संवेदनशीलता भाग-२

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |



'संवेदनशीलता' जशी प्राण्यांमध्ये वा वनस्पतींमध्ये दिसून येते, तशीच ती मनुष्यांमध्येही फार प्रभावीपणे दिसून येते. या संवेदनशीलतेचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, वातावरणात होणार्‍या बदलांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, तसेच विविध ऋतू व विविध प्रदेशांमधील वातावरण, हवामान व तापमान यांचा माणसावर व त्याच्या राहणीमान व सवयींवर होणारा परिणाम. उदा. एखादा माणूस तापमानातील कठोर बदलांना व्यवस्थित तोंड देतो. दुसरा माणूस त्याच तापमानात आजारी पडतो.

 

एखादा माणूस दमट वातावरणात सहज राहू शकतो, तर एखाद्याचा त्याच वातावरणामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. समुद्रसपाटीपासून अतिउंच व दुर्गम भागात काही लोक व्यवस्थित तग धरून राहतात. काही लोक ते सहन न झाल्याने आजारी पडतात. शरीराची पचनक्रिया व पचनशक्ती हीसुद्धा संवेदनशीलतेने प्रभावित असते. एखाद्या माणसाला एखाद्या प्रकारचे अन्न सहजरित्या पचते, तर दुसर्‍याला तेच अन्न जराही पचत नाही. एका माणसाचे अन्न हे दुसर्‍या माणसासाठी विष ठरू शकते.

 

माणसाला होणारे आजार व जंतुसंसर्ग हे सर्व या संवेदनशीलतेमुळेच होत असतात. आजारी माणसाच्या संपर्कात असलेल्या काही व्यक्तींना लगेच जंतुसंसर्ग होतो, तर काही माणसे आजारी लोकांमध्ये राहूनही त्यांना काहीही होत नाही. एखाद्या माणसाला तंबाखू, अफू, खसखस अशा शेतीच्या संपर्कात राहूनही काहीही होत नाही, तर दुसर्‍या एखाद्या माणसावर त्याचा ताबडतोब परिणाम होतो. होमियोपॅथीक औषधसिद्धतेमध्येही काही सिद्धकर्ते लगेच औषधाची लक्षणे दाखवू लागतात, तर काही लोकांमध्ये ती लक्षणे येण्यास बराच कालावधी लागतो.

 

हे सर्व माणसाच्या संवेदनशीलतेमुळे होत असते. जर आपण जरा खोलात जाऊन विचार केला तर ही संवेदनशीलता माणसाच्या अनुकूलन क्रिया, पर्यावरणाशी व सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या नैसर्गिक क्रियेमध्ये सामावलेली असते. आपण याचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की, संवेदनशीलता ही माणसामध्ये तयार होणार्‍या एका मोठ्या पोकळीची प्रतिक्षिप्त क्रिया असते. माणसाची अनुकूलन क्रिया ही पोकळीमुळे कार्यरत होते. मानवात असणारी ही पोकळी चैतन्यशक्ती भरून काढण्याचा नैसर्गिक प्रयत्न करत असते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आणि शरीरात व मनात परिस्थितीनुसार योग्य ते बदल घडवून आणत असते. या बदलातच आपण अनुकूलन किंवा 'Adaptation' असे म्हणतो. या बदलांच्या मुळाशी असते ती संवदेनशीलता.

 

जसे आपण पाहतो की, ऊर्जा किंवा प्रवाह नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वेगाने प्रवाहित होत असते. शरीर व मनामध्ये असलेली पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने ही पोकळी (Vacuum) शरीर व मनाला अनुकूल व सोयीस्कर अशा गोष्टींना खेचते वा आकर्षित करते. साधेच उदाहरण घ्यायचे झाले, तर उन्हाळ्यात एखाद्या माणसाच्या शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते व त्यामुळे शरीरात एक प्रकारची पोकळी निर्माण होते. ही पाण्याची पोकळी भरून काढण्यासाठी मग माणसाला बाहेरून पाण्याची गरज भासते व शरीर पाण्याची मागणी करते. यालाच आपण 'तहान लागणे' असे म्हणतो. 'संवेदनशीलता' याबद्दल अजून माहिती आपण पुढील भागात घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

(क्रमश:)

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

9869062276

@@AUTHORINFO_V1@@