आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणींना? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...
29-May-2025
Total Views | 22
परभणी : आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. गुरुवार, २९ मे रोजी त्यांनी परभणी येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लाडकी बहिण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला हा आरोप खोटा आणि अतिशय चुकीचा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात. नियमानुसार, आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासिंकरिता आणि अनुसूचित जातींच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातींकरिता निधी राखीव ठेवावा लागतो. यावेळी त्यातील जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी राखीव ठेवला पाहिजे आणि काही विशिष्ट पायाभूत सुविधांकरिता ठेवला पाहिजे."
"लाडकी बहिण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींकरिता निधी दिल्यास अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल. त्याप्रमाणे तो दाखवला. अजितदादांनी सभागृहातच यासंदर्भातील खुलासा केला. त्याच पैशात हा निधी दाखवला असे नाही तर जवळजवळ पावणे दोन पटीने या विभागांचे बजेट वाढवले असून तिथे तो दाखवला आहे. त्यामुळे ही अकाऊंटींगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवला नाही आणि कुठलाही पैसा वळवला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावे. मी त्यांना अर्थसंकल्पात अकाऊंटिंगची सिस्टिम काय आहे हे समजावून सांगेल. नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद योग्य प्रमाणे दाखवली आहे. त्यात कुठलीही बनवाबनवी किंवा फसवाफसवी नाही. अजितदादांनी योग्य काम केले आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कार्यकर्ते काँग्रेसच्या अवस्थेची कारणं सागतात!
काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा अनुभव सांगतात. आज काँग्रेसची जी परिस्थिती झाली त्याला काहीतरी कारणे असतील. ती कारणे आता हळूहळू काँग्रेसचे जुने कार्यकर्ते सांगू लागले आहेत," असे ते म्हणाले.