'पुतळा' आणि 'कठपुतळी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019   
Total Views |



खरंतर पाकिस्तानसाठी एका भारतीय वैमानिकाला त्यांनी जीवंत पकडले, हा कदाचित अभिमानाचा क्षण असेलही, पण अभिनंदनचा पुतळा अशाप्रकारे शोभेच्या संग्रहालयात ठेवून पाकिस्तानने आपलीच शोभा करून घेतलेली दिसते.


जगभरात युद्धस्मारकांची परंपरा नवीन नाही. अगदी विश्वयुद्धपश्चात उभारलेली अशी ही स्मारकं सैनिकांच्या शौर्याचे आणि धैर्याचे जगभर सदैव स्मरण करून देतात. केवळ सैनिकांनाच नाही, तर देशवासीयांच्या मनातही राष्ट्रवादाची ज्योत ही स्मारके तेवत ठेवतात. अशा या युद्ध स्मारकांचा उद्देश आपल्या राष्ट्राची मान उंचावण्याचा असला, तरी पाकिस्तानने मात्र आपला भारतद्वेष तिथेही जोपासलेला दिसतो. कारण, कराचीच्या पाकिस्तानी वायुदलाच्या युद्ध संग्रहालयात चक्क भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचाच पुतळा काचेच्या पेटीत ठेवण्यात आला आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराच्या ट्विटर पोस्टवरून ही धक्कादायक बाब नुकतीच समोर आली.

 

बालाकोट हवाई हल्ल्यावेळी 'मिग-२१' ने पाकिस्तानच्या 'एफ-१६' विमानाची हवेतच माती करणारे विग कमांडर शूरवीर अभिनंदन. पण, या हवाई लढाईत दुर्दैवाने अभिनंदन यांचेही विमान पाकव्याप्त काश्मिरात कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. त्यानंतर पाकी सैनिकांनी अभिनंदन यांच्याबरोबर केलेला दुर्व्यवहार अख्ख्या जगाने पाहिला. अभिनंदन यांचा चेहरा रक्ताने माखला असला तरी त्यांनी कदापि धीर सोडला नाही. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला धक्का पोहोचेल, अशी कुठलीही संवेदनशील माहिती टोकाचे प्रयत्न करूनही अभिनंदनच्या तोंडून पाकी सैनिकांच्या हाती लागली नाही. अखेरीस भारताकडून वाढत्या दबावापुढे झुकत दोन दिवसांनी अभिनंदन यांची पाकने सुटका केली. अभिनंदन सर्वार्थाने भारतीयांसाठी 'हिरो' ठरले. पण, पाकिस्तानमध्ये मात्र अभिनंदनवरून बरेच वेडेवाकडे संदेश, छायाचित्रे व्हायरल झाली. आपण एका भारतीयाची छी-थू करण्यात धन्यता मानतोय, या आर्विभावात तो एका देशासाठी लढणारा वीरयोद्धा आहे, याचे साधे भानही पाकिस्तान सरकार, माध्यमे आणि तेथील कडवट मनोवृत्तीच्या लोकांनी राहिले नाही. भारतद्वेषाच्या ईर्ष्येतआकंठ बुडालेल्या पाकिस्तानने क्रिकेट सामन्यावेळीही असेच एका जाहिरातीतून अभिनंदनचा अवमान केला. हे सगळे कमी की काय, म्हणून आता चक्क अभिनंदनचा पुतळाच युद्ध संग्रहालयात बसवण्याचा नापाकपणा पाकिस्तानने केलेला दिसतो.

 

खरंतर पाकिस्तानसाठी एका भारतीय वैमानिकाला त्यांनी जीवंत पकडले, हा कदाचित अभिमानाचा क्षण असेलही, पण अभिनंदनचा पुतळा अशाप्रकारे शोभेच्या संग्रहालयात ठेवून पाकिस्तानने आपलीच शोभा करून घेतलेली दिसते. एकवेळ आपल्या मृत सैनिकांचा पुतळा पाकिस्तानने त्यांच्या संग्रहालयात उभारला असता, तर ते समजूही शकते. पण, शत्रुराष्ट्राच्या केवळ दोन दिवस कैदेत ठेवलेल्या वैमानिकाचा पुतळा उभा करून पाकने केलेला हा टवाळखोरी, हेटाळणीचा प्रयत्न निश्चितच निंदास्पद म्हणावा लागेल. अशा कारनाम्यातून आपसुकच पाकिस्तानी सैन्य आणि सरकार यांची जहरी मानसिकता समोर येते. लोकं या संग्रहालयाला भेट देतील, अभिनंदनचा पुतळा बघून त्याचे हसे करतील, भारताला चार शिव्या हासडतील, हाच यामागचा प्रथमदर्शनी उद्देश. त्यामुळे आपल्या देशवासीयांच्या मनात पाकिस्तान प्रेम जीवंत ठेवण्यासाठी भारताच्या वैमानिकाच्या पुतळ्याचा असा वापर करावा लागणे, हीच मुळी शरमेची बाब. अभिनंदनच्या पुतळ्याचे ट्विटरवर छायाचित्र व्हायरल होताच, काही भारतीयांनी यातूनही सकारात्मक संदेश दिला. पाकिस्तानला भारतापासून दचकून राहण्यासाठी अभिनंदनचा पुतळा प्रेरणादायी ठरेल, इथंपासून ते अभिनंदनमुळे पाकिस्तानची इतकी घाबरगुंडी उडाली की, तो पुतळा उभारूनच भारतापासून एक सुरक्षित अंतर ठेवतो आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या. भारतीय सैनिकाचा चक्क पाकमध्ये पुतळा म्हणत अनेकांनी उलट हा पाकिस्तानने भारताचा केलेला गौरवच अशाही प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यामुळे सोशल मीडियावरही नेहमीप्रमाणे पाक तोंडावर आपटला. पण, तोंडावर आपटो अथवा बुडावर, पाकिस्तान, त्यांचे सैन्य, शासक हे कुणीही सुधारणार्‍यांपैकी नाहीच. पण, भारतीय सैनिकाचा पुतळा बसवण्यापेक्षा पाकी सैन्याची 'कठपुतळी' असलेल्या पंतप्रधानाने आपल्या देशाकडे लक्ष दिले तरच ते त्यांच्या आवामच्या 'अभिनंदना'स पात्र ठरतील!

@@AUTHORINFO_V1@@