धोक्याची घंटा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |

ipl 2020_1  H x


अनुभवी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ‘आयपीएल’मध्ये सुपरओव्हर खेळताना सहा चेंडूंत सहा धावा काढण्यास असमर्थ ठरतो, यावर कुणाचा विश्वास बसणे कठीणच. मात्र, रोहित शर्मा फलंदाजी करतानाही असे घडले आणि पुन्हा सामना अनिर्णित राहिल्याने सुपरओव्हर करावी लागली. दुसर्‍या सुपरओव्हरमध्येही मुंबईच्या संघाची कामगिरी लौकिकास साजेशी होत नाही आणि प्रतिस्पर्धी संघ विजयी होतो. ही कदाचित संघासाठी धोक्याची घंटा तर नाही ना, याचा विचार करणे गरजेेचे असल्याचे मत समीक्षकांचे आहे.


‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) या जगप्रसिद्ध स्पर्धेचे विजेतेपद चार वेळा पटकाविणारा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई इंडियन्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत झालेल्या सामन्याने २०१९च्या विश्वचषकाची आठवण करून दिली. २०१९साली इंग्लड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांतील सामन्याचा निकाल लावण्यासाठी तब्बल दोन वेळा ‘सुपरओव्हर’ करण्याची वेळ ओढवली होती. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांदरम्यानही एक नव्हे, तर दोन वेळा सुपरओव्हर करण्याची वेळ ओढवल्याने तमाम क्रिकेटप्रेमींच्या विश्वचषक सामन्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताजा झाल्या. जगभरातील क्रिकेट रसिकांना रंगतदार सुपरओव्हर तर अनुभवता आली. मात्र, या सुपरओव्हरदरम्यान रंगलेल्या काही महत्त्वाच्या बाबींकडे क्रिकेट समीक्षकांनी लक्ष वेधले, त्याचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. कमी धावसंख्या असतानाही प्रतिस्पर्धी संघाला आपल्या लक्ष्यापासून दूर ठेवण्याचे कसब बाळगणारा धोनीनंतरचा एकमेव कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. मात्र, पंजाबविरुद्धच्या सामन्यात दोन्ही सुपरओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची काहीशी पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असताना ‘टी-२०’ मालिकेदरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारताने दोनवेळा न्यूझीलंडवर सुपरओव्हरमध्ये मात केली होती. सलामीवीर रोहित शर्माने अंतिम दोन चेंडूंवर सलग दोन षट्कार खेचत भारताचा विजय मिळवून दिल्याचा इतिहास आहे. अशा अनुभवी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ‘आयपीएल’मध्ये सुपरओव्हर खेळताना सहा चेंडूंत सहा धावा काढण्यास असमर्थ ठरतो, यावर कुणाचा विश्वास बसणे कठीणच. मात्र, रोहित शर्मा फलंदाजी करतानाही असे घडले आणि पुन्हा सामना अनिर्णित राहिल्याने सुपरओव्हर करावी लागली. दुसर्‍या सुपरओव्हरमध्येही मुंबईच्या संघाची कामगिरी लौकिकास साजेशी होत नाही आणि प्रतिस्पर्धी संघ विजयी होतो. ही कदाचित संघासाठी धोक्याची घंटा तर नाही ना, याचा विचार करणे गरजेेचे असल्याचे मत समीक्षकांचे आहे.


हीच ती ‘अभ्यासा’ची वेळ!


केवळ पंजाबच नव्हे, तर यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघासोबत झालेल्या सामन्यादरम्यानही मुंबई इंडियन्सच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. ‘सुपरओव्हर’मध्ये होणार्‍या सहा चेंडूंत चौकार, षट्कारांची आतशबाजी होत असते. मात्र, मुंबईचा संघ यंदाच्या हंगामात ‘सुपरओव्हर’मध्ये आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यास पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाला ‘सुपरओव्हर’मध्ये सहा चेंडूंत केवळ सहाच धावा काढता आल्या होत्या. धिप्पाड आणि ताकदवान अष्टपैलू खेळाडू कायरॉन पोलार्ड, उंच षट्कारासाठी प्रसिद्ध असणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्मा, असे खेळाडू असतानाही मुंबई इंडियन्सच्या संघाने ‘सुपरओव्हर’मध्ये अवघ्या सहा धावा काढल्या होत्या. जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात असतानाही मुंबई इंडियन्सला पराभवापासून वाचता आले नव्हते. या ‘सुपरओव्हर’मध्ये घडलेल्या चुकांचा अभ्यास करून मुंबई इंडियन्सचा संघ आगामी काळात उत्तम कामगिरी करेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र, पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाला सहा चेंडूंत सहा धावांचे आव्हान पूर्ण करता आले नाही. सहा चेंडूंमध्ये केवळ पाचच धावा काढल्याने सामना अनिर्णित राहिला आहे आणि पुन्हा एकदा निकालासाठी ‘सुपरओव्हर’ करणे भाग पडले. ‘सुपरओव्हर’मध्ये सहा चेंडूंत सहा धावा काढणे म्हणजे खेळाडूंसाठी डाव्या हातांचा खेळ. परंतु, दिग्गज आणि मातब्बर फलंदाज असतानाही मुंबईसारख्या संघाला हे शक्य न होणे म्हणजे ही लज्जास्पद बाब असून संघाने याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या हे भारतीय संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत.‘सुपरओव्हर’मध्ये या खेळाडूंची कामगिरी आपल्या लौकिकाला साजेशी न होणे, हा भारतीय संघासाठीही एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपली कामगिरी सुधारण्यासाठी अभ्यास करण्याची ‘हीच ती वेळ’ असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@