अण्णाभाऊ साठेंच्या विचारांतला तरूण घडवण्यासाठी..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2019   
Total Views |


 


अमित गोरखे यांची अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर नुकतीच अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे सुवर्ण जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने अमित गोरखे यांच्याशी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या प्रतिनिधी योगिता साळवी यांनी साधलेला हा संवाद...

 

आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत सगळ्यांच्या सहकार्याने समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित गोरखे अभ्यासपूर्ण योजना उपक्रम आखत आहेत, चौफेर प्रयास करत आहेत. पण त्यांच्यासाठी हे कार्य कठीण नाही. कारण, चिंचवडच्या सेवावस्तीमध्ये राहणार्‍या अमित यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यामुळे संकल्पना, त्या संकल्पनेसाठी कष्ट करणे आणि ती संकल्पना साक्षात, वास्तवात उभी करणे हे अमित यांच्या डीएनएतच आहे. महामंडळाचे अध्यक्ष झाल्यावर कसे वाटते? अतिशय भावूक होत अमित गोरखे म्हणाले, “खरं सांगू, पहिल्यांदा जेव्हा मला नियुक्तीबाबत कळले, तेव्हा मी रडलो. कारण खूप वर्षांपूर्वी संघर्षाच्या काळात महामंडळाकडून उद्योगासाठी अर्थसाहाय्य मिळावे म्हणून मी अक्षरशः चपला झिजवल्या होत्या. पण साहाय्य मिळाले नव्हते. आज महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर वाटते की, समाजातल्या होतकरू गरजूंना शासनाच्या माध्यमातून साहाय्य करताना त्यांची मानसिकता समजू शकेन, त्यांना मदत करू शकेन. योग्य आणि गरजूंची महामंडळाकडून कधीच निराशा होणार नाही.

 

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा अध्यक्ष होताच मी स्पष्ट निर्देश दिले की, महामंडळाची स्वत:ची अद्ययावत वेबसाईट तत्काळ तयार करायची. अण्णाभाऊ साठे महामंडळ माहितीजालावर शोधले की, तत्काळ अण्णाभाऊंच्या विचारांची आणि कार्याची माहिती मिळेल. तत्काळ वेबसाईट बनविण्याचे कारण असे आहे की, अण्णाभाऊ साठे महामंडळ नाव गुगलवर टाकताच आधीच्या सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची काळोखी गुगलवर दिसते. हा अण्णाभाऊंचा आणि समाजाचा अपमान आहे. त्यामुळे गुगलवर अण्णाभाऊंची आणि महामंडळाचीही योग्य माहिती दिसण्यासाठी ही वेबसाईट तयार करणार आहोत.” अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित गोरखे सांगत होते. “अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे नाव काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात नकारात्मक चर्चेत होते. या पार्श्वभूमीवर अमित यांच्यासाठी मंडळाचे अध्यक्षपद हे काटेरी मुकुटच आहे का?,” असे विचारल्यावर अमित यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरले. ते म्हणाले, “काटेरी मुकुट कुणासाठी? ज्यांना या मुकुटाकडून अपेक्षा असतील त्यांच्यासाठी. जे केवळ समाज आणि देशाच्या बांधिलकीचा, विकासाचा निःस्वार्थीपणे विचार करतात, त्यांच्यासाठी कोणताही मुकुट म्हणजे समाजसेवेची एक संधी देणारा मार्ग असतो. सेवेचा मार्ग हा नेहमी आत्मसमाधानाचा असतो, असे मी मानतो. या सर्वांचे उत्तम आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. ”

 

सद्यस्थिती पाहता या महामंडळाचे कार्य गतिमान कसे करणार?,”यावर उत्तर देताना अमित म्हणाले की, “नुकतीच महामंडळाची पहिली मिटींग झाली. त्या मिटींगमध्ये सर्वच योजनांचा, एकंदर कार्याचा, परिणामांचा आढावा घेतला. यात असे दिसून आले की, समाजाशी निगडित राहून समाजासाठीच्या योजना राबवायला हव्यात. सध्या कर्ज आणि प्रशिक्षण अशा दोन योजना महामंडळाच्या आहेत. पण या योजनांचे लाभार्थी कमी आहेत. कारण, कदाचित लोकांपर्यंत महामंडळ पोहोचले नसावे. यासाठी नुकताच एक प्रयोग केला. अण्णाभाऊ साठे महामंडळाशी जोडण्यासाठी एक लिंक तयार केली. संगणक किंवा मोबाईलवरून त्या लिंकवर क्लिक केले की, व्यक्ती तत्काळ अण्णाभाऊ साठे महामंडळाशी जोडली जाईल. त्याला मध्यस्थीची गरज नाही. तुम्हाला काय मलाही आश्चर्य वाटते की, चार दिवसात १ लाख, २२ हजार लोक या लिंकद्वारे अण्णाभाऊ साठे महामंडळाशी जोडले गेले. समाजातील २० लाख लोक जोडले जावेत, असा आमचा प्रयत्न आहे. दुसरे असे की, या योजनेअंतर्गत कर्जाची अनुमती द्यायला बँका सहकार्य करत नाहीत, अशाही तक्रारी समोर आल्या आहेत. बँकेचे यावर म्हणणे आहे की, यापूर्वीच्या कर्जांची थकबाकी आहे. मात्र मी यावर ठरवले आहे की, सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांशी संपर्क, चर्चा करायची. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून या बँकाशी समन्वय साधत समाजाच्या गरजूंना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यायची. बँकाशी चर्चा करून मी त्यांच्याकडून एक वर्ष मागेन. या एक वर्षाच्या कालावधीत ज्या गरजूंना अर्थसाहाय्य दिले जाईल, त्यांच्याकडून निश्चितपणे परतफेड केली जाईल. त्यासाठी विशेष लक्ष देणार आहे. मुळात सगळ्या कारभारामध्ये पारदर्शकता आणून सगळे व्यवहार हे समाजाच्या भल्यासाठी होतील, अशा प्रकारचे काम मला करायचे आहे.

 

महामंडळामध्ये असलेल्या योजनांमध्ये काही सुधार करणार का?” विचारल्यावर त्यांचे म्हणणे होते की, “याआधी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यात मातंग आणि तत्सम १२ पोटजातीच्या विद्यार्थ्यांनाही एमपीएससीचे शिक्षण घ्यायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र अर्थात बार्टीकडूनच आर्थिक साहाय्य मिळत असे. सर्वानुमते मी पहिल्यांदा निर्णय घेतला की, मातंग आणि तत्सम १२ पोटजातीतील एमपीएससी परीक्षा देणार्‍या ५० विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून अर्थसाहाय्य करण्यात येईल.” अमित गोरखे यांचा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे, कारण बार्टीमध्ये इतर ५८ समाजांच्या स्पर्धेमध्ये मातंग आणि पोटजातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी १०० टक्के प्रतिनिधित्व मिळेलच असे नाही. असो, आगामी काळातील नवीन उपक्रम सांगताना अमित म्हणाले की, “प्रत्येक जिल्ह्यामध्ये महामंडळातर्फे समाजासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण तर असेलच पण त्यासोबतच व्यक्तीचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल, याचेही प्रशिक्षण दिले जाईल. काही वर्षांपूर्वी मंडळातर्फे महिलांसाठीसुद्धा योजना होत्या. पण त्या बंद झाल्या. आता पुन्हा माताभगिनींच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानाकरिता महामंडळातर्फे योजना कार्यान्वित करणार आहे.”

 

अमित न थांबता स्पष्टपणे उद्दिष्टांची यादी मांडत होते. पण महामंडळाचा आजवरचा अनुभव पाहता हे केवळ अध्यक्षीय ईच्छेने होईल का? असा विचार आला. तसे विचारल्यावर अमित म्हणाले,“ योेजनेचा उद्देश कितीही चांगला असला तरी एकट्या माणसाने काय होणार? त्यामुळे माझ्यासोबत महामंडळातील प्रत्येक व्यक्ती, पदाधिकारी-कर्मचारी यांनाही सोबत घेतल्याशिवाय चालणारच नाही. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शनही अमूल्यच आहे. सगळ्यांना सोबत घेऊन नियोजन करून समाजासाठी महामंडळ काम करेल, याची मला खात्री आहे.” “इतकी खात्री कशी?” विचारल्यावर अमित म्हणाले, “माझी आज शिक्षण संस्था असली किंवा एका नामांकीत सांस्कृतिक संस्थेचा मी अध्यक्ष असलो तरी हे सर्व करण्याची प्रेरणा माझे आई-बाबा आणि रा.स्व.संघाची शाखा आहे. या शाखेतच मी नियोजन, सर्वसहभागिता आणि सर्वसमावेशकता शिकलो आहे. त्यामुळे आज इथे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षीय खुर्चीवर बसूनही मी समाज आणि देशहिताचाच विचार करेन आणि उद्या रस्त्यावर असेन तरीसुद्धा देश आणि समाजाचाच विचार करेन. तसेच स्वामी विवेकानंदांचा एक विचार माझ्या आयुष्याचा मूलमंत्र आहे. ते सांगून गेलेत की, ‘एक ध्येय निश्चित करा, त्या ध्येयासाठी सर्वशक्तीनिशी कामाला लागा.’ हा विचार घेऊनच अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कामाला समाजशील आणि गतिशील बनवणे, हे मी माझ्ये ध्येय ठेवले आहे. त्यासाठी सर्वशक्तीनिशी कामाला लागलो आहे.सध्याचे वर्ष हे अण्णाभाऊ साठेंचे सुवर्णजयंती वर्ष आहे. त्यामुळे काम करण्यासाठीचे हे उत्तम वर्ष आहे. या वर्षानिमित्त महामंडळातर्फे अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मातंग आणि तत्सम १२ पोटजातीच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्कर्षाचा बिंदू केंद्रित करूनच या उपक्रमांचे आयोजन असणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ म्हणाले होते की, “ही पृथ्वी दलितांच्या श्रमावर तरली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक शोषित वंचित गटाला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक स्थैर्य मिळवून देणे यासाठी अध्यक्ष म्हणूनच नाही तर समाजाचा तरुण घटक म्हणून मी कटिबद्ध आहे.”

 

जय लहूजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून या निमित्ताने मला अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळणार आहे. मी आपल्या समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी निःस्वार्थीपणे अहोरात्र काम करणार आहे.तरी, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व माझ्याशी जोडले जाण्यासाठी कृपया https://wa.me/९१९११९४४५५३३?text=Hi वर आपले नाव, पत्ता व्हॉट्सअॅप करा. कृपया हे निवेदन आपल्या समाजबांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा.

आपला नम्र

अमित गोरखे

९५९४९६९६३८

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@