साफल्य जीवन संग्रामाचे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |


vedamrut_1  H x


धृतव्रता: क्षत्रिया यज्ञनिष्कृतो

बृहद्दिवा अध्वराणामभिश्रिय:।

अग्निहोतार ऋतसापो अद्रुहोऽपो

असृजन्ननु वृत्रतूर्ये॥

(ऋग्वेद-१०.६६.८)

अन्वयार्थ

(धृतव्रता:) व्रतांना धारण करणारे (क्षत्रिया:) शूरवीर क्षत्रिय (यज्ञनिष्कृत:) यज्ञकार्यांना पूर्णपणे यशस्वीरीत्या पार पाडणारे (बृहद्दिवा) महातेजस्वी (अध्वराणाम् अभिश्रिय:) अहिंसक कार्यांचा आश्रय घेणारे (अग्निहोतार:) अग्निमय जीवन जगणारे, अग्निहोत्र करणारे (ऋतसाप:) सत्य-नियमांना अनुसरून चालणारे (अद्रुह:) कधीही द्रोह न करणारे... असे हे महान लोक (वृत्रतूर्ये) पापाला नष्ट करणाऱ्या संग्रामामध्ये (अनु) स्वत:ला अनुकूल अशा (अप:) कर्मांना (असृजन्) यशस्वीरित्या पूर्ण करतात.

विवेचन

जीवन म्हणजे एक महासंग्राम आहे. यातील प्रत्येक क्षण हा युद्धाचा प्रसंग! पण तो असतो असामान्य धैर्यवंत योद्ध्यांसाठी! हे योद्धे सामर्थ्यशाली असतात. त्यांच्या जीवनात सुख-दु:ख, हानी-लाभ, नफा-तोटा, यश-अपयश, जय-पराजय असे हे विविध द्वंद्वात्मक प्रसंग नेहमीच समोर येतात. पण ते यांना थोडेही घाबरत नाहीत. या संग्रामांमध्ये ते निश्चितच विजयी होत ठरतात. कारण, त्यांच्यामध्ये त्यांचा सामना करणारे सद्गुण मोठ्या प्रमाणात असतात. याच संग्रामाला वैदिक भाषेत 'वृत्रतूर्य' असे म्हणतात. 'वृत्र' म्हणजे पाप किंवा पापांचा अंधार आणि 'तूर्य' म्हणजे नाश करणारा! पापरूपी अंधाराला नष्ट करणारा! संग्राम हा भित्र्यांसाठी कदापी नसतो. युद्धाचे मैदान हे शूरवीरांना आनंदाने युद्धक्रीडा करण्यासाठी असते. म्हणूनच तर धैर्यसंपन्न क्षत्रियांच्या गळ्यात विजयश्री पडत असते. कुरुक्षेत्राच्या रणांगणात युद्धाच्या पहिल्याच दिवशी समोर आपल्याच नातलगांना पाहून मोहीभूत झालेल्या व संग्राम सोडू इच्छिणाऱ्या वीर अर्जुनाला श्रीकृष्णांनी संजीवनी देत म्हटले होते -

क्लैव्यं मा स्म गम: पार्थ नैतत्त्वय्युपपद्ये।

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप॥

"अरे पार्था! नपुंसकतेला प्राप्त होऊ नकोस. तुझ्यासारख्या शूरांकरिता ही कृती योग्य नव्हे. हृदयाच्या क्षुद्र दुर्बलतेला सोडून युद्धांसाठी सज्ज हो. ऊठ, उभा राहा आणि सामर्थ्याने लढ. कारण, युद्धात मृत्युमुखी होशील, तर अमृतत्त्वाला प्राप्त होशील आणि जिंकशील तर या पृथ्वीवरील राज्यसुखाचा उपभोग घेशील."

हा संग्राम कशाकरिता? तर तो असतो अन्याय, अविद्या, अन्याय किंवा दुरितांच्या नाशासाठी! युद्धाचा उद्देश हा पावित्र्य जपण्यासाठी, सत्यसंवर्धनासाठी किंवा प्रजारक्षणासाठी असतो. बाह्य जगातील युद्धांबरोबरच आपल्या अंतर्मनातदेखील द्वंद्वांचे युद्ध सुरू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, इर्ष्या, अहंकार हे षड्रिपू हे विश्वविजेत्या सम्राटासदेखील नेहमी त्रस्त करतात. असे असले तरी आत्मज्ञानी व आत्मसम्राट हे मात्र कधीच घाबरत नाहीत. कारण, त्यांच्या हृदयपटलावरील संग्रामात 'आत्मा' हा प्रचंड सामर्थ्यशाली व सत्यनिष्ठ असतो. तो स्थिर आहे, पण मन व इंद्रिय नेहमीच द्वंद्वयुद्ध सुरू आहे. यांना जिंकणारे आत्मयोगी असतात. बाह्ययुद्धामध्ये पाप्यांचा नायनाट करणारे अर्जुन, भीम, शिव-प्रतापांसारखे उत्तम सुधीर असतात. मात्र, वीर, ध्यानी, ज्ञानी मुनिजन योद्धे. हे धाडसी योद्धे सत्यानुकूल कर्म करणारे असतात. अनिष्ट कार्यासाठी लढणे हा त्यांचा उद्देशच नसतो. कृष्णांनी आपल्या जन्माचा उद्देशदेखील यासाठीच, तर कथन केला आहे -

परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय च सम्भवामि युगे युगे ॥

साधु-संतांचे, सज्जनांचे रक्षण व दुष्ट-दुर्जनांचा विनाश आणि धर्माच्या स्थापनेकरिता मी युगानुयुगे जन्म घेऊ इच्छितो. किती विशाल दृष्टिकोन आहे हा! या युद्धाच्या मैदानावर लढणारे वीर योद्धे कसे असावेत? आणि त्यांची पात्रता कोणती असावी? या संदर्भात सदरील ऋचेत सुंदर विवेचन केले आहे. हे शूरवीर सम्राट आठ बाबींनी परिपूर्ण असावेत. त्यांचा अनुक्रमे विचार करूया! -

) धृतव्रता : पवित्र संग्रामात लढणारा योद्धा हा व्रती असावा. त्याने सत्याचे व पावित्र्याचे व्रत धारण केले पाहिजे. मनात दृढ इच्छाशक्ती असेल तर संग्रामात विजय मिळू शकतो. यालाच 'दृढ संकल्प' किंवा 'प्रतिज्ञा' असेही म्हणतात. संकल्प किंवा प्रतिज्ञा ही बलिष्ट नसेल, तर युद्धात लढणारा सैनिक हा शरीराने कितीही बलशाही असला तरी तो खचून जातो आणि शेवटी पराभवाला सामोरे जावे लागते. याकरिता तो व्रतधारी असावा.

) क्षत्रिया : शत्रूंशी दोन हात करणारे योद्धे हे क्षात्रतेजाने परिपूर्ण असावेत. क्षात्रभावना ही सैनिकांची दिव्यशक्ती असते. 'क्षत' म्हणजे सर्व प्रकारचा र्‍हास किंवा नाश आणि 'त्र' म्हणजे रक्षण! 'क्षतात् त्रायन्ते इति क्षत्रिया:।' स्वत:बरोबरच आपल्या प्रजाजनांना विनाशापासून वाचविणारे आणि त्यांचे रक्षण करणारे शूरवीर योद्धे असतील, तरच युद्धात विजय मिळू शकतो, अन्यथा पराजय झालाच समजा! याकरिता क्षत्रिय वीर हे युद्धात आवश्यक असतात.

) यज्ञनिष्कृत : जीवनसंग्रामात कार्य करणारे वीर हे यज्ञकर्मांना संपादित करणारे असावेत. यज्ञ म्हणजे पवित्र व शुभ कार्य! शतपथ ब्राह्मण ग्रंथात म्हटले आहे- 'यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्मम्।' यानुसार प्रत्येक शुभकर्म हे यज्ञ आहे. त्याग, समर्पण, सेवा, परोपकार ही सर्व यज्ञाची दुसरी नावे! देवपूजा, दान, संगतीकरण ही त्रिसूत्री म्हणजे यज्ञ! जीवन जगताना ही शुभकर्मे योद्ध्यांना करावीच लागतात. त्याशिवाय जीवनरूपी संग्राम यशस्वी होऊ शकत नाही.

) बृहद्दिवा: संग्राम लढणाऱ्या सैनिकांमध्ये 'बृहत्दिवा' म्हणजे विशाल दिव्यत्व असावे. महान तेज, तप आणि ब्रह्मचर्यशक्तीच्या साहाय्याने हे दिव्यत्त्व प्राप्त होत असते. म्हणूनच योद्धा हा दिव्य गुणांनी परिपूर्ण असावा. जीवनसंग्राम यशस्वी होतो, तो अशाच प्रकारचे दिव्यत्व धारण करणाऱ्या वीर योद्ध्यांमुळे..!

) अहिंसेचा आधार :'हिंसेने हिंसा वाढते' असे आपण म्हणतो. जीवन यशस्वी करू इच्छिणाऱ्यांनी अहिंसेला आपल्या जीवनाचे आधार बनवावे. आपल्या शरीर, मन, वाणीने कधीही कोणाला दुखविणार नाही, याची दक्षता योद्ध्यांनी घेतली पाहिजे. प्रिय स्वभाव आणि मधुर व्यवहाराने इतरांची मने जिंकावीत. याकरिता 'अध्वराणाम् अभिश्रिय:।' म्हणजे योद्ध्यांनी अहिंसक वृत्तीचा आश्रय घेत हिंस्र भावनांचा त्याग करावयास हवा.

) अग्निहोतार : अग्नी हा भारतीयांचा प्रमुख देवता आहे. अग्नीची आराधना म्हणजे तेजोमय जीवनाचा श्रीगणेशा! शुद्ध अंत:करणाने व योग्य शास्त्रोक्त विधीनुसार दररोज अग्निहोत्र केल्यास एक तर घर व परिसरात सुगंध दरवळतो, प्रदूषणाचे उच्चाटन होते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. त्याबरोबर मनसा, वाचा, कर्मणा जीवन ही पवित्र बनते. म्हणूनच योद्धे हे अग्निहोत्र करणारे असावेत.

) सत्य नियमांचे पालन : जीवन यशस्वी करू इच्छिणारे साधक हे शाश्वत नियमांचे पालन करणारे असावेत. महर्षी पतंजली प्रणित अष्टांगयोगातील यम-नियमांचा अंगिकार करावा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या पाच यमांसह शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान या पाच नियमांचे पालन करणे अनिवार्य असते. कारण, या सर्वांच्या मुळाशी सृष्टीची शाश्वत तत्त्वे आहेत. म्हणून वीर योद्ध्यांना 'ऋतसाप' म्हणजेच सृष्टी नियमांच्या आधारे चालावे लागते.

) अद्रुह : आपल्या व्यवहारातून कदापी द्रोह होता नये. 'अद्रोह: सर्वभूतानाम्!' सर्व प्राणिमात्रांविषयी द्रोह व हिंसा न करण्याची सद्भावना असावयास हवी. आपल्यामुळे इतरांना यत्किंचितही त्रास होता नये. याची काळजी सर्वांनी विशेष करून योद्ध्यांनी घ्यावयास हवी. वरील आठ बाबींचे पालन केल्यास जीवनसंग्राम सफल होतो.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@