मुंबई : गृह विभागाने सोमवारी राज्यातील पोलीस अधीक्षक आणि इतर उच्च अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी तब्बल २६ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुंबईच्या कामगार आयुक्तपदावर बदली करण्यात आली असून नवी मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी ए. बी. मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात सचिवपदी करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांना देण्यात आली आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी शिवाजीराव दौंड यांना कोकण विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईचे कामगार आयुक्त आर. आर. जाधव यांची मत्स्यविभागाच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई म्हाडाचे मुख्य अधिकारी डी. एस. कुशवाह यांची मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची मुंबईच्या सिडकोमध्ये सह-व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
प्रमुख बदल्या आणि नियुक्त्या :
अजित पाटील : व्यवस्थापकीय संचालक, माहिती-तंत्रज्ञान; राधाकृष्णन बी. : मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा मुंबई; डॉ. नरेश गिते : जिल्हाधिकारी, भंडारा; शंतनू गोयल : अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका; एम. जे. प्रदीप चंद्रन : अतिरिक्त विभागीय आयुक्त, नाशिक; कैलास शिंदे : जिल्हाधिकारी, पालघर; भुवनेश्वरी एस. : मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जि. प.; अजित कुंभार : मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघर; यु. ए. जाधव : मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat