रेल्वे स्थानकांवर सुरक्षेप्रित्यर्थ जनजागृती उपक्रम

    09-Mar-2019
Total Views | 216

 

 
 
 
मुंबई : वडाळा, माटुंगा आणि शिवडी या तीन रेल्वे स्थानकांवर शनिवारी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि ९७० रेल्वे इंजिनिअरिंग रेजिमेंट (टेरिटोरिअल आर्मी) चे जवान यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करण्यात आली. आईडी (IED)या एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसबाबत रेल्वे प्रवाशांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.
 
 

 
 

बॉम्बसदृश्य वस्तू कशा ओळखाव्यात, हेदेखील सांगण्यात आले. रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी आईडीद्वारे छोटे स्फोट घडवून भीतीचे वातावरण पसरवले जाते. आईडीच्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत नाही. पण अनेक लोक जखमी होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत लोक जीव वाचविण्यासाठी सैरावरा पळू लागतात. गर्दी असल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू होतो. काही समाजविघातक लोक गर्दीच्या ठिकाणी असे आईडी स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. खेळणी, कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या, जेवणाचे डबे यांसारख्या सामान्य वस्तूंचा वापर आईडी स्फोटासाठी केला जातो.

 

 
 

आईडी असलेल्या या बॉम्बसदृश्य वस्तू कशा ओळखाव्यात, याविषयीचे प्रशिक्षण रेल्वे कर्मचाऱ्यांना, रेल्वे प्रवाशांना, रेल्वेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आणि स्टेशनवर बुट पॉलिश करणाऱ्यांना देण्यात आले. अशा प्रकारची कोणतीही वस्तू रेल्वेच्या डब्यात किंवा स्टेशन परिसरात आढळ्यास तातडीने त्याबाबतची माहिती स्टेशन मास्टर, आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) किंवा रेल्वे पोलिसांना देण्यात यावी. त्यासाठी १८२ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. तसेच रेल्वे कर्मचारी, टीसी, बुकिंग क्लार्क, रेल्वेचे सफाई कर्मचारी,रेल्वे स्टेशनवरील सशुल्क शौचालयातील कर्मचारी, बूट पॉलिशवाले, हमाल यांना आवाहन करण्यात आले, की कोणत्याही अनोळखी व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारचे सामान स्वत:जवळ सांभाळायला घेऊ नका. तसेच वेळोवेळी स्टेशनवरील कचऱ्याच्या डब्याचे निरिक्षण करण्यात यावे. असे आवाहन या सुत्य उपक्रमाद्वारे करण्यात आले.

 


 
 

टेरिटोरिअल आर्मीचे सदस्य आणि शिवडी रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर विनायक शेवाळे यांच्या पुढाकाराने हा सुत्य उपक्रम राबविण्यात आला. मुख्य तिकीट पर्यवेक्षक मनिषा पिंगुळकर, महादेव पडवळ, रविंद्र पवार, विशाल आढव, सचिन कांबळे, शरद म्हात्रे, अशोक गुरमित्तल, आर के पांडे, रेखा मडिवाल यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. वडाळा वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र पाल आणि आरपीएफचे आर के सिंह यांनी या उपक्रमाला विशेष मदत केली.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121