२४ मध्ये ही प्रजात दोडामार्ग जिल्ह्यातील 'वानोशी फॉरेस्ट होम स्टे'च्या आवारातील ओढ्यात अभिषेक राणे यांना देखील आढळली. प्रयोगशाळेतील संशोधनाअंती ही प्रजात नवीन असल्याचे आढळून आले.
 
शांभवी नाव का ?
शांभवी म्हणजे "शिवाची पत्नी" किंवा "पार्वती". ही प्रजात सर्वप्रथम हिरण्यकेशी येथील शंकराच्या मंदिरात दिसल्याने संशोधकांनी तिचे नामकरण शंकराला आवडणाऱ्या पार्वतीवरुन करण्याचे ठरवून शांभवी असे केले. मराठीत या प्रजातीला कोकण छायासुंदरी म्हणून ओळखले जाईल. कारण या प्रजातीचा शोध कोकणातून लावण्यात आला आहे. शिवाय विश्रांती घेण्यासाठी त्या छायेत बसतात आणि दिसायला सुंदर दिसतात म्हणून कोकण छायासुंदरी. नव्याने शोधलेली ही प्रजात ४.५ सेंटीमीटर आकाराची असून ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत दिसते.
दोन प्रजातींमध्ये विभागणी
आम्ही शोधलेल्या दोन्ही प्रजाती या पूर्वी १९२२ साली शोधण्यात आलेल्या लाल ठिपक्यांची छायासुंदरी आहेत, असे वाटत होते. मात्र, या नव्या प्रजातींचा उलगडा झाल्याने १०३ वर्षानंतर एका प्रजातीमधून दोन प्रजातींची विभागणी झाली आहे. जनुकीय अभ्यासानुसार कोकण छायासुंदरी ही प्रजात लाल ठिपक्यांच्या छायासुंदरीपेक्षा ११ टक्क्यांनी वेगळी आहे. तिच्या पोटाकडील आणि शेपटीकडील उपांगाची आकारशास्त्रीय मांडणी केल्यानंतर व गूणसूत्र तपासणीनंतर ही बाब लक्षात आली आहे. - डाॅ. दत्तप्रसाद सावंत संशोधक