प्रथमच महाराष्ट्रातील या स्थळाला मिळणार 'रामसर'चा दर्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019   
Total Views |



नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याला महिन्याभरात 'रामसर स्थळा'चा दर्जा मिळण्याची शक्यता

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - नाशिकमधील नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याला 'रामसर स्थळा'चा दर्जा प्राप्त होणार आहे. पाणथळ जागांच्या जैवविविधतेच्या अनुषंगाने एखाद्या पाणथळीला 'रामसर' दर्जा प्राप्त होणे जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण मानले जाते. महाराष्ट्रात प्रथमच हा दर्जा 'नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्या'ला मिळणार आहे. 'केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालया'ने यासंबंधीचा अंतिम प्रस्ताव 'रामसर सचिवालया'कडे पाठविला असून येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

 

 
 ( छायाचित्र - प्रविण दौंड ) 
  

नाशिकच्या निफाड तालुक्यामधील गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर वसलेले नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य विविध पक्ष्यांच्या अधिवासामुळे समृद्ध आहे. १९०७ ते १९१३ च्या दरम्यान या संगमावर मोठा बंधारा बांधण्यात आला. गेल्या शतकभरात त्यामध्ये गाळ साचून पाणवनस्पतींची वाढ झाली. त्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांकरिता उत्कृष्ट अधिवास निर्माण झाला. हे स्थळ आता हजारो पक्ष्यांचे आश्रयस्थान बनले आहे. या परिसराची जैवविविधता लक्षात घेऊन १९८६ साली नांदूरमध्यमेश्वरला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. १,१९८ हेक्टरवर पसरलेल्या या पाणथळीवर २६५ प्रजातींचे पक्षी आढळतात. यामधील १४८ प्रजातींचे पक्षी स्थलांतरित आहेत. पक्ष्यांशिवाय ८ जातीचे सस्तन प्राणी, गोड्या पाण्यातील २४ प्रजातीचे मासे, ४१ जातीची फुलपाखरे आणि ५३६ प्रकारची झाडे या ठिकाणी आढळून येतात.

 
 
 

नांदूरमध्यमेश्वरच्या वैविध्यपूर्ण जैवविविधतेचे महत्व जाणून 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) व 'बर्डलाईफ इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय संस्थांनी या ठिकाणाला 'महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र' (इम्पोर्टन्ट बर्ड एरिया) म्हणून घोषित केले आहे. 'सेन्ट्रल एशियन फ्लाय-वे' या पक्षीस्थलांतराच्या महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये नांदूरमध्यमेश्वरचा समावेश होतो. 'बीएनएचएस'ने २००८ मध्ये प्रकाशित केलेल्या पोटेंशिअल एक्झिस्टिंग रामसर साइट्स इन इंडिया या ग्रंथात नांदूरमध्यमेश्वरचे नाव नमूद केले आहे. त्यामुळे २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात या अभयारण्याला 'रामसर स्थळ' म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा प्रस्ताव 'रामसर'चा दर्जा प्राप्त होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या निकषांच्या कात्रीत अडकला होता. मात्र, आता 'केंद्रीय वन मंत्रालया'ने यासंबंधीचा अंतिम प्रस्ताव 'रामसर सचिवालया'कडे पाठवल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाबाबत काही त्रुटी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. या त्रुटी नकाशासंबंधी होत्या. त्यांची पूर्तता करून आम्ही प्रस्ताव पुन्हा पाठविल्याचे त्यांनी सांगितले. येत्या महिन्याभरात हा प्रस्ताव 'रामसर सचिवालया'कडून मान्य होणार असल्याची माहिती 'केंद्रीय वन मंत्रालया'तील अधिकाऱ्यांनी दिल्याचे अंजनकर म्हणाले. भारतात २७ पाणथळ प्रदेशांना 'रामसर स्थळा'चा दर्जा मिळाला आहे.

 

 
 

'नांदूरमध्यमेश्वर'ला रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यास हे महाराष्ट्रातील पहिलेच 'रामसर स्थळ' ठरेल. ज्यामुळे या ठिकाणाच्या संवर्धनाला बळकटी प्राप्त होईल. जागतिक मान्यता मिळाल्याने त्याच्या संवर्धनाकरिता विशेष प्रयत्न करण्यात येतील. ज्यामुळे तेथील जैवविविधता सुरक्षित राहिल. - सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम)

 

'रामसर' म्हणजे काय ?

इराणमधील 'रामसर' शहरात १९७१ साली भरलेल्या कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स या जागतिक परिषदेला रामसर परिषद मानले जाते. याच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चेव्दारा महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रत्येक देशाने राष्ट्रीय स्तरावर करावयाच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला. हा कृती आराखडा नंतर १९७५ मध्ये झालेल्या दुसऱ्या परिषदेत संमत करण्यात आला. या कृती आराखड्यात मान्य केल्याप्रमाणे प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना रामसर स्थळ म्हणून घोषित करावे असे ठरले. अशा स्थळांचे त्या देशाने योग्य प्रकारे संवर्धन करावे. तसेच तेथील जैवविविधतेचा पर्यावरणपूरक वापर करावा असे स्वीकारण्यात आले. या आराखडय़ात पाणथळ जागेची व्याख्यासुद्धा करण्यात आली. पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाडय़ा, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा समावेश केला. समुद्री पाणथळीच्या जागांसाठी (खाऱ्या पाण्याची सरोवरे, समुद्रकिनाऱ्यावरील भरती-ओहोटीच्या जागा इ.) ओहोटीच्या वेळेस एकूण खोली सहा मीटरपेक्षा अधिक नसावी, हा नियम करण्यात आला. भारताने १९८२ मध्ये 'रामसर' करारावर सही केली.

 

रामसर मान्यतेचे निकष

'रामसर' परिषदेत रामसर स्थळ घोषित करण्यासाठी एकूण नऊ जागतिक निकष मंजूर करण्यात आले आहेत. पहिला निकष नैसर्गिक किंवा अर्ध-नैसर्गिक दुर्मीळ प्रकारातील पाणथळ जागा असावी. उदाहरणार्थ, बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणारचे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले असून त्यात खारे पाणी आढळते. जगात अशी सरोवरे फार कमी आहेत. दुसरा निकष हा त्या ठिकाणी आढळणाऱ्या संकटग्रस्त वन्यजीवांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी असलेले महत्व अधोरेखित करतो. तिसरा निकष त्या विशिष्ट जैवभौगोलिक प्रदेशातील वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करतो. चौथा निकष वनस्पती व वन्यजीवांच्या जीवनचक्रातील त्या पाणथळीचे महत्त्व (जसे स्थलांतरादरम्यान) विचारात घेतो. पाचवा व सहावा निकष पक्ष्यांसंबंधी असून यामध्ये २० हजार पाणपक्ष्यांचा आढळ वा एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का पक्ष्यांचा आढळ असणे जरुरी मानले गेले आहे. सातवा व आठवा निकष स्थानिक मत्स्यप्रजातींचा आढळ व त्या पाणथळीचे महत्त्व यावर आधारित आहे. शेवटच्या नवव्या निकषात पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का सदस्यांचा आढळ असणे जरुरीचे मानले गेले आहे.

 

राज्यातील संभाव्य 'रामसर' जागा

जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. औरंगाबाद), वेंगुर्ला रॉक्स (बन्र्ट आयलंड), माहूल शिवडीची खाडी (मुंबई), नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (जि. नाशिक), ठाण्याची खाडी (ठाणे-मुंबई), उजनीचे धरण (भिगवण) (जि. पुणे-सोलापूर), हतनूर धरण (जि. जळगाव), नवेगावबांध (जि. गोंदिया) आणि लोणार सरोवर (जि. बुलडाणा) या स्थळांचा संभाव्य 'रामसर' स्थळांच्या यादीत समावेश होतो. मात्र, लोणार सरोवराचा प्रस्ताव निकषांची पूर्तता होत नसल्याने फेटाळण्यात आला आहे.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@