श्रीवर्धनमध्ये आढळली हिमालयातील गिधाडे; गिधाडांची उपाहारगृहे कार्यान्वित करण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2020
Total Views |
tiger_1  H x W:

कोकणातील गिधाडांची उपाहारगृहे कार्यान्वित करण्याच्या मागणीला जोर

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - हिमालय पर्वतरांगांमध्ये आढळणारी आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली ‘हिमालयीन ग्रिफाॅन’ जातीची दुर्मीळ गिधाडे श्रीवर्धन तालुक्यात आढळून आली आहेत. वन्यजीव अभ्यासकांनी रविवारी केलेल्या निरीक्षणादरम्यान एकाच ठिकाणी या जातीची सात गिधाडे त्यांना आढळली. यानिमित्ताने नष्टप्राय होणाऱ्या गिधाडांसाठी कोकणात पोषक वातावरण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बंद पडलेली गिधाडांची उपाहारगृहे (खाद्य पुरवठा केंद्र) खुली करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
 
 
 
tiger_1  H x W:
 
 
 
 
महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी 'पांढऱ्या पुठ्ठ्याची', 'लांब चोचीची' आणि 'पांढरी गिधाडे' १९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर अपुऱ्या खाद्यपुरवठय़ामुळे राज्यात आढळणारी गिधाडेसुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणारे आणि भारतातील गिधाडांच्या प्रजातीमधील सर्वात मोठी 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडे रायगड जिल्ह्यात आढळून आली आहेत. या जिल्ह्यात श्रीवर्धन आणि म्हसाळा तालुक्यातील काही भागांमध्ये पांढऱ्या पुठ्ठ्याच्या गिधाडांचा अधिवास आहे. याठिकाणी त्यांची घरटीही आहेत. मात्र, वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना रविवारी श्रीवर्धनमध्ये 'हिमालयीन ग्रिफाॅन' जातीची सात गिधाडे आढळली. याठिकाणी रस्त्याच्या शेजारी पडलेल्या गुराच्या मृत शरीराजवळ ही गिधाडे आढळ्याची माहिती कुवेसकर यांनी दै.'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
 
यापू्र्वी देखील वन्यजीव निरीक्षकांनी कोकणातून 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडांची नोंद केली आहे. मात्र, रविवारी गुराच्या मृत शरीराजवळ आढळलेल्या या दुर्मीळ गिधाडांमुळे बंद पडलेली गिधाडांची उपहारगृहे खुली करण्याची मागणी होऊ लागली आहे. दहा वर्षांपूर्वी कोकणात रोडावणाऱ्या गिधाडांची संख्या लक्षात घेता चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र' संस्थेने गिधाड संवर्धनाची मोहिम हाती घेतली होती. याअंतर्गत कोकणातील काही गावांमध्ये गिधाडांची उपाहारगृहे उभारण्यात आली. मात्र, कालांतराने वन विभागाकडून उपहारगृहांना निधी न पुरवल्याने ती बंद पडली. गेल्या काही वर्षांमध्ये कोकणात गिधाडांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी ही संख्या स्थिर करण्याच्या दृष्टीने त्यांना खाद्य पुरवणे आवश्यक असल्याचे 'सह्याद्री निसर्ग मित्र'चे संस्थापक भाऊ काटदरे यांनी सांगितले. त्यामुळे हा खाद्यपुरवठा गिधाडांच्या उपाहारगृहांच्या माध्यमातून सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. श्रीवर्धन तालुक्यात 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडांचा वावर आ़ढळून आल्याने जासवलीतील बंद पडलेले गिधाडांचे उपाहारगृह पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रय़त्न करणार असल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. ज्या गावात ही गिधाडे आढळली तेथील ग्रामस्थांना एखाद्या गुराचा मृत्यू झाल्यास त्यासंबंधी माहिती देण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
गिधाडांची उपाहारगृहे का बंद पडली ?
 
वन विभागाने दापोली तालुक्यातील सुकोंडी, मंडणगड तालुक्यातील कळकवणे, म्हसाळा तालुक्यातील चिरगाव आणि श्रीवर्धन तालुक्यातील जासवली या ठिकाणी गिधाडांची उपाहारगृहे बांधली आहेत. यामधील केवळ म्हसाळा तालुक्यातील उपाहारगृह कार्यान्वित असून इतर उपाहारगृहे बंद आहेत. उपाहारगृह बांधलेल्या जागेचे भाडे, त्यात मृत जनावरे टाकण्याकरिता दिला जाणारा दोन-तीन हजार रुपयांचा मोबदला आणि जनावराच्या वाहतुकीसाठी येणारा साधारण एक हजार रुपयांचा खर्च वन विभागाकडून येणाऱ्या निधीच्या माध्यमातून पुरविण्यात येत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा निधी पुरवला जात नसल्याने ही उपाहारगृहे बंद आहेत.
 
 
हिमालयीन ग्रिफाॅन गिधाडाविषयी...
* मध्य आशियामधील पामीर पर्वतरांग, काझाखस्तान, तिबेटी पठार आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये या प्रजातीच्या गिधाडांचे वास्तव्य.
* भारतात आढळणाऱ्या गिधाडांमध्ये सर्वात मोठा गिधाड
* वजन साधारणतः ८ ते १२ किलो पर्यंत असून त्यांच्या पंखांचा व्यास ९ ते १० फूट इतका असतो.
 
 

tiger_1  H x W: 
@@AUTHORINFO_V1@@