रक्षिण्या जीवन! सुबुद्धी, सत्कर्म दे ईश्वरा...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2020
Total Views |

gayatri mantra_1 &nb


एखाद्या श्रीमंत माणसाला विनवणी करावी आणि त्याने आपल्या हातांनी हजारो रूपयांची राशी प्रदान करावी, त्याप्रमाणे हा पिता देत नाही, तर त्याही पलीकडे जाऊन तो आपल्या याचकांच्या बुद्धीला सम्यक दिशा देतो. गायत्री मंत्रातही याचकरिता किती सुंदर कामना केली आहे- ‘धियो यो न: प्रचोदयात्।’ हे ईश्वरा! तू आम्हा जीवमात्रांच्या बुद्धितत्त्वांना सन्मार्ग दाखव, प्रेरणा दे.


तमीशानं जगतस्तस्थुषस्पतिं धियं जिन्वमवसे हूमहे वयम्।
पूषा नो यथा वेदसामसद्वृधे, रक्षिता पायुरदब्ध: स्वस्तये॥
(ऋग्वेद-१.८९.५, यजु.२५.१८)


अन्वयार्थ -

(वयं) आम्ही सर्वजण (तम्) त्या (जगत: तस्थुष: पतिम्) जंगम आणि स्थावर जगाचे पति-पालक असलेल्या (धियं जिन्वम्) बुद्धी व कर्म यांना प्रेरित करणार्‍या (ईशानम्) परमेश्वराला (अवसे) रक्षणाकरिता (हूमहे) आवाहन करतो, आळवणी करतो. (यथा) ज्याप्रमाणे तो (पूषा) सर्वांचा पोषक (न:) आमच्या (वेदसाम्) धनांच्या (वृधे) वृद्धीसाठी (असत्) तत्पर झाला आहेस, त्याचप्रमाणे तो (स्वस्तये) आम्हां सर्वांच्या कल्याणाकरिता (अदब्ध:, रक्षिता, पायु:) अहिंसक, रक्षक आणि पालक ठरो!


विवेचन -


आज संपूर्ण जग दु:खाच्या आगीत होरपळत आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक दु:खांमुळे समग्र विश्व त्रस्त झाले आहे. अनेक प्रकारच्या संकटांमुळे व विघ्नांमुळे मानवाला जगणे असह्य वाटू लागले आहे. अनेक दुर्धर आजार, भयंकर अपघात आणि नैसर्गिक आपदा यांमुळे सर्वत्र अस्थिर असे विदारक चित्र पाहावयास मिळते. हे असे वातावरण केवळ आजच नव्हे, तर भूतकाळात होते व भविष्यातही होत राहणार ! अशा प्रसंगी आम्ही मदतीसाठी अनेकांचा धावा करतो. परिसरातील धनवंतांकडे, नातेवाईकांकडे किंवा शासनाकडे आर्थिक साहाय्याची मागणी करतो. पण ही याचना क्वचितच मान्य होते. समजा मदत मिळालीच, तर ती अधुरीच ठरते. एखाद्याने आर्थिक पाठबळ दिले, पण विचार व ज्ञानाची बौद्धिक प्रेरणा त्याच्याकडून नाही मिळाली, तर काय उपयोग? दिलेले पैसे संपून जातील, पुन्हा धनाभाव आणि तेच ते दारिद्य्र! पण या जगाचा निर्माता प्रभू भगवंत हा एक असा महान साहाय्यक व मदतनीस आहे की तो सर्वदृष्टीने आमच्या उपयोगी पडतोे.


याचकरिता मंत्रात म्हटले आहे की - ‘हे समग्र चेतन व जडसमूहाच्या पालका परमेश्वरा! आम्ही इतरांची आळवणी करण्यापेक्षा तुझ्याकडेच याचना करतो. कारण, तू (धियम्) बुद्धी व (जिन्वम्) कर्म या दोन्हींना प्रेरणा देणारा आहेस. यामुळे जसे आमचे भौतिक धनवैभव रक्षिले जाते, तसेच आमच्या आध्यात्मिक शक्तीचेही संवर्धन होते. ऋग्वेदातील अन्य एका मंत्रात म्हटले आहे -
देवो देवानामसि मित्रो अद्भुतो वसुर्वसूनामसि चारु: अध्वरे। याचा आशय असा - हे परमेश्वरा तू देवांचाही देव आहेस. अद्भुत असा मित्र, धनांचा स्वामी व यज्ञादी शुभ कार्यात शोभून दिसणारा, प्रत्ययास येणारा असा तू दिव्य स्वरूपाचा असल्याने तू आम्हा सर्वांचा दाता आहेस.ईश्वर हा सार्‍यांचाच सांभाळ करणारा आहे. त्याच्या व्यवस्थेत सर्वांनाच न्याय आहे, मग चेतन असोत की जड? अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म जीव-जंतूपासून ते विशालकाय स्थूल प्राण्यांची तो काळजी वाहणारा असा तो ‘जगत: पति’ आणि अणुरेणूंपासून ते पर्वतादी स्थूलांचे रक्षण करणारा तो ‘तस्थुष: पति’ आहे म्हणूनच ‘ईशान’ आहे. ‘ईश्’ हा धातू ऐश्वर्य किंवा समृद्धी या दिव्य अर्थाचा बोधक आहे - ‘य ईष्टे सर्वेश्वर्यवान् वर्त्तते, स ईश्वर:।’


पण आजचे विज्ञान किंवा तथाकथित विचारवंत परमेश्वराची व्यवस्थाच मान्य करायला तयार नाहीत. नास्तिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चार्वाक विचारसरणीचे अनुसरण करणारा एक बुद्धिवादी वर्ग ईश्वर, आत्मा, वेदादीशास्त्रे व आध्यात्मिक तत्त्वज्ञान मानावयासच तयार नाहीत. ‘यावत् जीवं सुखं जीवेत्।’ आणि ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?’ अशा श्लोकांची उद्धरणे देत प्रत्यक्ष हेच प्रमाण आणि त्याचे लोकायत हेच एकमेव आधारभूत शास्त्र मानून एकप्रकारे सत्य व चिरंतन अशा ईश्वरी व्यवस्थेलाच आवाहन देत आहेत. पण ईश्वर व त्याची व्यवस्था ही तर महान आहे. ज्याचे ऐश्वर्य सत्य विचारशील अशा ज्ञानाने परिपूर्ण व अनंत असते, तो ईश्वर होय. हा ईशान एखाद्याला साहाय्य करतो, म्हणजे काय प्रत्यक्षात समोर येतो का? माणसांप्रमाणे तो धावत येऊन दोन हातांनी मदत करणारा आहे का? तो तर त्याहीपेक्षा पुढचा आहे. आपल्या प्रेरक शक्तीने हा परमेश्वर सर्वांमध्ये बुद्धी व कर्म करण्याची प्रवृत्ती निर्माण करतो. एखाद्या श्रीमंत माणसाला विनवणी करावी आणि त्याने आपल्या हातांनी हजारो रूपयांची राशी प्रदान करावी, त्याप्रमाणे हा पिता देत नाही. तर त्याही पलीकडे जाऊन तो आपल्या याचकांच्या बुद्धीला सम्यक दिशा देतो. गायत्री मंत्रातही याचकरिता किती सुंदर कामना केली आहे- ‘धियो यो न: प्रचोदयात्।’
हे ईश्वरा! तू आम्हा जीवमात्रांच्या बुद्धितत्त्वांना सन्मार्ग दाखव, प्रेरणा दे. बुद्धी तर आमच्यामध्ये अगोदरच आहे, पण तमोगुणामुळे त्यावर अज्ञानाचा पडदा पडला आहे. त्यामुळे आम्ही अकर्मण्यवादी बनतो. आम्ही किंकर्तव्यमूढ, आळशी व प्रमादी होतो. त्याचबरोबर रजोगुणामुळे आमच्या बुद्धीत चंचलता येते. ती योग्यप्रकारे काम करीत नाही. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेष या पंचक्लेशांमुळे आणि काम, क्रोध, लोभ, मोह, ईष्या आदी सहा रिपूंमुळे आमची बुद्धी वाईट मार्गावर चालू लागते. तिचे दुर्बुद्धीत रुपांतर होऊ लागते. तिला सद्बुद्धीत परिवर्तीत करण्यासाठी आमची तुझ्याकडे विनवणी आहे. म्हणूनच तिला तू तीक्ष्ण बनव...ज्याच्यामध्ये देण्याची पात्रता व योग्यता असते. त्याकडेच माणूस याचना करतो. परमेश्वर बुद्धीला प्रेरित करणारा व कर्म करण्यास प्रवृत्त करणारा या सर्व जगाचा साक्षात पिता आहे, म्हणूनच आम्ही त्रिविध दु:खांपासून वाचण्याकरिता प्रार्थना करतो. त्याच्याकडेच रक्षणासाठी आवाहन करतो.

‘ईश्वर कसा आहे आणि तो काय करतो’ हा नास्तिकाकडून नेहमी विचारला जाणारा आणखी एक प्रश्न! खरेतर हा प्रश्न निर्माणच होऊ शकत नाही. कारण, सृष्टीमध्ये सदैव घडणार्‍या उत्पत्ती, स्थिती व प्रलय यांचा क्रम ज्याने श्रद्धेने अनुभवला आहे, तो कदापि असे प्रश्न करणार नाही. या क्रिया आपोआपच तर घडत नाहीत. त्याकरिता परमेश्वराची ईक्षण म्हणजेच प्रेरक शक्ती कारणीभूत ठरते. त्यामुळेच अनादी काळापासून निसर्गात परिवर्तनाचे चक्र दिसून येेते. या मंत्रात परमेश्वराचे प्रयोजन विशद करताना म्हटले आहे - ‘तो ईश्वर सर्वांचा पोषक आणि सर्व प्रकारच्या धनवैभवांना वृद्धिंगत करणारा आहे. त्या तत्त्वांचाच परिणाम हा की जगातील समग्र वस्तू सुविकसित होताना दिसतात. या कार्याला पाहूनच उपासक म्हणतो - ‘स्वस्तये रक्षिता, पायु:, अदब्ध:।’ हे ईश्वरा! आमच्या कल्याणासाठी तू रक्षणकर्ता, पालक व सदैव अहिंसक भावनेचा हो. कारण, तू ईशान म्हणजेच संपूर्ण सृष्टीचा पोषक असून तो केवळ सर्व प्रकारच्या आध्यात्मिक व भौतिक धनांचा उत्पत्तिकर्ता आहेस. या जगात वरील दोन प्रकारचे ऐश्वर्य मानले जाते. त्याचा निर्माता व पोषणकर्ता हा परमेश्वरच असल्याने त्याने आम्हा सर्वांच्या कल्याणासाठी प्रेरणा द्यावी, अशी कामना केली आहे. मनुष्य हा अल्पज्ञ आहे. त्याने आपल्या इहलोकीच्या व परलोकीच्या कल्याणासाठी मंत्रोक्त आशयास ग्रहण करून त्याचा जीवनात अंगीकार करावयास हवा.


-नयनकुमार आचार्य
मो. ९४२०३३०१७८
@@AUTHORINFO_V1@@