रिक्षाचालक ते नेता : हॉटेल, हॉस्पिटल, इंटरनॅशनल स्कुलचे मालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020
Total Views |

Pratap Sarnaik_1 &nb
 
 
 

जाणून घ्या कसा आहे त्यांचा प्रवास

 
 
ठाणे : ओवाळा माजीवाडा, ठाणे विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचलनालयाने कारवाई केली. डोंबिवली ते ठाणे, असा त्यांचा २५ वर्षांचा प्रवास एक रिक्षाचालक ते १२६ कोटींचे मालक, असा त्यांचा प्रवास आहे. केवळ राजकारण न करता बांधकाम व्यावसाय, हॉटेल्स, रुग्णालये, मराठी चित्रपटांची निर्मिती, असा त्यांच्या प्रगतीचा आलेख आहे. मुख्यत्वे त्यांच्यावर झालेली कारवाई ही राजकारणाशी संबधित नसून तर त्यांच्या व्यावसायिक व्यवहारांसंदर्भात आहे.
 
 
 
मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास सरनाईक यांचे निवासस्थान, कार्यालये आणि विविध १० ठिकाणी ईडीच्या मार्फत ही शोध मोहीम सुरू आहे. त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची पाच तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, प्रताप सरनाईकही परदेशातून परतले आहेत. मात्र, कोविडच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, त्यांना आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
 
 
एक रिक्षाचालक ते कोट्याधीश, असा थक्क करणारा सरनाईक यांचा प्रवास याची चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू आहेत. सरनाईक यांनी डोंबिवलीतून आपली सुरुवात केली. ते सुरूवातीच्या काळात या भागात रिक्षाचालक होते. घरची परिस्थितीही हालाखीची, तर त्यांच्या पत्नीची अंडाबुर्जीची गाडी असल्याचे त्या काळचे ठाण्यातील त्यांचे परिचित सांगतात. रिक्षाचालक तिला या व्यवसायात साथ देत होते. पुढील काही वर्षांत डोंबिवलीतील मुक्काम त्यांनी ठाण्यात हलवला.
 
 
१७ वर्षांपूर्वी ते ठाणेकर बनले. सध्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांनी मैत्री केली. हळूहळू राजकारणात पाळेमुळे घट्ट रोवण्याचा प्रयत्न सरनाईक यांनी केला. त्यांच दरम्यान ठाण्यात त्यांच्या बांधकाम व्यावसायाचीही सुरुवात झाली. राजकीय आणि व्यावसायिक चढउतार पार करत सरनाईक स्थिरस्थावर होत होते. ठाणे महापालिकेत नगरसेवक बनले, विरोधी पक्ष नेते पदावरून सरनाईक आणि आव्हाड यांच्यात वाद झाले. आव्हाडांच्या फटकळ स्वभावाचा फटका सरनाईक यांना फार पूर्वीच बसला. राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
 
 
या सगळ्यात त्यांच्या व्यावसायाचा पसारा वाढत चालला होता. त्यांनी राजकारण करत असताना तिकडे दुर्लक्ष होऊ दिले नव्हते. शिवसेनेतही त्यांना अनेक पक्षांतर्गत शत्रू मिळत गेले. मात्र, सरनाईक ओवाळा माजीवाडा विधानसभा या नव्याने निर्माण झालेल्या मतदार संघाचे ते आमदार झाले. या मतदार संघावर तीनदा निवडून येत त्यांनी आपली पकड मजबूत केली. याच काळात वर्तकनगर येथे दोन आणि घोडबंदर भागात त्यांचे विहंग सरनाईक यांच्या नावे हॉटेल्स आहेत.
 
 
 
हॉस्पिटल क्षेत्रातही त्यांनी आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नावे घोडबंदर भागात इंटरनॅशन स्कुलही सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपले नाव आजमावले आहे. त्यामुळे रिक्षाचालक ते विविधांगी व्यक्तीमत्व, अशी त्यांची ओळख आहे.
 
 
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत सरनाईक यांनी निवडणुक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. त्यांच्याकडे १२६.२९ कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. जंगम मालमत्ता २१ कोटी ८९ लाख ६९ हजार १६५ रुपये, तर स्थावर मालमत्ता १०४ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये इतकी आहे. कर्जाची रक्कम ११० कोटी ९६ लाख ५८ हजार १६८, वाहन, सोने चांदी २५ तोळे, पत्नीच्या नावे दोन वाहन ५० तोळे दागिने, गाळा व सदनिका अशी एकूण संपत्ती दाखविली आहे.
 
 
दरम्यान, सरनाईक यांनी पुढील आठवड्यात चौकशीला बोलवा, अशी विनंती ईडीकडे केली आहे. त्यामुळे सरनाईक ईडीला घाबरत आहेत की, कोरोनाला असा प्रश्न आता विचारला जात आहे. दुसरीकडे शिवसेनेने सरनाईक यांच्या समर्थनात सोशल मीडियावर जोरदार मोहिम सुरू केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@