काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019   
Total Views |


 


सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ याही 'घड्याळ' काढून हाती 'कमळ' घेणार आहेत. त्यामुळे आकाशाला कुठे ठिगळ लावावे, अशी भयाण परिस्थिती या दोन काँग्रेसी पक्षांवर ओढवली आहे. 'पवार' कुटुंबीय सोडून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने भाजप-शिवसेनेत प्रवेश केला, तर कोणालाही आश्चर्य वाटायलो नको, अशी सध्याची परिस्थिती आहे.


राज्यभरात सध्या प्रत्येक शहर, जिल्ह्यात पक्षांतराचे सोहळे रंगताना दिसताहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच अक्षरशः रिकामे होतात की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या तथाकथित 'धर्मनिरपेक्ष' काँग्रेसींना कधी एकदा 'हिंदुत्त्ववादी' होऊ, असे वाटू लागले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे विसर्जन करावे, अशी महात्मा गांधींची इच्छा असल्याचे सांगितले जाते. पण, सध्या गांधींजींची ही इच्छा पूर्णत्वास नेण्याची घाई काँग्रेसवाल्यांनाच झाली आहे की काय, असे वातावरण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार, नेते सर्वांनी भाजप-शिवसेनेकडे प्रवेशासाठी अक्षरशः रांगच लावलीय. मुंबईत तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली असून सध्या या दोन्ही प्रमुख पक्षांना मुंबईत अध्यक्षच नाही, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. मिलिंद देवरा यांनी दिलेला मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा नाकारल्याचे सांगितले जाते असले तरी देवरा अनिच्छेनेच या पदावर असल्याचे स्पष्ट आहे. गुरुवारीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांनी 'घड्याळ' काढून हातावर 'शिवबंधन' बांधले आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण, पक्षाचा अध्यक्ष म्हटल्यावर त्या भागाचा तो सर्वोच्च नेता असतो. अशा शीर्षस्थ नेत्यानेच 'रणछोडदास' होणे म्हणजे पक्षाचे जाहीररित्या नाक कापण्यासारखेच. मुंबई काँग्रेसची स्थितीही फार काही वेगळी म्हणता येणार नाही. माजी केंद्रीय मंत्री, पक्षाचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्या निधनानंतर व संजय निरुपम यांची अध्यक्षपदावरून गच्छंती केल्यानंतर मोठ्या आशेने माजी खासदार मिलिंद देवरा यांना अध्यक्षपदी बसवण्यात आले. पण, २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पानिपतानंतर मुंबई अध्यक्षपदाचा देवरा यांनी राजीनामा दिला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व शीर्षस्थ 'रणछोडदास' राहुल गांधी यांनीच रणांगणातून पळ काढल्याने त्यांचाच कित्ता देवरा यांनी गिरवला. कोणत्याही परिस्थितीत सध्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद पुन्हा घ्यायला राहुल गांधी स्वतः तयार नसताना, ते देवरा यांना मात्र मुंबई अध्यक्षपदी राहण्याचा आग्रह करत आहेत, हे विशेष. आता पक्षश्रेष्ठींनी देवरा यांचा राजीनामा नाकारल्यानंतर देवरा नेमकी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुळात देवरा यांनाच अशा फुटक्या जहाजाचे सारथ्य करण्यात अजिबात स्वारस्य नाही. पण, निरुपम यांचे पद जाण्यामागे देवरा यांचाच हातभार लागल्याने पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाची माळही त्यांच्याच गळ्यात घातली, असे म्हणावे लागेल.

 

सध्या मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेससाठी तीन कार्याध्यक्ष नेमण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असून कामगार नेते भाई जगताप व माजी मंत्री नसीम खान या दोघाजणांना कार्याध्यक्षपदी नेमावे, अशी मागणी करण्यात आली आहे. एरवी मोठी स्पर्धा होत असताना आता मुंबई काँग्रेसकडे हे कार्य'भार' घ्यायला लावणारे पद घ्यायला कोणी इच्छुक नाही, अशी परिस्थिती असून काँग्रेसने सध्यातरी एकनाथ गायकवाड यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. पण, वयाने ज्येष्ठ असल्याने त्यांच्या हिंडण्या-फिरण्यावर मर्यादा आहेत. गायकवाड यांच्या कन्या डॉ. वर्षा गायकवाड यांनी खरे म्हणजे कार्याध्यक्षपदाला काहीसा न्याय दिला असता. पण, मागणी आहे त्याच्या नेमके उलट करणे, पदाच्या नियुक्त्या करताना जातीधर्माचा प्राधान्याने विचार करणे या साच्यातून बाहेर पडायला अजूनही काँग्रेस तयार नाही. सचिन अहिरांनी हाती 'शिवबंधन' बांधताच मुंबई राष्ट्रवादीने धसकाच घेतला असून राष्ट्रवादीने गुरुवारीच मुंबईतील पक्षाच्या नऊ नगरसेवकांची बैठक बोलावली. सर्वांकडून पक्षनिष्ठेची शपथ घेण्यात आल्याचेही वृत्त आहे. मनसेचे जसे सहा नगरसेवक शिवसेनेने उचलून मनसेचे पालिकेतील अस्तित्वच पणाला लावले होते, तसाच प्रकार भाजप किंवा शिवसेना करू शकतात, या शक्यतेनेच राष्ट्रावादीवाल्यांची झोप उडाली आहे. या नऊ नगरसेवकांपैकी कोणाचे अहिर यांच्याशी खास संबंध आहेत, हेही तपासले जात आहे. मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या स्थितीला 'निर्णायकी' नव्हे तर 'निर्नायकी'च म्हणावे लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यभरातही थोड्याफार फरकाने मुंबईसारखीच स्थिती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे थेट भाजप-शिवसेना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठी गळतीच लागली आहे. आता तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ याही 'घड्याळ' काढून हाती 'कमळ' घेणार आहेत. त्यामुळे आकाशाला कुठे ठिगळ लावावे, अशी भयाण परिस्थिती या दोन काँग्रेसी पक्षांवर आली आहे. 'पवार' कुटुंबीय सोडून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने भाजप-शिवसेनेत प्रवेश केला, तर कोणालाही आश्चर्य वाटायलो नको, अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणूनच महिन्याभरात अर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी रिकामी होऊ शकते, अशा राजकीय तर्कवितर्कांना एकाएकी उधाण आले आहे.

 

काँग्रेसकडून भारत भालके, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, सुनील केदार, गोपालदास अग्रवाल, दिलीप सोपल हे आमदार, तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, अवधूत तटकरे, संजय कदम, वैभव पिचड, ज्योती कलानी, संग्राम जगताप, राहुल जगताप हे आमदार भाजप प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. या सर्वांबरोबर काँग्रेसचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादीचे आ. शिवेन्द्रसिंगराजे भोसले हेही आपापल्या पक्षांना निरोप देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता उरलेल्यांना पक्षात थांबवायचे कसे, असा यक्षप्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींना व राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबीयांना पडला आहे. पक्षाबाहेर जाणाऱ्या नेत्यांना कसे थांबवायचे, याचे चांगले कौशल्य शरद पवारांकडे आधी होते. पण, आता हे कौशल्य कालबाह्य झाले असून ते निरुपयोगी ठरू लागले आहे. 'गुरूची विद्या गुरूला' या सूत्राप्रमाणे पवारांनी गेल्या पन्नास वर्षांत जे राजकारण केले, ते 'बूमरँग' होऊन पवारांवरच सध्या उलटताना दिसते. भाजप-शिवसेनेच्या या त्सुनामीसमोर साक्षात 'जाणते' म्हणवले जाणारे शरद पवार सैरभैर झाल्याने राष्ट्रवादीसह काँग्रेसही अक्षरशः भयचकीत झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा सुपडा साफ झाल्याने आधीच येथील दोन्ही पक्षाचे नेते गोंधळलेल्या अवस्थेत होते. त्यात आता हे घाऊक पक्षांतराचे लोण आल्याने काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. येत्या दोन महिन्यांत समोर नक्की काय वाढून ठेवलेय, या कल्पनेनेच काँग्रेसींची भीतीने गाळण उडाली आहे.

 

कुप्रसिद्ध 'रिसोर्ट पॉलिटिक्स' करून पक्षातील सगळ्या आमदारांना एका ठिकाणी हलवणे, त्यांना नजरकैदेत ठेवणे एवढेच पर्याय आता काँग्रेससमोर उरल्याचे मत एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. म्हणूनच एकेकाळी राज्य नव्हे, तर देशव्याप्त पक्षाचा शेवटचा काळ जवळ आलाय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काँग्रेसच्या या र्‍हासाला काँग्रेसच जबाबदार असून 'धर्मनिरपेक्ष' व 'सर्वधर्मसमभाव' या संज्ञेचा बागुलबुवा उभा करून स्वार्थी, आपमतलबी आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्था उभी करण्याचे पाप काँग्रेसने केले. वेळ भरताच त्याचाच फटका आता काँग्रेसला बसला आहे. 'जातीयवादी पक्ष' म्हणून काँग्रेसवाल्यांनी नेहमीच भाजप-शिवसेनेला राजकीय अस्पृश्य ठरवले. त्यांनी कोणाशीही, कुठल्याही संघटनांशी आघाडी केली. पण, भाजप-शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षांना नेहमीच दूर ठेवले. खरे जातीय आणि धर्माचे राजकारण काँग्रेसनेच या देशात सुरू केले. काहीकाळ आपण काहीजणांना फसवू शकतो, पण सदासर्वकाळ आपण सर्वांना फसवू शकत नाही, हेच काँग्रेस विसरली आणि काँग्रेस आपल्याच चक्रव्यूहात फसली. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस ही काँग्रेसचीच अपत्ये असल्याने हे पक्षही याच शूद्र राजकारणामुळे संकटात आले आहेत. अशा राजकारणामुळे काँग्रेस लोकांचा विश्वासच गमावून बसली आहे. त्याचीच परिणिती ही सध्याची राजकीय परिस्थिती म्हणावी लागेल. येत्या महिन्याभरात काँग्रेस-राष्ट्रवादीतून 'आऊटगोईंग'चा असाच ओघ सुरू राहिला तर प्रत्यक्ष लढाई (निवडणूक) आधीच भाजप-शिवसेना युतीला महाविजय मिळेल, ही शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर हे युतीसाठी 'अभूतपूर्व' असेच म्हणावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कष्टाचे, नियोजनाचे व संघटन कौशल्याचे हे फलित म्हणावे लागेल. हे त्रिकूट राजकीय शत्रूंना चारीमुंड्या चित करीत असले तरी आता या तिघांनाही स्वपक्षातील नियोजनाची काळजी करावी लागणार आहे. त्यात ते यशस्वी ठरतीलच, पण आता महाकूटनीतीकार शरद पवार नेमके कोणते डावपेच खेळून ही पक्षांतरे थांबवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप-शिवसेनेचे आक्रमण थोपवताना पवारांना काँग्रेसची साथ कितपत मिळते, यावरही बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@