महाराष्ट्रात 'गवती वटवट्या'चे दुर्मीळ दर्शन !

    27-Jan-2020   
Total Views | 279

tiger_1  H x W:


तापी नदीच्या खोऱ्यातील गवताळ प्रदेशात वास्तव्य - वटवट्याचे दुर्मीळ दर्शन 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतातील उत्तर आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या 'गवती वटवट्या' (Striated Grassbird) पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन महाराष्ट्रात घडले आहे. गेल्या आठवड्यात भुसावळच्या पक्षीनिरीक्षकांनी तापी नदीच्या खोऱ्यातून या पक्ष्याची नोंद केली आहे. पक्षीतज्ज्ञांच्या मते, 'गवती वटवट्या' पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच छायाचित्रित नोंद असल्याने या पक्ष्याच्या अधिवासाबाबत शास्त्रीय निरीक्षण नोंदविण्याची आवश्यकता आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 
महाराष्ट्रातील पक्षीनिरीक्षणाची चळवळ जोर धरु लागली आहे. त्यामुळे काही पक्ष्यांच्या दुर्मीळ नोंदी समोर येऊ लागल्या आहेत. भुसावळ मधून अशाच एका पक्ष्याची दुर्मीळ नोंद पक्षीनिरीक्षक लक्ष्मीकांत नेवे यांनी नोंदवली आहे. सामान्यत: भारतातील इशान्य आणि उत्तरेकडील राज्यामध्ये अधिवास करणारा 'गवती वटवट्या' हा पक्षी त्यांना भुसावळमध्ये आढळून आला आहे. या पक्ष्याचा अधिवास प्रामुख्याने पाणथळीशेजारील गवताळ प्रदेशात असतो. विणीच्या हंगामात हे पक्षी केवळ गवताबाहेर येऊन एकमेकांना आवाज देतात. गेल्या अडीच वर्षांपासून आॅक्टोबर ते मार्च महिन्यांदरम्यान तापी नदीच्या खोऱ्यालगतच्या साधारण तीन किलोमीटरच्या पट्टयातील गवताळ प्रदेशात गवती वटवट्याचे दुर्मीळ दर्शन घडत असल्याची माहिती लक्ष्मीकांत नेवे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली.
 
 
 
 

गेल्या आठवड्यात २५ जानेवारी रोजी नेवे या भागात पक्षीनिरीक्षणाकरिता गेले असता, त्यांना या पक्ष्याचे पुन्हा दर्शन घडले. आजबाजूचे पाणी व दाट पाणवनस्पतींमध्ये त्यांना 'गवती वटवट्या' लपलेला दिसला. प्रत्येकी वीस ते पंचवीस मिनिटांनी गवताच्या शेड्यावर बसून तो केवळ काही सेंकदासाठी आवाज देऊन पुन्हा गवतात जाऊन लपत होता. त्यामुळे चार तास या पक्ष्याचे निरीक्षण करुन त्याचे छायाचित्र व आवाजाचे नमुने मिळविल्याचे नेवे यांनी सांगितले. साधारण पंधरा वर्षांपूर्वी राज्यातील काही भागात हा पक्षी आढळून आल्याच्या चार ते पाच नोंदी आहेत. मात्र, त्याला छायाचित्रांचा ठोस पुरावा नाही. त्यामुळे नेवेंना मिळालेले 'गवती वटवट्या'चे छायाचित्र हा महाराष्ट्रातील या पक्ष्याचा पहिलाच छायाचित्र पुरावा असल्याची माहिती प्रसिद्ध पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासक आदेश शिवकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. राज्यातील गवती वटवट्याचे दुर्मीळ दर्शन असल्याने भुसावळच्या स्थानिक पक्षीनिरीक्षकांनी त्याच्या हालचालींचे निरीक्षण करुन नोंद करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गवताळ प्रदेश नष्ट होत असल्याने अधिवासाच्या शोधात हा पक्षी याठिकाणी आल्याची शक्यता शिवकरांनी वर्तवली.

 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121