‘चौपदी’ची अनिष्ट चौकट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019   
Total Views |

 


 
 
 
धर्माचे माजवुनी अवडंबर

नीतीला आणती अडथळे,

विसरुनीया जे जातात खुळे

नीतीचे पद जेथे न ढळे

धर्म होतसे तेथेच स्थिर...

 

कवी केशवसुत आपल्या ‘तुतारी’ या प्रसिद्ध कवितेत धर्माचे अवडंबर माजवणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतात आणि तुतारीच्या किंकाळीने अशा अनीतींना अगदी उखडून फेकण्याचे आवाहन करतात. केशवसुतांच्या कवितेतील या ओळी स्मरित होण्याचे कारण आपला शेजारी देश नेपाळमध्ये घडलेली एक हृदयद्रावक घटना. ही ‘तशी’ पहिलीच घटना नाही, पण धर्म आणि रुढी-परंपरा माणसाच्याच कशा जीवावर बेतू शकतात, याचं एक जळजळीत सत्य म्हणून याकडे पाहावे लागेल.

 

हिमालयाच्या अगदी कवेत वसलेला निसर्गसंपन्न नेपाळ हा देश. येथील ८१.३ टक्के लोकसंख्या ही धर्माने हिंदूच. पण, नेपाळच्या ग्रामीण भागात आजही ‘चौपदी’ नावाची एक भेदभावजनक प्रथा कटाक्षाने पाळली जाते. या प्रथेनुसार, घरातील मासिक पाळी सुरू झालेल्या महिलेला घराचा उंबराही ओलांडता येत नाही. तिची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची अशी सगळीच व्यवस्था ही घरानजीक एका छोट्याशा काळोख्या झोपडीत केली जाते. म्हणजे, मासिक पाळीच्या काळात त्या स्त्रीने अंधाऱ्या रात्रीही त्या खुराड्यासारख्या झोपडीतच विव्हळत कंठायच्या. याच अनिष्ट ‘चौपदी’ प्रथेने नुकताच नेपाळमध्ये अजून एक बळी घेतला. प्रथेला जुमानत रात्रीच्या वेळी झोपडीत गेलेली अशीच एक २१ वर्षीय विवाहिता जीव गुदमरून झोपडीतच दगावली. सकाळी तिची सासू तिची विचारपूस करण्यासाठी गेली असता सूनबाई जमिनीवर निपचित पडलेली आढळली. ‘चौपदी’च्या चौकटीचा हा पहिला बळी नाही, तर गेल्याच आठवड्यात आई आणि दोन मुलांनाही असेच या झोपडीच्या कोंडमाऱ्याने गिळंकृत केले.

 

खरं तर नेपाळच्या रुढीवादी गावांमध्ये घराच्या आसपास अजूनही अशा छोट्या झोपड्या सर्रास आढळतात. कारण, मासिक पाळीच्या काळात तिथे स्त्रियांना अपवित्र, अच्युत, अस्पृश्यासारखी हीन वागणूक दिली जाते. अन्नाला, गुराढोरांना, पुरुषाला अशा स्त्रियांचा स्पर्श अशुद्ध मानला जातो. म्हणजे, लक्ष्मी, सरस्वती म्हणून आरती ओवाळणाऱ्या याच मुलींची मासिक पाळीच्या काळात मात्र सावलीही नकोशी वाटते आणि म्हणून मग तिची रवानगी साधी खिडकीही नसलेल्या, छोट्याशा कोंडमारा वजा झोपडीत केली जाते. या अन्यायकारक प्रथेविरोधात नेपाळमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. एवढेच नाही तर आपल्या घरातील ‘चौपदी’ प्रथेअंतर्गत अशी वागणूक देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना या अंतर्गत कायदेशीररित्या दोषीही ठरवले गेले. २००५ सालापासून या प्रथेवर कायद्यान्वये बंदी आहे, तर गेल्याच वर्षी नेपाळने सरकारने या प्रथेविरोधात अशाप्रकारे स्त्रीवर जबरदस्ती करणाऱ्यांना तीन महिन्यांचा सक्त कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षाही लागू केली. पण, आजही या कायद्याची अंमलबजावणी नेपाळच्या दुर्गम, ग्रामीण भागांमध्ये होताना दिसत नाही.

 
आजही काही नेपाळी स्त्रियांना ‘चौपदी’च्या या ‘अमानवीय’च म्हणावे लागेल, अशा जुनाट परंपरेसमोर मान तुकवावी लागते. का... तर जुन्या परंपरांचा हा रुढीवादी पगडा अजूनही काही पिच्छा सोडायला तयार नाही. त्यामुळे नेपाळमधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, अशाप्रकारे केवळ कायदा बनून हा प्रश्न सुटणारा नाही. त्यासाठी गरज आहे ती व्यापक प्रमाणात जनजागृतीची आणि लोकशिक्षणाची. स्त्रियांनीही अशा परंपरांना कदापि बळी पडता कामा नये. कारण, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीचा अगदी नैसर्गिक शरीरधर्म. त्यामुळे उलट मासिक पाळीच्या काळात पुरुषांनीही स्त्रियांची अधिक काळजी घ्यायला हवी. कारण, या काळात स्त्रियांना अशक्तपणा, एकटेपणा जाणवण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा, त्यांना स्वत:पासून, घरापासून असे दूर कोंडमाऱ्यात लोटून काहीही साध्य होणार नाही. उलट, आपल्याच आई-बहिणीचा, बायकोचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, याची जाणीव पुरुषांनी ठेवायलाच हवी. त्याशिवाय यासारख्या प्रथांचे समूळ उच्चाटन होणार नाही. त्यामुळे एकीकडे ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ हे वचन बोधवाक्य म्हणून मिरवणाऱ्या नेपाळने खरंच माता आणि मातृभूमी या स्वर्गापेक्षा महान आहेत, हे आपल्या कृतीतून दाखवून द्यायची वेळ आली आहे. तसे झाल्यास सर्वार्थाने या हिंदूबहुल राष्ट्राबद्दलचा आदर आणि सन्मान अधिक वाढेल.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@