संप्रदाय आणि मठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2019
Total Views |



रामदासी संप्रदायाचे, त्यातील महंतांचे कार्य समाजोपयोगी, हिंदू संस्कृतीरक्षक व हिंदवी राज्याला पोषक होते, हे आपण मागील लेखात पाहिले. स्वामींच्या कार्याचे वर्णन गिरीधरस्वामींनी त्यांच्या ‘समर्थप्रताप’ या ग्रंथात केले आहे. त्यात ते म्हणतात, समर्थांच्या कार्याला उपमा द्यायची तर, ‘आचार्यस्वामींची उपमा साजे।’ याचा अर्थ समर्थकार्याची तुलना करायची तर, आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्मरक्षणाचे जे कार्य केले, त्याच्याशी करता येईल.


आचार्यांनी ब्रह्मसूत्रे रचून वैदिक धर्माचे रक्षण केले, तर इकडे समर्थांनी दासबोधादि ग्रंथरचना करून ‘ब्राह्मण्य’ रक्षणाचे कार्य केले. ‘ब्राह्मण्य’ या शब्दप्रयोगावरून अनेकांचा रामदासांविषयी गैरसमज झालेला दिसून येतो. तो शब्द ब्राह्मणजातीशी जोडला गेल्याने अनेक टीकाकारांनी समर्थांवर जातीयतेचा शिक्का मारून त्यांना लक्ष्य केले. तथापि ‘ब्राह्मण्य’ शब्दाचा अर्थ सज्जनांच्या ठिकाणी असणारा गुणसमुच्चय असा घ्यावा लागतो. हे गुण कोणते, ते भगवद्गीतेतील 18.42 या श्लोकात सांगितले आहेत. त्यांना ब्राह्मण्य म्हणतात.

शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जवमेवच।

ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्॥

याचा अर्थ मनाचा निग्रह, इंद्रियांचा निग्रह, तप, शूचिर्भूतपणा, क्षमा, सरळपणा, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक्यबुद्धी हे ब्रह्मकर्म म्हणजे ब्राह्मण्य होय. पूर्वी शंकराचार्यांनी भरतखंडात वैदिक धर्मस्थापनेचे कार्य केले. तसेच कार्य समर्थांनी 16 व्या शतकात केले. आचार्यांनी संन्यास घेतला आणि यतिधर्माची महती वाढवली. समर्थांनी ब्रह्मचर्याश्रमात हिंदूंचे ऐक्य घडवून आणले. गिरीधरस्वामी सांगतात,

समर्थे नाना पंथ शोधिले।

समर्थे नाना लोक बोधिले।

समर्थे नाना लोक वेधिले।

हनुमानस्वामी सर्वेश्वरू।

समर्थे भरतखंडी आरणे केली।

समर्थे तीर्थ पावन केली।

समर्थे गुप्तपणे सामर्थे दाविली।

सद्गुरूनाथ जगदिश्वरू।

 

वेदांच्या विरोधात जे होते, त्यांची मते आचार्यांनी खोडून काढली. तसेच वैदिक उपासना पंथीयांना एका छत्राखाली आणले. अशारितीने वैदिक धर्माचे सामर्थ्य त्यांनी वाढवले. ल. रा. पांगारकर लिहितात, “लोकसंग्रह करीत असता काही मोडून काढायचे असते तर, काही जोडायचे असते, म्हणजेच शत्रूंना मोडून काढायचे असते तर, काही जोडायचे असते. म्हणजेच शत्रूंना मोडून काढायचे व मित्रांना जोडायचे.” समर्थांची विचारपद्धती याच प्रकारची आहे. आचार्यांनी बौद्ध, जैन या अवैदिक मतांचे खंडन करून वैदिक धर्माला नवी दिशा दिली. तथापि, वेदकालीन देवदेवता व नंतरच्या आलेल्या अनेक देवदेवता यांचा बाजार भरला गेला. जो तो आपल्या देवतेला श्रेष्ठ मानू लागला. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आचार्यांनी पाच मुख्य वैदिक देवतांचे पंचायतन करून त्या पंचायतनाच्या पूजेची शिस्त लावून दिली. त्या पाच वैदिक देवता म्हणजे गणेश, सूर्य, शिव, विष्णू व देवी. या पंचायतन पूजनाने शैव, वैष्णव, गाणपत्य इ. संप्रदायांचे वाद संपुष्टात आले. आचार्यांनी दूरदृष्टीने हिंदुस्थानच्या चारी दिशांना चार पीठे स्थापन केली. रामदासांनीही हाच कित्ता गिरवला. रामोपासनेखाली सर्वांना एकत्र आणले व हिंदुस्थानभर जागोजागी मठस्थापना केली. म्लेंच्छ आक्रमण काळात हिंदू धर्माचे, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अखंड हिंदुस्थान डोळ्यासमोर ठेवला.

आचार्यांनंतरच्या काळात संतांनी निवृत्तीवादाचा भडिमार करून लोकांची मने पांगळी करून टाकली होती. त्याचा फायदा उचलून म्लेंच्छांनी हिंसक आक्रमकता अवलंबून हिंदूंना जगणे नकोसे केले होते. त्यांना हिंदू धर्म, संस्कृती नष्ट करायची होती. अशा काळात तिला सावरण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रामदासांनी केले. ‘सर्वांभूती ब्रह्म’ या कल्पनेचा विवेक राहिला नाही. अशावेळी स्वामींनी परखड भाषा वापरून समाजाला भानावर आणले. स्वामी म्हणतात, “सर्वांभूती एक ब्रह्म म्हणून माणसाचे अन्न गाईला आणि गाईचा चारा माणसाला खायला देता येत नाही!” रामदासांनी राजकारणातसुद्धा वास्तववाद पाहिला, ही त्यांची विशेषता आहे.

 

बहुत लोक मेळवावें। एक विचारें भरावें।

कष्ट करोनि घसरावे। म्लेंच्छांवरी।

 

रामदासांनी प्रतिपादलेला क्षात्रधर्म म्हणजे झुंजारवृत्ती. त्यांच्या उपदेशात देवधर्म बुडवू पाहणार्‍या मुसलमानांना बुडवले पाहिजे, असा मराठी बाणा दिसून येतो. तो त्यांना आपल्या संप्रदायात उतरवायचा होता.

 

देवद्रोही तितुके कुत्ते।

मारोनि घालावे परते।

देवदास पावती फत्ते।

यर्द्थी संशयो नाही॥

 

रामदासांना समाजात नीतीस्थापना, धर्मस्थापना व राज्यस्थापना करायची होती. त्यापैकी प्रथम स्थान हे नीतीस्थापनेला होते. याची अनेक उदाहरणे समर्थवाङ्मयात दाखवता येतील. लोकसमुदाय आणि आपण राष्ट्रासाठी आहोत, ही जागृती लोकांत निर्माण करणे, ही स्वामींच्या मते राज्यस्थापना. या विचारांतून त्यांनी संप्रदायाची उभारणी करून हिंदुस्थानभर मठ स्थापन केले.

 

रामदासकाळात बौद्धमठांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले होते. महानुभाव पंथांच्या मठांची तीच अवस्था होती. मात्र, सूफीसंतांचे मठ होते. अनेक मंदिरांचा विध्वंस करीत या मठांची स्थापना होत होती, हे शल्य रामदासांच्या मनात होते. म्हणून त्यांनी संप्रदायाची उभारणी करून मठ स्थापन करायला सुरुवात केली. रामदासांनी संप्रदायाचे दैवत राम निवडल्याने सनातन धर्मीयांनाच त्यात प्रवेश मिळाला. पंढरीच्या विठोबाच्या उपासकांत लिंगायत, जैन, मुसलमान वगैरे लोक आढळतात. परंतु, समर्थ संप्रदायात यापैकी कुणीही नाही. रामदासांनी संप्रदायाची 20 लक्षणे सांगितली आहेत. ती अशी, लिहिणे, वाचणे अर्थान्तर सांगणे, आशंका निवृत्ती, प्रचिती, गाणे, नाचणे, टाळी वाजवणे, अर्थभेद, प्रबंध, प्रबोध, वैराग्य, विवेक, लोक राजी राखणे, राजकारण, अव्यग्रता, प्रसंग जाणणे, काळाची ओळख, उदासीन वृत्ती, लोलंगता नसणे, सर्वांशी समान वागणूक, समाधान आणि रामोपासना.

ही लक्षणे नीट अभ्यासली तर लक्षात येते की, तेथे अक्षरशत्रूंना प्रवेश नव्हता. स्वामींची अपेक्षा अशी की, संप्रदायातील महंतांनी विद्येची उपासना करावी. ग्रंथातील अर्थ लोकांना उलगडून सांगावा, लोकांच्या शंकांचे निरसन करावे. अभ्यासू, विद्वान, ग्रंथलेखन करणारे महंत त्यांना संप्रदायात हवे होते. नुसते ग्रंथ वाचून त्याचा अर्थ सांगणारे नव्हेत तर, त्या अर्थाची प्रचिती घेणारे महंत संप्रदायाला हवे होते. संप्रदायातील लोकांनी, रामदासशिष्यांनी लोकांत मिसळले पाहिजे, त्यांनी राजकारण केले पाहिजे, यावर स्वामींचा कटाक्ष होता. ईश्वरार्पण बुद्धीने राजकारणासह लोकसंग्रहाचा खटाटोप श्रमपूर्वक करणारे निःस्पृह महंत रामदासांना हवे होते. समर्थसंप्रदाय किंवा पंथ हा हौशे, नवशे, गवशे यांच्यासाठी नव्हता, हे रामदासांनी वीस लक्षणांतून स्पष्ट केले आहे.

 

त्या संप्रदायासाठी त्यांना अष्टपैलू, अष्टावधानी व्यक्तिमत्त्व असणारे महंत हवे होते. तसेच त्यांना गायन, कीर्तन, नर्तन या कलाही अवगत असाव्या, असे महंत अपेक्षित होते. असे महंत मठांना मिळूनही मठांचा कारभार व योगक्षेम केवळ भिक्षेवर चालत असे. भिक्षान्न हे महंतांच्या दृष्टीने दिव्यान्न असे, अशी शिकवण महंतांना दिली गेलेली असे. रामदासी भिक्षेवर स्वतंत्र लेख लिहिता येईल. तूर्तास रामदासी संप्रदायाची वीस लक्षणे सध्याच्या रामदासी संप्रदायात कशी पाळली जातात, हे बघावे लागेल. त्यातील रामोपासना हे शेवटचे लक्षण मात्र सर्व मठ सांभाळतात, असे म्हणावे लागेल.

 
- सुरेश जाखडी  

[email protected]

7738778322

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@