कार्यक्षम वनाधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |
India _1  H x W


वनसंवर्धनाचा वसा घेऊन परिणामकारक काम करणारे आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप पाडुरंग चव्हाण यांच्याविषयी...

 

अपघाताने एखाद्या क्षेत्राकडे वळलेली माणसंही मिळालेल्या संधीचं सोनं करून त्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करतात. वनविभागात गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत असणारा एक वनाधिकारीही या क्षेत्राकडे तसा अपघातानेच वळला. मात्र, वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षणाची मिळालेली जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली. वनांवर आधारित लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या कल्याणासाठी काम केले. शाश्वत निसर्ग पर्यटनासाठी विशेष प्रयत्न केले. देश-विदेशातील पक्ष्यांचे माहेरघर असणारे कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असा कार्यक्षम वनाधिकारी म्हणजे प्रदीप चव्हाण.

 

ठाणे शहरातील सर्वसामान्य कुटुंबात चव्हाण यांचा दि. २८ जून, १९८२ साली जन्म झाला. ठाण्यात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चव्हाण कुटुंबीय कल्याणला स्थायिक झाले. भटकंतीच्या निमित्ताने त्यांची निसर्गाशी होणारी ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादित असायची. त्यांना त्याचे विशेष काही आकर्षण नव्हते. त्यामुळे कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कायद्याच्या शिक्षणाकरिता प्रवेश घेतला. मात्र, त्यांचा ओढा गणवेशधारी नोकरीकडे होता. पदवीचे शिक्षण सुरू असताना २००२ मध्ये त्यांनी वनविभागाच्या वनपाल पदाच्या भरतीत अर्ज भरला. २००४ साली कायद्याचे शिक्षण घेताना चव्हाणांची या पदासाठी निवड झाली आणि ते प्रशिक्षणासाठी चंद्रपूरला रवाना झाले. वर्षभर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती शहापूर तालुक्यातील वन विभागाच्या प्रादेशिक विभागात झाली. २००५ ते २०१४ पर्यंत त्यांनी 'वनपाल' या पदावर शहापूर, खर्डी आणि कसारा वनपरिक्षेत्रात काम केले.

 

२०१४ साली त्यांची 'वनपरिक्षेत्र अधिकारी' या पदावर पदोन्नती झाली. 'वनपरिक्षेत्र अधिकारी' म्हणून २०१४ साली चव्हाणांनी खर्डी येथील वन्यजीव विभागाचा कार्यभार स्वीकारला. त्यादरम्यान त्यांच्याकडे तानसा वन्यजीव अभयारण्याच्या 'साहाय्यक वन संरक्षक' पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यामुळे त्यांनी या परिसरातील खैराच्या झाडांच्या अवैध तोडीवर घाव घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथील स्थानिकांच्या रोजगारांचा प्रश्नही गंभीर होता. म्हणूनच त्यांनी माहुली येथील निसर्ग पर्यटन उपक्रमाला चालना देऊन स्थानिकांना रोजगाराची एक संधी निर्माण करून दिली. तेथील धबधब्यावर पर्यटकांच्या होणार्‍या अपघाती मृत्यूवर रोख लावण्यासाठी विशेष कार्यवाही केली. त्यासाठी धबधब्याच्या तळाची खोली कमी केली, त्याभोवती जाळी लावली आणि मद्यपानास मज्जाव करण्याचे कार्य प्रभावीपणे राबवले. त्यामुळे पर्यटकांचे अपघाती मृत्यू बंदच झाले.

 

खर्डी वनपरिक्षेत्रातील तीन वर्षांचा कार्यभार संपुष्टात आल्यानंतर २०१७ मध्ये चव्हाणांची बदली कर्नाळा पक्षी अभयारण्यात झाली. देशविदेशातून स्थलांतर करून येणार्‍या पक्ष्यांचे हे अभयारण्य नंदनवन मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि पक्षीनिरीक्षक भेट देतात. गेल्या तीन वर्षांत चव्हाणांनी अभयारण्याच्या सर्वांगीण विकासाकरिता परिणामकारक काम केले. सर्वप्रथम त्यांनी कर्नाळ्यातील गावकर्‍यांच्या रोजगार निर्मितीकरिता विशेष प्रयत्न केले. अभयारण्यात कामावर असलेल्या गावकर्‍यांना शासनाकडून वेळेवर पैसे मिळते नव्हते. त्यामुळे त्यांच्यामध्ये कामाप्रती उदासीनता निर्माण झाली होती.

 

ती दूर करण्यासाठी चव्हाणांनी अभयारण्याच्या प्रवेश शुल्कामधील अर्धा वाटा गावकर्‍यांच्या ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीला देण्याबाबत विभागाकडे मागणी केली. त्यासाठी सतत पाठपुरावा केला. अखेरीस विभागाने ही मागणी मान्य केली. अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यासाठीही चव्हाणांनी प्रभावी काम केले आहे. अभयारण्यात जाताना पर्यटकांच्या साहित्याची तपासणी करून त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकची नोंद घेतली जाते. प्लास्टिकच्या सामानाकरिता त्यांच्याकडून १०० रुपये अनामत रक्कम घेण्यात येते. अभयारण्यातून परतताना पर्यटकांनी त्यांच्याजवळ असलेले प्लास्टिकचे सामान परत न आणल्यास त्यांनी जमा केलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येते. या नियमामुळे अभयारण्य प्लास्टिकमुक्त होण्यास मोठी मदत झाली आहे.

 

चव्हाणांनी अभयारण्यात येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठीही यशस्वी प्रयत्न केले आहेत. दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आणि खास करून कर्नाळ्यात प्रजननासाठी येणार्‍या तिबोटी खंड्या पक्ष्याच्या संरक्षणासाठी यंदा त्यांनी विशेष प्रयत्न केले. या पक्ष्याच्या घरट्याभोवती वन्यजीव छायाचित्रकारांचा सतत राबता असायचा. त्यामुळे पक्ष्यांना प्रजनन करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यासाठी यंदा पावसाळ्यात या पक्ष्यांच्या घरट्यांच्या जागा प्रजनन कालावधीत लोकांसाठी बंदिस्त करण्यात आल्या. त्यामुळे या पक्ष्यांना प्रजनन करण्यास सुरक्षित वातावरण मिळाले. सध्या चव्हाणांवर कर्नाळ्याबरोबर फणसाड वन्यजीव अभयारण्याचादेखील अतिरिक्त कार्यभार आहे. या दोन्ही अभयारण्यात निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी चव्हाण प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस दै. 'मुंबई तरुण भारत' कडून शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@