मुंबई, गतवर्षी प्रमाणे यंदाही राज्यातील १० मानाच्या पालख्यांच्या सुमारे १ हजार ५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे ३ कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नये, असे आवाहन भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शनिवार, दि. १४ जून रोजी केले.
आचार्य भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक दि. २८ मे रोजी पार पडली. या बैठकीत राज्यातील पालखी सोहळे, वारकरी दिंड्या आणि त्यांच्यासाठी शासनाने द्यावयाच्या सुविधा आदींविषयी चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राज्यातील मानाच्या १० पालखी सोहळ्याचे प्रमुख, संस्थानचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते .
याच बैठकीत गतवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी दिंड्यांना अनुदान देण्यात यावे, पावसाच्या पार्श्वभूमीवर जर्मन हंगरचे मजबूत मंडप संपूर्ण पालखी तळांवर उभारावेत, १० प्रमुख पालख्या व त्यासोबत महाराष्ट्रातील सर्व पालखी सोहळ्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, सर्व पालखी सोहळ्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा व मदतीची शासकीय व्यवस्था करण्यात यावी, शासनाने सर्व वारकऱ्यांना मोफत रेनकोट उपलब्ध करुन द्यावेत, पालखी मार्ग व ज्या गावात पालखी मुक्कामी राहणार आहे त्या ठिकाणी मांस विक्री करु नये, आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केल्या असून लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असल्याचे आचार्य भोसले म्हणाले.
विरोधकांकडून वारकऱ्यांची दिशाभूल
विरोधी पक्षातील काही मंडळी जाणीवपूर्वक वारकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु शासन वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देत आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही वारकरी दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये दिले जाणार आहेत.
- आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.