मलेशियाचा खल'नाईक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019   
Total Views |



इस्लामचा प्रचार आणि इतर धर्मांचा विखार हीच झाकीरची जुबान. मग काय, भारतात गळ्यातील फास आवळण्यापूर्वीच २०१६ साली झाकीरने मलेशियाला पलायन केले. मलेशियाच का म्हणाल, तर साहजिकच हा मुस्लीमबहुल देश असल्यामुळे झाकीर भाईजानना या देशाने कबूल केले. झाकीरची फिकीर केली.


बरेचदा एखाद्या मित्राबरोबर टोकाचे भांडण होऊन त्याच्याशी संबंधच तोडून टाकण्याची वेळ येते. मित्रमंडळींमध्येही याची खमंग चर्चा होते. मैत्री नेमकी का तुटली, याची कारणंही सगळ्यांना माहिती असतात. तरी मित्रांपैकीच कोणाला तरी त्या भांडकुदळ मित्राची दया येते आणि त्यांचे मित्रत्व अधिकच बहरते. चार दिवस चांगले जातातही. मग त्या नवीन मित्रालाही या भांडकुदळ मित्राचा स्वभाव हळूहळू लक्षात येतो आणि मग त्यालाही पश्चाताप होतो की, "होय, इतरांचे या माणसाविषयी फारसे चांगले मत नसूनही मी का उगाच या माणसाला जवळ केले?" ते म्हणतात ना, 'देर आए दुरुस्त आए.' सध्या अशीच अवस्था झाली आहे, मलेशियाची. इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक आता मलेशियाच्या गळ्यातलं हाडूक ठरतोय. शांततापूर्ण मार्गाने तो देशात राहतही नाही आणि त्याला सहजासहजी हाकलवायचीही सोय नाही. झाकीर नाईकच्या कट्टर, कडव्या इस्लामिक विचारांनी कित्येक मुस्लीम तरुणांची भारतात माथी भडकावली. नाईकची ही धर्मांध विषवल्ली त्याच्या तथाकथित प्रवचनांच्या माध्यमांतून लाखो मुस्लीम तरुणांच्या मनात जिहादचीच पेरणी करत होती. त्यातही झाकीर हा इतर मुल्ला-मौलवींसारखा अरबी ऊर्दूची हिदायत देणारा कोणी साधारण धर्मगुरू नव्हे, तर चक्क सुटाबुटात अस्खलित इंग्रजीमध्ये नाईक आपली टोकाची मतं मांडायचा. त्यामुळे कित्येक सुशिक्षित मुस्लीम तरुणही झाकीरच्या वाणीला सर्वस्वी भुलले. जिहादच्या मार्गावर बहकत केले. इस्लामचा प्रचार आणि इतर धर्मांचा विखार हीच झाकीरची जुबान. मग काय, भारतात गळ्यातील फास आवळण्यापूर्वीच २०१६ साली झाकीरने मलेशियाला पलायन केले. मलेशियाच का म्हणाल, तर साहजिकच हा मुस्लीमबहुल देश असल्यामुळे झाकीर भाईजानना या देशाने कबूल केले. झाकीरची फिकीर केली. त्याला आसरा दिला. पण, आता हाच इस्लामिक फकीर मलेशियाची शांतता भंग करायच्या तयारीत दिसल्यावर, त्याची तब्बल १० तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

 

त्याचं झालं असं की, झाकीर नाईक आपल्या एका भाषणात म्हणाला, "भारतातील अल्पसंख्याक मुसलमानांपेक्षा मलेशियातील हिंदूंना शंभरपट जास्त अधिकार आहेत." एवढ्यावरच न थांबता, नाईकने अकलेचे तारे तोडत चिनी-मलय वंशांच्या नागरिकांना मलेशियातून बाहेर हाकलले पाहिजे, असेही वंशद्वेषी विधान केले. त्यानंतर सामान्य नागरिकांबरोबरच, राजकीय स्तरावरही मलेशियाचे स्थायी नागरिकत्व दिलेल्या झाकीर नाईकच्या देशातून हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली. इतकेच नाही तर मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनीही झाकीर नाईकला चांगलीच तंबी दिली. "धर्माचा प्रचार-प्रसार करायची झाकीरला मुभा असली तरी राजकारणात मात्र त्याने सहभागी होऊ नये," असे खडे बोल मलेशियाच्या पंतप्रधानांनी सुनावले. झाकीरच्या अशा वक्तव्यांमुळे मलेशियातील अंतर्गत शांतता, बंधुभावाला दावणीला बांधले जात असल्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. मलेशियामध्ये जरी ६० टक्के मुस्लीमधर्मीय वास्तव्यास असले तरी उर्वरित ४० टक्क्यांमध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इतर स्थानिक मलयवंशीयांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. झाकीरसारख्या कडव्या इस्लाम प्रवर्तकाच्या भेदभावपूर्ण वक्तव्यांमुळे मलेशिया कुठल्याही परिस्थितीत आपल्या देशातील अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ देणार नाही, हे अगदी स्वाभाविक. तसेच, आजघडीला झाकीरला जवळ करून भारताशी वितुष्ट घेणेही मलेशियाला कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नाही. मलेशिया सेक्युलर देश असला तरी तेथील कायद्यांवर इस्लामचाच पगडा आहे. शिवाय, भारतीय आणि चिनी वंशाचे मलेशियन नागरिकही सरकारच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक धोरणांवर खुश नाहीत. त्यामुळे मलेशियात सगळे आलबेल आहे, सर्व जाती-धर्म-वंशाचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात, असा समज चुकीचाच. म्हणून झाकीरसारख्या धर्ममार्तंडांनी मलेशियामध्ये या ना त्या प्रकारे वांशिक विवादाला तोंड फोडणे या देशाच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी घातकच म्हणावे लागेल. हा तोच झाकीर नाईक होता, जो भारतात राहून, इथले खाऊन समाजात धार्मिक तेढ निर्माण करत होता. आज तोच प्रयत्न त्याने मुस्लीमबहुल मलेशियामध्येही करून पाहिला आणि परिणाम त्याच्यासमोर आहेत. सध्या त्याने वेळ मारून नेण्यासाठी या प्रकरणी माफी मागितली असली तरी यापुढे त्याच्याकडून अशी वंशभेदी विधाने मलेशियाकडूनही कितपत खपवून घेतली जातील, याबाबत शंका आहेच.

@@AUTHORINFO_V1@@