मदत की वसुली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019   
Total Views |




भारतात नैसर्गिक आपत्ती आली की, 'सारे भारतीय माझे बांधव आहेत,' हा भाव अनेकांच्या मनात जागृत होत असतो. 'मानवता' नावाचा धर्म यावेळी समाजात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. तसेच, जागतिक स्तरावरदेखील कोणत्याही देशातील नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची घटना घडली असता देखील आपली 'वसुधैव कुटुंबकम्' ही धारणा आपण जागृत करत असतो. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस किंवा समाजसमूहास मदतीचा हात देऊ करणे, हे माणूस म्हणून आपले कर्तव्यच आहे आणि ते आपण निभावले पाहिजेच, यात शंका नाही. मात्र, आपण मदत करताना वसुली तर करत नाही ना याचे भान बाळगणे आवश्यक आहे. मदत ही स्वयंप्रेरणेतून हवी, बळजबरीने नव्हे. मात्र, नेमके हेच भान नाशिकमधील ओझर येथील एक महाविद्यालय विसरल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी येथील एका महाविद्यालयाने 'राष्ट्रीय सेवा योजना' अंतर्गत मदत फेरी काढली होती. काही वेळ गावामधून या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांनी मदतदेखील गोळा केली. मात्र, अचानक यातील काही विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी आपला मोर्चा नजीकच्या मुंबई-आग्रा महामार्गाकडे वळविला आणि तेथून मार्गक्रमण करणार्‍या वाहनधारकांकडून मदतनिधीसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. ही मदत मागण्याची पद्धत आहे की वसुलीचा नवीन फंडा, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. वास्तविक न मागता जिल्ह्याभरातून पश्चिम महारष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. त्यामुळे समाजातील काही घटक पूरग्रस्तांच्या नावाखाली आपली पोळी तर भाजून घेत नाही ना, असा संशय सध्या बळावला आहे. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि उच्चविद्याविभूषित प्राध्यापक यांच्यामार्फत असे वर्तन होणार असेल, तर भारताची भावी पिढी नेमकी कोणत्या विचारसरणीची आणि कोणत्या विचारधारेचे अनुकरण करणारी असेल, याबाबत सुजाण नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. यावर, उपाय म्हणून मदतीचे संकलन करण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आगामी काळात तरी असे चित्र जिल्ह्यात दिसणार नाही, हीच अपेक्षा.

 

लहानग्यांचे मोठेपण

 
 

लहानपण म्हणजे निरागसता, अल्लडपणा आणि मजा-मस्ती यांचे वय. मात्र, याच वयात सामाजिक भान आणि जाणीव जागृत ठेवून समाजातील बाधितांचे अश्रू पुसण्यासाठी खारीचा वाटा लहानग्यांनी उचलला तर, तो निश्चितच समाजाच्या कौतुकास पात्र ठरत असतो. याचीच प्रचिती सध्या नाशिक शहरात येत आहे. सांगली-सातारा आणि कोल्हापुरात पुराने थैमान घातल्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नाशिकच्या सिडको येथील वैभव देवरे दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी वर्षभर जमवलेले खाऊचे पैसे पूरग्रस्तांसाठी दिल्याने त्यांच्या लहान वयातील या मोठेपणाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. चेतना नगर येथील वैभव व सोनल देवरे यांची ११ वर्षीय मुलगी तेजस्वी व ६ वर्षीय मुलगा शाहू यांनी त्यांचे खाऊचे पैसे पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांचा खाऊच्या पैशांचा डबा घेऊन आईवडील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या कार्यालयात दाखल झाले. दोन्ही मुलांनी आम्ही आपले खाऊचे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देत असल्याचे यावेळी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दोघांना जवळ घेत एवढ्या लहान वयात त्यांच्या सेवाभावी वृत्तीबाबत आनंद व्यक्त केला.यावेळी ही मुलं म्हणाली की,"आम्ही टीव्हीवर आमच्याच सारखी पावसात भिजणारी मुले पाहिली. ते पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. पूर ओसरल्यावर ते शाळेत जाणार, अभ्यास कसा करणार, त्यांना तर आता दप्तर, पुस्तक, वह्या सर्व नवीनच घ्यावे लागेल. आता ते रक्षाबंधन कसे साजरे करणार?" असे प्रश्न या मुलांना सतावत होते. "आमच्या पुरात नुकसान झालेल्या त्या मित्रांना आम्ही आमचे खाऊचे पैसे देऊ शकतो का? असा प्रश्न आम्ही आईवडिलांना विचारला. त्यावेळी आमच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला. त्यांनी लगेच जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आमची इच्छा पूर्ण केली," असे तेजस्वी हिने यावेळी आवर्जून सांगितले. राज्यभरातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. अशा स्थितीत लाखो रुपयांपेक्षा कमीच असणारे खाऊचे पैसे हे जाणिवांची समृद्धता दाखवून देत आहेत. यांच्या या दातृत्वामुळे समाजात नवीन आदर्श निर्माण केला गेला असल्याची प्रतिक्रिया नाशिक शहरात यानिमित्ताने उमटत आहे.

@@AUTHORINFO_V1@@