कर्नाळा पक्षी अभयारण्यात प्रथमच आढळला हिमालयातला 'टिकेल्सचा कस्तुर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |

tiger_1  H x W:

छाया - विवेक अमृते 

अभयारण्याच्या पक्ष्यांच्या यादीत भर


मुंबई (अक्षय मांडवकर) - मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्यातून प्रथमच 'टिकेल्सचा कस्तुर' (Tickell's thrush) या स्थलांतरित पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. हे पक्षी दरवर्षी हिवाळ्यात हिमालयामधून पश्चिम घाटामध्ये स्थलांतर करतात. पक्ष्यांसाठी नंदनवन असणाऱ्या कर्नाळ्यामधून या पक्ष्याची प्रथमच नोंद झाल्याने याठिकाणी आढळणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत भर पडली आहे.

 
 

मुंबईत हिवाळ्याची चाहूल लागली नसली तरी दरवर्षी या कालावधीत देश-विदेशातून स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे हौशी पक्षीनिरीक्षकांनी जंगल आणि पाणथळींवर पक्ष्यांच्या शोधार्थ भटकण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पनवेलमधील कर्नाळा पक्षी अभयारण्यात 'जंगलहाईक'तर्फे पक्षीनिरीक्षणाची सैर आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान पक्षीनिरीक्षकांना याठिकाणी 'टिकेल्सचा कस्तुर' हा स्थलांतरित पक्षी आढळून आला. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी कर्नाळा पक्षी अभयारण्यात या पक्ष्याची नोंद झालेली नाही. 'टिकेल्सचा कस्तुर' हा प्रामुख्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर अभयारण्य आणि भांडुप उद्दचन केंद्र परिसरात आढळून आला आहे. कर्नाळ्यात या पक्ष्य़ाची प्रथमच नोंद झाल्याची माहिती प्रसिद्ध पक्षीनिरीक्षक अविनाश भगत यांनी दिली.

 
 छाया - विवेक अमृते

tiger_1  H x W: 
 

मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा पक्षी अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी आसऱ्यासाठी येतात. याठिकाणी पक्ष्यांच्या सुमारे १३४ प्रजातींची नोंद असून ३७ प्रजातीचे स्थलांतरित पक्षी आढळून येत असल्याची माहिती अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. आता त्यामध्ये 'टिकेल्सचा कस्तुरा'ची भर पडली आहे. हा पक्षी हिमालयात वास्तव्य करत असून त्याठिकाणी प्रजनन करतो. हिवाळ्यादरम्यान तो दक्षिण भारतात स्थलांतर करतो. प्रामुख्याने पश्चिम घाटामध्ये त्याचे स्थलांतर होते. सदाहरित वनांमध्ये तो स्थलांतर करत असून जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो. त्याच्या खाद्यामध्ये प्रामुख्याने किटक, गांडुळ आणि छोट्या फळांचा समावेश आहे. यामधील नराचा दर्शनी भाग निळसर-राखाडी रंगाचा असतो. तर मादी तपकिरी रंगाची असते.

@@AUTHORINFO_V1@@