लेफ्ट. जन. हरबक्षसिंग आणि मेजर मेघसिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


dilbakshsing_1  


जनरल हरबक्षसिंगांनी खरोखरच स्वतःच्या हाताने मांडीत गोळी घुसलेल्या मेजर मेघच्या खांद्यावर पदोन्नतीचा तारा लावला. पुढे १९६६ मध्ये ‘मेघदूत फोर्स’ला नववी ‘पॅराशूट कमांडो बटालियन’ असं अधिकृत नाव देण्यात आलं.


परवा १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाली
. १२ जानेवारी, १८६३ हा स्वामीजींचा जन्मदिवस. हे झालं इंग्रजी कालगणनेनुसार. पण हिंदू कालगणनेनुसार त्या दिवशी मकरसंक्रमण होतं. संपूर्ण हिंदू समाजात नवं संक्रमण घडवणारा बालक नरेंद्र दत्त मकरसंक्रमणाच्या दिवशीच पृथ्वीवर अवतीर्ण झाला. म्हणजे १५० वर्षांपूर्वी संक्रांत १२ जानेवारीला येत असे. आता ती पुढे सरकत-सरकत हल्ली १५ जानेवारीला येते.


१५ जानेवारीला स्वतंत्र भारताच्या इतिहासात आणखी एक महत्त्व आहे
. संपूर्ण आणि समग्र अशा आधुनिक सार्वभौम भारत देशाच्या सरसेनापती पदाची सूत्र १५ जानेवारी, १९४९ या दिवशी एका भारतीय सेनापतीने स्वीकारली. मावळते ब्रिटिश सरसेनापती जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून जनरल कोंदडेरा मदाप्पा करिअप्पा यांनी सरसेनापतीपद स्वीकारलं. त्यानिमित्त त्याच वेळेपासून१५ जानेवारी हा दिवस ‘भूदल दिवस’ (आर्मी डे) म्हणून साजरा करण्याची पद्धत सुरू करण्यात आली. म्हणजे यंदा देशाने ७१ वा ‘भूदल दिवस’ साजरा केला. देशभरच्या सर्व लष्करी ठाण्यांमध्ये, छावण्यांमध्ये हा दिवस अतिशय सन्मानाने, गांर्भीर्याने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय सैन्य हे जगभराच्या सर्वोत्कृष्ट सेनादलांपैकी एक आहे (वन ऑफ दि फर्स्ट क्लास आर्मीज्) याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारे नानविध कार्यक्रम केले जातात. मात्र, आपली प्रसारमाध्यमं या सगळ्यापासून कोसो दूर असतात. शहरी नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍या नट्या, मोठा पप्पू, छोटा पप्पू, एका काकाचे दोन पुतणे, स्वयंघोषित चाणक्य असल्याच बातम्यांमध्ये त्यांना स्वारस्य असतं. या देशातला मुख्य समाज जो हिंदू समाज, त्याला अभिमान वाटेल, त्याचे बाहू स्फुरण पावू लागतील, त्याची मनगटं शिवशिवू लागतील, आत्मगौरवाच्या उदात्त भावनेने त्यांचं अंत:करण उचंबळून येईल, असं काहीही छापायचं किंवा दाखवायचं नाही, असा प्रसारमाध्यमांचा अलिखित संकेत आहे.



पण लष्कराशी जोडलेले असेही लेखक
, संशोधक, अभ्यासक आहेतच की, जे १५ जानेवारीच्या प्रयोजनावर आपलं नवं संशोधन आवर्जून प्रसिद्ध करीत असतात. देशासाठी रक्त सांडलेल्या नि शत्रूच्या ठाण्यांवर विजयी तिरंगा फडकवलेल्या ज्ञात-अज्ञात वीरांचं पुनर्स्मरण करीत असतात. अशीच ही सत्यकथा-वीरगाथा लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग आणि मेजर मेघसिंग राठोड यांची. जगभरच्या सर्व समाजांमध्ये एक गंमतीदार गोष्ट पुन्हा पुन्हा आढळून आली आहे. ती अशी की, एरवी बेकायदा वागणारे, वरिष्ठांच्या आज्ञा न जुमानणारे, मन मानेल तसे वागणारे लोक, काही वेळा असे वागतात की, अवघं जग थक्क होऊन जातं. उदा. ड्रेक हा एक इंग्लिश दर्यावर्दी लुटारू म्हणजे समुद्री चाचा होता. त्याच्या लुटालुटीने अवघी इंग्लिश किनारपट्टी हैराण होऊन गेली होती. सरकारी नौदलाने त्याच्यापुढे हात टेकले होते. अशा स्थितीत इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली, हिने एक मोठा धाडसी निर्णय घेतला. तिने ड्रेकला अभय देऊन दरबारात बोलावलं आणि त्यालाच इंग्लिश आरमाराचा प्रमुख नेमलं. कालपर्यंत क्रमांक एकचा ‘वॉन्टेड’ असलेला लुटारू चाचा ड्रेक एकदम अ‍ॅडमिरल सर फ्रान्सिस ड्रेक बनला. आणि या ड्रेकच्या नेतृत्वाखाली इंग्लिश आरमाराने आपल्यापेक्षा अनेकपट मोठ्या स्पॅनिश आरमाराचा धुव्वा उठवला. सन १५८८ सालची ही लढाई ‘आर्माडा वॉर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या लढाईने समुद्रावरील वर्चस्वाची युरोपीय राष्ट्रांमधील स्पर्धा संपली आणि ब्रिटन ही एकमेव शक्ती निर्विवाद ‘समुद्रस्वामिनी’ म्हणून उदयाला आली.



मेजर मेघसिंग राठोड याची अशीच काहीशी स्थिती होती
. मूळचा राजस्थानी राजपूत असलेल्या मेघसिंगने पंजाबातल्या पतियाळा संस्थानच्या लष्करात नोकरी धरली. स्वातंत्र्यानंतर पतियाळा संस्थान भारतात विलीन झाले. संस्थानी सैन्यही भारतीय सैन्यात सामावून घेण्यात आलं. मेघसिंग राठोडला ‘ब्रिगेड ऑफ गार्ड्स’ या पथकात घेण्यात आले. उंचापुरा, हट्टाकट्टा मेघसिंग जरा वेगळाच होता. आपल्या पथकाच्या कार्यक्षमतेच्या सुधारणेबाबत त्याच्या काही वेगळ्या कल्पना होत्या. युद्ध चकमकींच्या सरावाच्या वेळी तो त्या प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करायचा. यातून त्याचे वरिष्ठांशी खटके उडायचे. मग त्याच्या व्यक्तिगत फाईलवर प्रतिकूल शेरे पडायचे. यामुळे त्याची पदोन्नती थांबली. त्याच्या बरोबरीचे मेजर बढती मिळून लेफ्टनंट कर्नल झाले. आणि १९६५ साल उजाडलं. एप्रिलपासून पाकिस्तानने प्रथम कच्छच्या रणात नि मग काश्मिरात, पंजाबात वाढता खोडसाळपणा सुरू केला. या वेळी भारतीय सैन्याच्या पश्चिम विभागाचे (वेस्टर्न कमांड) सेनापती होते, लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग. लडाखपासून राजस्थानपर्यंतचा प्रदेश त्यांच्या अखत्यारित येत होता. जनरल हरबक्ष यांची लष्करी कारकिर्द नेत्रदीपक होती. दुसर्‍या महायुद्धात ते अत्यंत कजाखी अशा जपानी सैन्याशी सिंगापूर आघाडीवर लढले होते. काही काळ ते जपान्यांचे युद्धकैदीही बनले होते. १९४७च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केलं. त्यावेळी पहिली भारतीय सैन्य तुकडी श्रीनगरच्या विमानतळावर उतरली, ती हरबक्षसिंगांची ‘१ शीख बटालियन’ हीच. मात्र, प्रत्यक्ष रणभूमीवर तिचं नेतृत्व करत होते लेफ्टनंट कर्नल दीवाण रणजित रणजित राय. कारण यावेळी हरबक्ष कर्नल होते आणि सैनिकी परंपरेनुसार प्रत्यक्ष रणांगणात नेतृत्व लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकार्‍याने करायचं असतं.




परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती
. पाकिस्तानी भलतेच जोरात होते. एका निकराच्या लढाईत ले. क. रणजित राय ठार झाले. आता? सैनिकी नियम बाजूला ठेवून कर्नल हरबक्ष पुढे सरसावले. त्यांनी आपल्या खांद्यावरचा कर्नल अधिकारपद दाखवणारा तारा चक्क उतरवून ठेवला आणि लेफ्टनंट कर्नल म्हणून ते बटालियनचं नेतृत्व करू लागले. रणांगणावर झटपट निर्णय घेण्याची क्षमता गरजेची असते. ती हरबक्षसिंगांनी पुरेपूर दाखवून दिली. ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने ‘नेफा उर्फ नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एरिया’ किंवा आताच्या अरुणाचल प्रदेशवर आकस्मिक आक्रमण केलं. तिथले भारताचे सेनापती आणि तेजपूरस्थित ‘चौथा कोअर’ या सैन्यदलाचे प्रमुख लेफ्ट. जन. ब्रिजमोहन कौल हे पहिलं विमान पकडून दिल्लीला पळून गेले. ते पंडित नेहरुंचे नातेवाईक होते. भारतीय सैन्याची अक्षरश: दाणादाण उडाली. चिनी सैन्य तेजपूरच का, मनात आणेल तर थेट कोलकात्यापर्यंतसुद्धा येऊ शकेल, अशी स्थिती निर्माण झाली. अशा स्थितीत लेफ्ट.जन. हरबक्षसिंगांना तातडीने तेजपूरला पाठवण्यात आलं. त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या ‘चौथ्या कोअर’ ची तडाखेबंद पुनर्बांधणी नि पुनर्मांडणी केली.



आता १९६५ च्या १ सप्टेंबरला पाकिस्तानने पुन्हा काश्मीरवर हल्ला चढवला
, त्याचं लक्ष्य होतं अखनूर. उर्वरित भारतीय प्रदेशातून काश्मीर प्रांतात जाणारा एकमेव रस्ता अखनुरातून जात होता. अखनूर कब्जात आणायचं नि उर्वरित भारताचा काश्मीरशी संपर्कच तोडायचा, असा त्याचा बेत होता. हरबक्षसिंग कुशलतेने परिस्थिती हाताळत होते आणि त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला मेजर मेघसिंग राठोड. ‘ब्रिगेड ऑफ गार्ड्स’ पथकातला, हुकूम न पाळणारा, पदोन्नती नाकारण्यात आलेला मेजर मेघसिंग. हरबक्ष थोडे चकित होऊन त्याच्याकडे बघत राहिले. “सर, माझी एक कल्पना आहे. या समोरासमोरच्या लढाईत पाक आपल्याला भारी आहे. मग आपण त्यांच्या पिछाडीला उतरायचं. दुसर्‍या महायुद्धात चर्चिलने ‘स्पेशल ऑपरेशन फोर्स’ उभारून गनिमी काव्याने जर्मनांना हैराण केलं होतं. तसंच आपण करायचं,‘’ अशी प्रस्तावना करीत मेजर मेघने आपली योजना हरबक्षांसमोर मांडली. हरबक्ष खूश झाले. आता खरं म्हणजे ही योजना सरसेनापती जनरल जयंतनाथ चौधरी यांना कळवायची, त्यांची परवानगी मिळाली की पुढे जायचं.



पण
, हरबक्षांनी नियमबियम बाजूला ठेवून त्वरित निर्णय घेतला. हाताशी असलेल्या सैनिकांमधून मेजर मेघने त्याला हवे तसे जवान निवडले. एका परीने बेकायदेशीर असलेल्या या तुकडीचे नाव ठेवण्यात आले ‘मेघदूत फोर्स.’ ही तुकडी पहिला छापा मारायला निघाली तेव्हा हरबक्ष मेजर मेघला म्हणाले, “यशस्वी होऊन आलास ना तर मी स्वतः माझ्या हाताने लेफ्टनंट कर्नल पदाचा तारा तुझ्या खांद्यावर लावेन.” मेजर मेघच्या कमांडो तुकडीचा पहिला हल्ला कमालीचा यशस्वी झाला. आता खरं म्हणजे थांबायला हरकत नव्हती. पण, मेजर मेघने मूळ योजना बदलून त्वरित निर्णय घेतला. आणखी पुढे जायचं आणि हा बहाद्दर माणूस नि त्याचं पथक आणखी दोन यशस्वी हल्ले करूनच मुख्य छावणीत परतले. जनरल हरबक्षसिंगांनी खरोखरच स्वतःच्या हाताने मांडीत गोळी घुसलेल्या मेजर मेघच्या खांद्यावर पदोन्नतीचा तारा लावला. पुढे १९६६ मध्ये ‘मेघदूत फोर्स’ला नववी ‘पॅराशूट कमांडो बटालियन’ असं अधिकृत नाव देण्यात आलं. हीच भारताची पहिली कमांडो तुकडी नि तिचा प्रमुख होता लेफ्टनंट कर्नल मेघसिंग राठोड.

@@AUTHORINFO_V1@@